आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टुरिंग टॉकीज:बेतोच्या समुद्रकिनारी...

भक्ती चपळगावकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाला माणसांमध्ये राहायला आवडतं. माणसानं वस्तीत राहायला सुरुवात केली आणि तो जंगलांपासून दूर झाला. आज परिस्थिती अशी आहे, की पृथ्वीवरच्या इतर कोणत्याही जीवाच्या तुलनेत माणूस निसर्गाशी फारकत घेऊन आहे. प्राणी कधी टोळ्या करून, तर कधी एकएकटे राहतात, पक्षी थव्याने भ्रमंती करतात; पण जगण्यासाठी वेगळा सभोवताल तयार करत नाहीत, तर सभोवतालालाच आपलंसं करतात. परंतु, चलाख माणसानं सभोवतालाला ताब्यात घेतलं. आपल्या गरजेप्रमाणं त्यात बदल घडवले. निसर्गापासून दूर गेलेल्या माणसाला मनातील अशांतता दूर करण्यासाठी मात्र निसर्गच हवाहवासा वाटतो. अपार्टमेंटच्या कबुतरखान्यात हक्काचं आकाशही नाही. मुंगीपासून देवमाशापर्यंत सगळे जीव निसर्गाशी, पृथ्वीशी संबंध ठेवून आहेत आणि आपण एकमेकांशी, त्यातही आपल्या धर्म, जात, देश या चौकटीत बसणाऱ्या इतर मानवांशीच संबंध ठेवतो. पण, आपल्यातही वेडे आहेतच. कुणी फुलपाखरांच्या शोधात, कुणी रानगव्यांच्या, कुणी हिमपर्वतांच्या ओढीनं समाजापासून फारकत घेत निसर्गाशीच नातं जुळवतात आणि आयुष्यभर त्यांच्याच संगतीत राहतात.

‘द लाइटहाऊस ऑफ द ओर्काज’ या स्पॅनिश चित्रपटात असाच एक वेडा माणूस आहे.. बेतो. बेतो (रोबेर्तो बुबास) अर्जेंटिनातील एका समुद्रकिनारी राहतो. हा चित्रपट सुरूच होतो आकाशाच्या आणि समुद्राच्या भव्य पटावर. नजर जाईल तिथवर समुद्राच्या लाटा, त्याच्या किनाऱ्यावर ऊन खात बसलेले सील्स आणि सी लायन्स. एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर दौडत बेतो समुद्रकिनारी येतो. किनाऱ्यावरच्या सील्स आणि काळसर सी लायन्सपासून दूर उभा राहतो. अचानक समुद्रातून एक ओरका येते आणि किनाऱ्यावरच्या बेसावध सीलची शिकार करते. तिला बघून बेतो खुश होतो. शाका... बेतो त्या ओरकाला ओळखतो. आपल्या घोड्यावरून समुद्रकिनारी भटकायचे आणि शाकाच्या लीला बघत राहायच्या, तिला शीळ घालून बोलवायचे, तिच्याशी गप्पा मारायचा, हा बेतोचा नित्यक्रम आहे.

समुद्रकिनारी वन विभागाची चौकी आहे. त्या चौकीतच त्याचा मुक्काम आहे. आजूबाजूला वस्ती नाही. दोन दीपगृहांच्या मधोमध पसरलेला समुद्र. किनारी उभा अजस्त्र कडा. आणि त्या कड्याच्या मागे बेतोची चौकी. किनाऱ्यावर सील्स आणि सी लायन्स ऊन खायला येत असतात. पण, बेतोचा जीव ओरकांमध्ये गुंतला आहे. डॉल्फिनसारख्या पण अंगावर पांढरा पट्टा असलेल्या ओरका बेतोला ओळखतात. जणू त्याच्याशी गप्पा मारायला किनाऱ्याच्या जवळ येतात. बेतोही त्याच्याजवळच्या बाज्याने एक विशिष्ट शीळ घालून त्यांना बोलावतो. इथली नीरव शांतता भंग होऊ नये किंवा इथल्या नितळ निसर्गावर ओरखडे पडू नयेत म्हणून कदाचित तो समुद्रकिनारी येताना नेहमी त्याच्या घोड्यावरून येतो. शहरात जाण्यासाठी बाइकचा वापर करतो. एक दिवस अचानक बेतोचा शांत दिनक्रम भंग पावतो. समुद्र सहलीवरून परत आल्यावर त्याला एक लहान मुलगा आणि एक बाई समोर दिसतात. त्यांचे सामान अस्ताव्यस्त पडले आहे आणि ती दोघं दमून झोपली आहेत. हा मुलगा म्हणजे तिस्त्रान आणि ती बाई आहे त्याची आई लोला. ही दोघं स्पेनहून आली आहेत.

