आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टुरिंग टॉकीज:तुझे नक्षत्रांचे देणे...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लकुना क्लिनिकचे कर्मचारी जोअलच्या मनातून क्लेमेंटाइनच्या एकेक आठवणी काढून टाकताहेत. अशातच त्याच्या सुप्त मनात गोंधळ माजतो, आठवणींच्या गर्दीत तो क्लेमेंटाइनला शोधू लागतो. तिला सांगायला लागतो, ‘काहीही कर, पण माझ्या आठवणीतून जाऊ नकोस..’ मग आठवणीतली ती आणि तो मिळून क्षणाक्षणाला नाहीशा होणाऱ्या आठवणी पकडून ठेवायचा प्रयत्न करतात.. पण, ओंजळीतल्या वाळूसारख्या त्या निसटत जातात.. या वळणावर ते काय निर्णय घेतात यापेक्षा सगळं काही उधळून लावणारं उत्कट प्रेमच शेवटी लक्षात राहावं, असं मग आपल्यालाही वाटू लागतं...

आठवणी वजा करता आल्या, तर आयुष्य कसं होईल? डोळ्यातले अश्रू आवरून गिळून टाकावा लागलेला अपमान, पोटी जन्माला आलेल्यांचे मृत्यू, आयुष्य देशोधडीला लावणारे प्रियकर / प्रेयसी, नको असलेला तरीही झालेला स्पर्श.. हे सगळं आयुष्यात कधी घडलंच नाही तर? जोअलनं (जिम कॅरी) दिलेले दुःख विसरायला क्लेमेंटाइन (केट विन्सेट) एका आठवणी पुसून टाकण्याच्या दवाखान्यात जाते आणि जोअलला मनातूनच नाहीसं करते.. इकडं प्रेमभंगानं वेडापिसा झालेला जोअल तिची माफी मागायला जातो, तर क्लेमेंटाइन त्याला ओळखतच नाही. तिने आपली आठवण मनातून काढून टाकलीय, हे कळल्यावर रागानं पेटलेला जोअलसुद्धा तिच्या अस्तित्वाला मनातून हद्दपार करायचं ठरवतो. त्याच्या मनातून तिची एकेक आठवण काढून टाकली जात असताना त्याला लक्षात येतं की, आठवणींच्या या गर्दीत काही अशा आहेत, काही क्षण असे आहेत, ज्यांनी त्याला अपार आनंद दिला आहे. या क्षणांमुळेच त्याला आयुष्य हवेहवेसे वाटते. मग या क्षणांना, पर्यायाने त्याला विसरलेल्या क्लेमेंटाइनच्या आठवणींना कसे वाचवता येईल, या प्रयत्नात त्याचे सुप्त मन आणि निद्रिस्त शरीर झगडू लागते. ‘इटर्नल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड’ या चित्रपटातले हे नाट्य.. त्याला चित्रपट म्हणावे, फँटसी म्हणावी की कविता, इतका तो तरल आहे.

नित्शे म्हणतो, ‘विसरभोळे लोक भाग्यवान असतात, त्यांनी घोडचुका केल्या तरी त्याचे काहीच तोटे नसतात.’ आपल्या आयुष्यात आपण पदोपदी चुकत असतो. चुकीचे निर्णय घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या नात्यांत अडकत जातो.. क्लेमेंटाइन अशीच आहे. उत्स्फूर्त, झट-खफा, पण तरीही क्षणात प्रेमात पडणारी, प्रियकराचा राग आला की बेफाम होऊन त्याचा अपमान करणारी, पण त्याच वेळी त्याला जगायला शिकवणारी. क्लेमेंटाइनच्या अगदी विरोधी व्यक्तिमत्त्व जोअलचे आहे. अतिशय बुजरा, गर्दीतही एकटा, गरजेपुरतेच बोलणारा, काहीसा घुमा आणि मनातल्या भावना रेखाटनांतून, डायरीतून व्यक्त करणारा जोअल. एखाद्या पार्टीत गेल्यावर जो काहीही न बोलता एका कोपऱ्यात एकटा बसलेला असतो ना, तो जोअल. चित्रपटाची सुरुवात होते ‘व्हॅलेंटाइन डे’ला. या दिवसाच्या उतू जाणाऱ्या प्रेम प्रदर्शनाला कंटाळलेला जोअल अचानक ऑफिसला न जाता समुद्रकिनारी भटकायला जातो. एवढ्या बोचऱ्या थंडीत आपण इथे कुठे आलो आहोत, असे वाटत असतानाच त्याला क्लेमेंटाइन भेटते. बुजरा जोअल तिला बघूनही न बघितल्यासारखे करतो. पण, बडबडी, निळ्या केसांची क्लेमेंटाइन ट्रेनमध्ये त्याच्या शेजारी येऊन बसते, त्याच्याशी गप्पा मारायला लागते, ओळख नवी असली तरी दोघेही एकमेकांच्या जवळ येतात...

