आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टुरिंग टॉकीज:धुमसणाऱ्या भावनांचे मनोनाट्य

भक्ती चपळगावकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या ऑस्कर अवॉर्डसाठी ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत. या चित्रपटातले दोन प्रसंग अविस्मरणीय आहेत. एका दृश्यात दोन्ही बाजूंनी बायल्या म्हणून हेटाळणी होत असलेला पीटर शांतपणे चालत जात पक्ष्यांचे एक घरटे पाहतो अन् परततो, तर दुसऱ्या दृश्यात पीटर बिडी वळून त्याचे झुरके घेत तीच बिडी फिलच्या ओठांवर टेकवतो. पहिल्या दृश्यातला जगाची तमा न बाळगणारा आणि दुसऱ्या दृश्यामधला, फिलला स्वतःच्या मोहात पाडणारा पीटर भाव खाऊन जातो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला घडणारे हे नाट्य एकविसाव्या शतकातल्या प्रेक्षकाला खूप काही सुचवते.

जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्त्री किंवा पुरुषपणाच्या चौकटीत टाकलंच पाहिजे, असा आग्रह का असावा? स्त्रीचे लैंगिक अवयव असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आपण पुरुष आहोत, असे वाटू शकते किंवा पुरुषाचे लैंगिक अवयव घेऊन जन्माला आलेल्या एखाद्याला मी ‘ती’ आहे, असे वाटू शकते किंवा याही पलीकडे लैंगिक भावनांचे, व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर असू शकतात ही समज आपल्या समाजाला नाही हे दुर्दैव. उलट पुरुषाने जणू पुरुषपण सिद्ध करण्यासाठी पुरुषी वागले पाहिजे, असा आग्रह समाज धरतो. पुरुष कसा शक्तिवान, रांगडा हवा. पहिलवानांचे आखाडे, सैनिकांच्या छावण्या अशा ठिकाणी या पौरुषत्वाचे प्रदर्शन होत असते. अशा वातावरणात पुरुषीपणाच्या या चौकटीबाहेर जाऊन स्वतःला व्यक्त करणाऱ्या एखाद्याची अवहेलना, घुसमट होते. ती टाळण्यासाठी इच्छा नसतानाही स्वतःला समाजाने स्वीकारलेल्या चौकटीतच व्यक्त करणारेही कमी नाहीत. काऊबॉइज हे पश्चिम अमेरिकेच्या रांगड्या संस्कृतीचे प्रतीक. यंदाच्या ऑस्कर अवॉर्डसाठी सर्वाधिक नामांकने मिळालेला ‘द पॉवर ऑफ द डॉग’ हा चित्रपट याच पार्श्वभूमीवर लैंगिकतेच्या प्रकट-अप्रकट रूपांना सामोरे जातो. फिल बरबँक (बेनेडिक्ट कम्बरबॅच) आणि पीटर गॉर्डन (कोडी स्मिट मकफी) ही दोन विरोधी व्यक्तिमत्त्वं हे नाट्य गडद करतात. ही गोष्ट घडते तो काळ आहे १९२५ चा. फिल बरबँक एका प्रचंड मोठ्या रांचचा किंवा गुरांच्या कुरणाचा मालक आहे.

त्याचा भाऊ जॉर्ज आणि तो मिळून मोंटाना इथं शेकडो गायींना सांभाळतात. जॉर्ज नावाचाच मालक आहे. कारण गायींना चरायला नेणं, मेलेल्या गायींची कातडी सोलणं, त्यांना रोगराईपासून वाचवणं, गोठा सांभाळणं, घोड्यांना सांभाळणं, रांचवर काम करणाऱ्या माणसांना प्रशिक्षण देणं, त्यांच्याकडून काम करवून घेणं ही सगळी कामं फिल एकटा करतो. जॉर्ज शिक्षण घेऊन आलेला, एका अर्थी शहरी बाबू झालेला आहे. फिलला रांचवर काम करण्यासाठी तयार करणारा त्याचा मित्र ब्राँको हेन्री कधीच मरण पावलाय, पण फिल उठता-बसता त्याची आठवण काढतो. आज आपण जे काही आहोत ते ब्राँकोमुळेच याची जाणीव तो सतत जॉर्जला करून देत असतो. एकदा गायींना चरायला घेऊन गेल्यावर रात्री मुक्कामाला बरबँक बंधूंचा काफिला ज्या हॉटेलवर थांबतो, त्याच्या मालकिणीच्या मुलाची, पीटरची थट्टा फिल करतो. पीटरने बनवलेली कागदी फुलं, त्याने हातात पकडलेला नॅपकिन, हे सगळं किती बायकी आहे याची जोरदार रेवडी उडवतो, तेही अतिशय उद्धटपणे. या अपमानास्पद वागणुकीमुळे पीटर भडकतोच, पण त्याची आई रोझ रागाच्या भरात रडायला लागते. सहृदयी जॉर्जला आपल्या भावाची वागणूक आवडत नाही आणि तो रोझची माफी मागतो. फिल आणि जॉर्ज मनाने कधीचेच दुरावले आहेत. आपला भाऊ रांचवर राहण्याच्या लायकीचा नाही, असे फिल सारखे म्हणत असतो, त्याला जाड्या म्हणून हिणवत असतो, तरी त्याला जॉर्जने आपल्याशी बोलावे, गप्पा माराव्यात, ब्राँको हेन्रीच्या आठवणी जागवाव्यात, असे सारखे वाटत राहते. स्वभावाने सौम्य जॉर्ज त्याच्याशी वाद न घालता संवादच कमी करतो.