तिस्त्रानला ऑटिझम (स्वमग्नता) आहे. तो कित्येकदा स्वतःला जखमा करून घेतो. तिस्त्रान दोन वर्षांचा असताना त्याचा बाबा त्याला सोडून गेला. नवरा सोडून गेल्याचे दुःख आणि मुलगा स्वतःच्या भावना व्यक्त करू शकत नाही, जगाबरोबर संवाद साधू शकत नाही, या दुःखात लोला आहे. लोला आणि तिस्त्रान एकदा नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरच्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये बेतो आणि त्याच्या ओरका बघतात. सहसा आपल्या भावना व्यक्त न करणारा तिस्त्रान ओरकांना बघून खूप आनंदी होतो. त्यामुळे आपण त्याला ओरकांना भेटायला नेले, तर त्याच्या स्थितीत सुधारणा होईल, अशी आशा लोलाच्या मनात निर्माण होते. समुद्रकिनारी पोहोचल्यावर ती बेतोला सांगते, की तिस्त्रान आजारी नाही, ऑटिस्टिक आहे. तू त्याला ओरकाकडे नेलं, तर त्याला बरं वाटेल. बेतो सुरुवातीला या मायलेकरांशी अतिशय उद्धट वागतो. ‘इथल्या ओरकाज म्हणजे काही गंमत नाहीय, इथं तुम्हाला राहायला जागा नाही, जे तुम्ही टीव्हीवर बघितलं ते आता शक्य नाही, कारण ओरकांशी संपर्क साधायला आता बंदी आहे..’ अशा शब्दांत बेतो लोलाला झिडकारतो. ती रागावून परत जायला निघते, पण का कुणास ठाऊक; बेतोचा जीव तिस्त्रानमध्ये गुंततो आणि तो त्यांना राहायला परवानगी देतो.

तिस्त्रानला ओरकांकडे नेणं इतकं सोपं नाही. बेतोच्या बॉसला बेतोनं स्वतःच ओरकांपाशी जाणं मान्य नाही. तुझ्या करामती थांबवल्या नाहीस तर तुझी बदली करीन, असं त्याचा बॉस धमकावतो. बेतो त्याला तिस्त्रानबद्दल सांगतो, पण बॉस परवानगी देण्याचा प्रश्नच नाही. आपला गोंधळ लोलाला समजू न देता बेतो तिस्त्रानला ओरकाजकडे घेऊन जायला लागतो. समुद्रकिनारी बेतोची एक छोटी नाव असते. त्या नावेत बसून समुद्रात जायचं आणि मग शीळ घालून शाकाला बोलवायचे, अशी बेतोची पद्धत असते. मग शाका आली की तिस्त्रानची वागणूक बदलते, तिच्याशी संवाद साधायचा तो प्रयत्न करतो. पुढे प्रत्येक गोष्टीत लोला तिस्त्रानच्या वतीने बोलायला लागते. त्या वेळी बेतो तिला सांगतो, त्याला अडकाठी आणू नकोस. तुला वाटतंय, की तू त्याला मदत करत आहेस; पण प्रत्यक्षात तू त्याला अडवते आहेस. ओरकांसोबत नातं निर्माण करणारा बेतो तिस्त्रानशी मैत्री करतो, आईशिवाय कुणालाही हात लावू न देणारा तिस्त्रान एकदा बोटीवर जाताना बेतोला बिलगतो. आपल्या चौकीत एकटा राहणारा बेतो, तिस्त्रानने त्याला बिलगल्यावर भावनावश होतो. ओरकांबरोबर बेतोचं खास नातं आहे, शाका ही तर त्याची मैत्रीण आहे. या जगात हळूहळू तिस्त्रानसुद्धा सहभागी होतो. आपण खूप आनंदी आहोत, हे आपल्या खास शैलीत तो बेतोला सांगतो. सुरुवातीला मुलाची काटेकोर काळजी घेणारी लोला बेतोच्या सहवासात आनंदी होते.