इथे चित्रपटाच्या कथेची अचानक उलथापालथ व्हायला लागते आणि समोर दिसतो तो क्लेमेंटाइनच्या प्रतारणेमुळे संतापाने थरथर कापणारा जोअल. क्लेमेंटाइन त्याला ओळख दाखवायलाही तयार का नाही हे त्याला कळत नाही. इतकंच नव्हे, तर तिने नवा मित्र पण शोधलाय? जोअलचा मित्र तिचं गुपित सांगतो. क्लेमेंटाइनने जोअलच्या आठवणी पुसून टाकल्या आहेत. लकुना नावाच्या एका दवाखान्यातून तशा अर्थाचं पत्रं त्याला आलेलं असतं, ‘क्लेमेंटाइन यांनी जोअलच्या आठवणी मनातून नाहीशा केल्या आहेत, तिच्याबरोबर बोलताना जोअलचा उल्लेख करू नका.’ हे ऐकून जोअल संतापतो आणि त्या क्लिनिकला जाऊन पोहोचतो. मलाही तिला मनातून काढून टाकायचंय म्हणतो. तिथले डॉक्टर सांगतात, ‘तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट इथे घेऊन ये. त्या प्रत्येक गोष्टीशी निगडित आठवणी आम्हाला सांग, आम्ही तुझ्या मेंदूचा आराखडा तयार करून त्या त्या आठवणी शोधून नष्ट करू. रात्री हे औषध घे, तू गाढ झोपशील. त्यानंतर आम्ही आठवणी काढून टाकायची प्रक्रिया करू.’ रात्री त्या क्लिनिकची टीम आपली उपकरणं घेऊन येते. त्याच्या डोक्याला वायर्स जोडून एकेक आठवण शोधून ती उडवून टाकायचं काम सुरू होतं...

आधी क्लेमेंटाइनला जोअलनं शेवटी कधी बघितलं, याची आठवण येते. दोघेही वैतागले आहेत, क्लेमेंटाइन रडतेय, दुखावणाऱ्या शब्दांनी एकमेकांना ओरबाडताहेत.. ही आठवण काढून टाकली जाते, मग ते कसे भेटले याची आठवण येते. समुद्रकिनारी एक पिकनिक सुरू आहे आणि पिकनिकच्या गडबड-गोंधळात सामील न होता शांतपणे दूर बसलेल्या जोअलकडे क्लेमेंटाइन येते. हीच त्यांची पहिली भेट. पुढची आठवण आहे एका रात्रीची. गोठलेल्या नदीवर झोपून आकाशातल्या ताऱ्याकडे बघत राहणारे क्लेमेंटाइन आणि जोअल दिसतात. बर्फाला तडा गेला तर काय? या भीतीने नदीपासून दूरदूर राहणाऱ्या जोअलला गोठलेल्या पात्रात झोपायला लावून वर आकाशातील नक्षत्रं बघायला सांगणाऱ्या क्लेमेंटाइनने त्या क्षणी जोअलला आनंदी केलं आहे. ही आठवण नाहीशी होताना जोअल तडफडायला लागतो.. ‘माझी चूक झाली. मला क्लेमेंटाइनला विसरायचं नाहीय, हे बंद करा. मला माझ्या आठवणी हव्या आहेत..’ जोअल ओरडू लागतो. पण, त्याचे फक्त सुप्त मन जागे आहे. त्याचे शरीर त्याच्या घरी त्याच्या पलंगावर निद्रिस्त आहे. तिथे लकुना क्लिनिकचे तीन कर्मचारी आपल्याच तंद्रीत आहेत. त्याच्या हाका त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. जोअलच्या सुप्त मनात गोंधळ माजतो, मनातल्या आठवणींच्या गर्दीत तो क्लेमेंटाइनला शोधायला लागतो, तिला सांगायला लागतो.. काहीही कर, पण माझ्या आठवणीतून जाऊ नकोस.. मग आठवणीतली ती आणि तो मिळून क्षणाक्षणाला नाहीशा होणाऱ्या आठवणी पकडून ठेवायचा प्रयत्न करतात, पण ओंजळीतल्या वाळूसारख्या त्या निसटत जातात...

