आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री भागात राहणारे दोन भाऊ श्रीनिवास राव आणि मुरलीधर राव यांना टेबल टेनिसवर अपार प्रेम जडते. दोघांना जाणीव होते की, येथे चांगले प्रशिक्षण मिळत नाही. प्रसिद्ध टेबल टेनिसपटू व्हायचे स्वप्न पूर्ण होणार नाही, हे जाणून घेऊन ते चेन्नईत येतात. दोघे राज्यस्तरीय खेळाडू बनतात. श्रीनिवास राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षकही बनतात. श्रीनिवास प्रशिक्षण देत असताना ते आपल्या लहान मुलालाही सोबत न्यायचे. त्याने खेळ समजून घ्यावा हा हेतू. तो मुलगा म्हणजे मी. १२ जुलै १९८२ ला माझा जन्म झाला. लहानपणापासून टेबल टेनिस पाहत आलो. आवडतेही. चौथ्या वर्षापासून टेबल टेनिस खेळू लागलो. तेव्हा टेबलपर्यंत पोहोचताही यायचे नाही. वडील आणि काका मला कडेवर घ्यायचे, तेव्हा फटका मारायचो. मी खेळात ठीकठाक होतो. राज्यस्तरावर रँकिंग ठीक होती. मात्र राष्ट्रीय पातळीवर खूपच खाली. १४ व्या वर्षी मी ठरवले की, मला व्यावसायिक टेबल टेनिसपटू बनायचे आहे. वडील माझ्या निर्णयामुळे आनंदी होते. मी १२ तास मेहनत घ्यायचो. टेबलवर खेळायचो वा जिममध्ये वेळ घालवायचो. २० व्या वर्षापर्यंत प्रचंड मेहनत घेतली. मात्र परिणाम अपेक्षित नव्हते. राज्यात उत्तम होतो, मात्र राष्ट्रीय स्तरावर खूपच मागे.
२००२ पासून गोष्टी बदलू लागल्या. मला सीनियर नॅशनल ट्रेनिंग कॅम्पसाठी बोलावण्यात आले. २००२ च्या शेवटापर्यंत मी देशात चौथ्या क्रमांकावर होतो. मी पहिले सिनिअर नॅशनल फायनल खेळले. २००३ मध्ये भारतात अव्वलस्थानी होतो. येथे पोहोचल्यानंतर वेगवान गोष्टी घडल्या. मेहनतही संयमाची परीक्षा घेत असते. संयम तुम्हाला बाळगावा लागेल. तेव्हाच मेहनतीचे फळ मिळेल. २००४ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळण्यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकले. ऑलिम्पिकमध्येही हात अजमावले. आता मी देशात तर पुढे होतो, मात्र जगाच्या स्पर्धेत मागे. मी युरोपला गेलो. दोन वर्षात वडिलांची सर्व जमाशिल्लक येथे संपवली. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर हळूहळू स्थिर होत होतो. २००६ च्या मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्समध्ये आम्ही दोन सुवर्णपदके जिंकली. येथून नवी सुरुवात झाली. जे कष्ट आणि पैसा युरोपात लावला तो वाया गेला नाही. २०११ मध्ये माझे लग्न झाले. एक मुलगा झाला. माझे जीवन बदलत होते. व्यावसायिकदृष्ट्या गोष्टी बदलत होत्या. २०११ मध्ये मी करिअरमध्ये खालच्या पातळीवर होतो. माझी जागतिक क्रमवारी ९४ होती. अनेक स्पर्धांत पराभव होत होता. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकलो नाही. मी वैयक्तिक प्रशिक्षक ठेवला. मैदानात मेहनत वाढवली.
मात्र कौटुंबिक पातळीवरही तेवढीच ऊर्जा हवी होती. पत्नीने ठरवले की ती मुलासह माहेरी परतेल. तिने म्हटले, २०१२ चे ऑलिम्पिक सुटले. २०१६ मध्ये मात्र असे व्हायला नको. त्यासाठी कष्ट घेऊन पुनरागमन करावे. २०१५ पर्यंत मी फॉर्मात आलो. तेव्हा एक दुखापत झाली. शस्त्रक्रिया झाली. चार महिने व्हीलचेअरवर राहिलो. त्यानंतर उभे राहण्याइतकीही शक्ती अंगात नव्हती. कुटुंबाला दिलेला शब्द आठवला आणि स्वत:ला तयार करू लागलो. अॉलिम्पिकच्या आधी सहा महिने तयारी सुरू केली. पात्रता सामन्याच्या आधीची रात्र. माझे हृदय जोरात धडधडत होते. सामना जोरात झाला. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो. तुम्ही जे शिकाल ते वाया जात नाही. चढ-उतार येतच राहतील. तुम्हाला खंबीर राहावे लागेल.’ (तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल )
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.