जॉर्ज रोझच्या प्रेमात पडतो आणि तिला रांचवर घेऊन येतो. आधीच भावापासून दुरावलेला फिल रोझचा द्वेष करायला लागतो. त्याच्या गुदमरून टाकणाऱ्या अस्तित्वाने रोझचा श्वास कोंडतो. मोठ्या कौतुकाने जॉर्ज तिला पियानो आणतो. तिचा वेळ जाईल, तिने छेडलेले सूर या घरात घुमतील, असा जॉर्जचा विचार. पण बँजो वाजवण्यात पारंगत असलेला फिल रोझची पियानो प्रॅक्टिस बंद पाडतो. फारसे न बोलता फिल रोझवर इतके वर्चस्व गाजवतो की बिचारी रोझ वेडीपिशी होते, आपल्या अव्यक्त भावनांना दारूच्या नशेत दाबण्याचा प्रयत्न करू लागते. दरम्यान, वैद्यकीय प्रशिक्षणासाठी बाहेरगावी राहत असलेला पीटर आईला भेटायला रांचवर येतो. आईची अवस्था बघितल्यावर त्याचे कारण त्याच्या लक्षात येते. इकडे फिलच्या मनोरंजनासाठी त्याला पीटरच्या रूपाने नवे खेळणे मिळाले आहे. काऊबॉइजच्या घोळक्यात पीटरच्या नाजूकपणाची खिल्ली उडवली जाते. घोड्यांच्या आसपास तो बावरेल हे लक्षात आल्यावर त्याला मुद्दामहून घोड्यांच्या कळपात सोडले जाते. पीटरची सगळ्यात मोठी जमेची बाजू ही आहे की, तो या सगळ्यात शांत आहे, स्वस्थपणे आजूबाजूच्या गोष्टी टिपून घेतोय. रांचवरच्या सशाला सापळा रचून पकडणारा पीटर शांतपणे त्याचे डायसेक्शन करून नोंदी करतोय. फिलने सुरू केलेल्या अपमान सत्राला तो बधत नाही. फिल कधी घरी अंघोळही करत नाही. गायी- गुरांच्या वासाने बरबटलेल्या फिलला आपण कधी स्वच्छ व्हावे असेही वाटत नसते. नाही म्हणायला नदीच्या एका निर्मनुष्य कडेला डुंबायला त्याला आवडते. याच डोहाच्या काठावर त्याने आपल्या आयुष्यातली काही गुपिते लपवून ठेवलीत. रांचवर भटकताना याच जागेचा आणि फिलच्या गुपितांचा शोध पीटरला लागतो. पीटरला आपल्या एकांताच्या ठिकाणावर बघून फिल पिसाटतो. पण पुढे तो स्वतःहून पीटरशी संवाद सुरू करतो. पीटरही त्याला प्रतिसाद देतो. पीटरला रांचवरचा काऊबॉय बनवण्याचा विडा फिल उचलतो. ज्या फिलने आपले आयुष्य नरक बनवले आहे, तो फिल पीटरला ताब्यात घेतोय, हे बघून रोझ कासावीस होते. पीटरला त्याच्यापासून सावध करायचा प्रयत्न करते, पण पीटर शांत असतो. इतकेच नाही तर ‘तुला मी पुन्हा आनंदी करीन’ असे आश्वासन देतो.