जोअल ठरवतो, आता क्लेमेंटाइनला अशा आठवणीत पकडून ठेवतो, ज्यात ती नव्हतीच, मग तिला जपून ठेवता येईल. पाच वर्षांचा जोअल दिसतो आणि त्याच्या या आठवणीत क्लेमेंटाइन शिरते. पण, इकडे लकुना क्लिनिकच्या टीमला काहीतरी गडबड झाल्याचा संशय येतो आणि ते तिला तिथूनही शोधून काढतात. सकाळ होते, जोअलचं मन कोरी पाटी झालंय. दुसरीकडे जोअलला मनातून काढून टाकल्यावरची क्लेमेंटाइन रडून रडून गोंधळ घालतेय, तिचं काय बिनसलंय हेच तिला कळत नाहीय. चित्रपट सुरू होताना जो दिवस आहे, तो हाच दिवस. ‘क्लेमेंटाइन डे’ला एका निर्जन समुद्रकिनारी त्यांची भेट होते. आधी आपण भेटलो आहोत, हे त्यांच्या गावीही नाही. पुन्हा नक्की भेटायचं, असं फक्त ठरवतच नाहीत तर भेटतातही. पण, त्याच क्षणी त्यांना ते वेगळे का झाले, हे सांगणाऱ्या त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड केलेल्या त्यांच्या आठवणींच्या कॅसेट मिळतात. एकमेकांबद्दलचा द्वेष, संताप, घृणा सगळं काही आहे त्यात. या वळणावर ते काय निर्णय घेतात, हे फार महत्त्वाचं नाही. कारण सगळं काही उधळून लावणारं उत्कट प्रेमच शेवटी लक्षात राहावं, असं आपल्यालाही कुठं तरी वाटत राहतं.

या चित्रपटाचे शीर्षक अलेक्झांडर पोपने १७१७ मध्ये लिहिलेल्या एका अजरामर कवितेवर आधारित आहे. इलुईझा टू एबिलार या कवितेतील इलुईझा म्हणते, How happy is the blameless vestal’s lot? The world forgetting, by the world forgot. Eternal Sunshine of the spotless mind? Each prayer accepted and each wish resigned. इलुईझाचा प्रियकर एबिलार. त्यांच्या प्रेमाच्या विरोधात असलेले लोक एबिलारला नपुंसक करतात, जेणेकरून ते दोघे लग्न करणार नाहीत. शेवटी तो धर्मगुरू बनतो आणि ती जोगतीण. इलुईझा तिचा भूतकाळ विसरू शकत नाही. आपणही आपला भूतकाळ विसरू शकत नाही. त्यातल्या डंख मारणाऱ्या आठवणींची ठसठस मनात जपून ठेवतो. कारण गोधडीची ऊब देणाऱ्या आठवणी तिथेच कुठेतरी असतात...

भक्ती चपळगावकर bhalwankarb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...