बेतोच्या चौकीवर आलेली अस्वस्थ लोला आता जरा रिलॅक्स होते. एवढी वर्षे तिनं एकटीनं तिस्त्रानची जबाबदारी घेतली आहे, आता बेतो त्याला सांभाळतोय. लोला आयुष्याचा आनंद घ्यायला लागते. दुसरीकडं, बेतो तिस्त्रानबरोबरच लोलात गुंतून जातो. लोला मात्र स्पेनमधल्या तिच्या नात्याच्या गुंत्याला सोडवत असते. बेतो आणि लोला, बेतो आणि तिस्त्रान, बेतो आणि शाका... समुद्राच्या गाजेच्या पार्श्वसंगीतावर ही नाती फुलंत असतात. पुढं अडचणी येतात, पण निसर्गाशी असलेली घट्ट वीण उसवत नाही. कधी बेतोचा बॉस त्याला ओरकाजशी संपर्क करायला मनाई करतो, तर कधी लोलाचा नवरा अडचणी निर्माण करतो. पण, लोला आणि बेतो या काळजात मणाचं ओझं वागवणाऱ्या जीवांना एकमेकांचा आसरा मिळतो. एकमेकांच्या सहवासात ही दोघं आपल्या भूतकाळाला मागं टाकायला तयार होतात. त्यामुळं शेवट परीकथेसारखा नसला, तरी हा चित्रपट निराश करत नाही.

माणसाला जगायला किती कमी गोष्टींची गरज आहे, याची खरी जाणीव या चित्रपटात होते. इथं ना शहरी चकाचक आहे, ना माणसाची गजबज. पण, कुठंही त्याची कमतरता जाणवत नाही. जिरार्दो ऑलिवरेस या दिग्दर्शकाने निसर्ग आणि माणसाच्या नात्यावर आधारित गोष्टींवर तीन चित्रपट बनवले आहेत. त्यातला ‘एल फारो दे ला ओरकाज’ (ओरकांचे दीपगृह) हा तिसरा चित्रपट. भरकटलेल्या जहाजांना दीपगृह दिशा दाखवते, वाचवते. ओरकाजचे हे दीपगृह बेतो आणि लोलाला वाचवते. नॅशनल जिओग्राफिकवरची एखादी डॉक्युमेंट्री वाटावी इतकं सुंदर चित्रण या सिनेमात केलं गेलं आहे. एका वास्तवातील अनुभवाला काल्पनिकतेची जोड देऊन ही कथा लिहिली गेली आहे. चित्रपट संपतो आणि बेतोचे पुढे काय झाले असेल, हा प्रश्न आपल्याला पडतो. त्याच वेळी खऱ्या बेतोचा फोटो आणि तो काय करतो आहे, याची माहिती समोर येते. त्याला त्याच्या लाडक्या ओरकांबरोबर बघून आपलाही जीव सुखावतो.

माणसाला जगायला किती कमी गोष्टींची गरज आहे याची जाणीव ‘द लाइटहाऊस ऑफ द ओर्काज’ हा चित्रपट करून देतो. इथं ना शहरी चकाचक आहे, ना माणसांची गजबज. पण, कुठंही त्याची कमतरता जाणवत नाही. नॅशनल जिओग्राफिकवरची एखादी डॉक्युमेंट्री वाटावी इतकं सुंदर चित्रण या चित्रपटात केलं गेलं आहे. वास्तवातील एका अनुभवाला काल्पनिकतेची जोड देऊन लिहिलेली त्याची कथा सृष्टीतील जीवांशी माणसाच्या असलेल्या नात्याभोवती आपल्याला अखेरपर्यंत बांधून ठेवते.

बातम्या आणखी आहेत...