चित्रपटात कुठेही प्रत्यक्ष न दिसलेला ब्राँको हेन्री फिलच्या आठवणीत मात्र पुन्हा पुन्हा दिसतो. त्याचेच उदाहरण देत फिल पीटरला घोडेस्वारी शिकवतो. पीटरला पाण्यात पाहणारा फिल अचानक हळुवार बनतो, जणू पीटरमध्ये त्याला ब्राँको दिसतो. फिल भूतकाळाला, ब्राँकोला इतका पकडून का आहे, याची जाणीव कुठेतरी पीटरला होताना दिसते. आपल्या भावाचे, भावाच्या बायकोचे आयुष्य आपल्या उद्दाम वागणुकीने झाकोळणाऱ्या फिलने स्वतःच्या अस्तित्वाचा एक मोठा भाग जगापासून लपवून ठेवलाय. तो भाग लपवताना रांगड्या पौरुषत्वाचे कातडे ओढून घेतले आहे. तो बाहेरून जेवढा उद्दाम, रांगडा बनत चाललाय, आतून त्याचा एक भाग तेवढाच दाबला जातोय, असं त्याला वाटतंय. पण, पीटर आल्यावर त्याची दुखरी नस ठसठसते, तर कधी सुखावते. फिलला पीटरची काळजी वाटू लागते, त्याच्याबरोबर डोंगरांवर घोड्यावरून रपेट मारायला जावेसे वाटते. पीटर मेडिकल कॉलेजला परतायच्या आधी फिल त्याच्यासाठी गायीच्या कातड्यापासून बनवलेली रस्सी बनवायला घेतो. फिल आणि पीटरच्या विरोधाभासी वागण्याचे हे द्वंद्व अचानक पीटरला सशक्त आणि फिलला असुरक्षित बनवते. या द्वंद्वात विजय स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करणाऱ्या लैंगिकतेचा होतो. खरं तर चित्रपटाची कथा घडते त्या वेळी पीटर ज्या वयात आहे त्या वयात कदाचित त्याने स्वतःला लैंगिकतेच्या कोणत्याही एका चौकटीत टाकले नसावे. पण, ज्या निर्भयतेने तो जगाच्या तिटकाऱ्याचा, हिणवणुकीचा, तिरस्काराचा सामना करतो त्यामुळे तो फिलच्या तुलनेत उजवा ठरतो. फिलची भूमिका करणारा बेनेडिक्ट कम्बरबॅच एका सराईत रांचमनसारखा वावरतो. गुराढोरांबरोबर, घोड्यांबरोबर त्याचा वावर सहज वाटतो. त्याच्या उद्दामपणाची त्याला कोणतीही लाज वाटत नाही.

आपल्या वागण्यामुळे कुणी दुखावले जात असेल, याची तमा त्याला नाही. आपल्याला दूर करून भावाने एका बाईला महत्त्व दिले आहे, हे लक्षात आल्यावर तो ज्या पद्धतीने तिला पदोपदी त्रास देतो, तो दुष्टपणा बेनेडिक्टने अतिशय प्रभावीपणे रंगवला आहे. बेनेडिक्टसारख्या मोठ्या स्टारसमोर काम करताना पीटरची भूमिका निभावणारा कोडी स्मिट मकफी कुठेही कमी पडत नाही. उलट जेवढा बेनेडिक्ट लाऊड स्वरूपात दिसतो, तेवढाच तो शांतपणे आपल्या वाटेवर चालत राहतो. या चित्रपटातले दोन प्रसंग अविस्मरणीय आहेत. एका दृश्यात, दोन्ही बाजूंनी बायल्या म्हणून हेटाळणी होत असलेला पीटर शांतपणे चालत जात पक्ष्यांचे एक घरटे पाहतो आणि परततो. तर दुसऱ्या दृश्यात, पीटर बिडी वळून त्याचे झुरके घेत तीच बिडी फिलच्या ओठांवर टेकवतो. पहिल्या दृश्यातला जगाची तमा न बाळगणारा आणि दुसऱ्या दृश्यामधला फिलला स्वतःच्या मोहात पाडणारा पीटर भाव खाऊन जातो. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला घडणारे हे नाट्य एकविसाव्या शतकातल्या प्रेक्षकाला खूप काही सुचवते.

भक्ती चपळगावकर
bhalwankarb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...