आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Bhakti Chapalgaonkar Special Rashik Article | Touring Talkies | Maximus Finds His 'paradise'! | Marathi News

टुरिंग टॉकीज:...अन् मॅक्सिमसला त्याचा ‘स्वर्ग’ सापडतो !

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाला गोष्टींचा फार नाद. याच नादातून सिनेमाचा जन्म झाला. सिनेमा माणसांच्या, त्याच्या प्रेमाच्या, संघर्षाच्या, विफलतेच्या, विजयाच्या गोष्टी सांगू लागला. या गोष्टीत आपण आपलीच गोष्ट शोधू लागलो. त्यामुळेच मग कित्येकदा सिनेमा संपला, तरी आपल्याला लागलेली चुटपूट काही संपत नाही. अशाच काही उत्कट अनुभव देणाऱ्या देशी-परदेशी चित्रपटांचा, त्यातल्या पात्रांच्या अंतरंगाचा शोध घेणारे हे नवे पाक्षिक सदर...

हजारो वर्षांपूर्वी रोमन साम्राज्यात रोम शहरातल्या ‘कलोजियम’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या भव्य प्रांगणात मृत्यूचा खेळ खेळला जाई. या खेळात सहभागी होणाऱ्या योद्ध्यांना ‘ग्लॅडिएटर’ म्हटले जायचे. पन्नास हजार लोक एकावेळी हा खेळ बघायला जमा होत. प्रांगणाच्या मध्यात असलेल्या मंचावर शूर योद्धे आणले जात. त्यांना त्यांच्या आवडीची वेगवेगळी शस्त्रं पुरवली जात. त्यांच्यासमोर एकच आव्हान असे.. समोरच्या योद्ध्याला मारून टाकणे! जितके रक्त सांडले जाईल तितके लोक आनंदी होत. माणसाला रक्ताची इतकी हाव असू शकते?

आपण मात्र तसे वागणार नाही, असा विश्वास आधुनिक माणसाला आहे. रक्तातली ही हिंसा आजही त्याला चेतवते, हे कबूल करायला तो शरमतो. कलोजियममधल्या एका रक्तरंजित प्रसंगावर आधारित एक चित्र जगप्रसिद्ध दिग्दर्शक रिडली स्कॉट याने पाहिले. त्यातल्या योद्ध्याने द्वंद्व जिंकले आहे, त्याच्यासमोर त्याचा रक्ताने माखलेला प्रतिस्पर्धी पडला आहे, विजयी योद्धा सम्राटाकडे बघतोय, त्याला सम्राटाचा आदेश हवा आहे, थम्स अप की थम्स डाऊन? अंगठा वर तर प्रतिस्पर्ध्याला जीवदान मिळणार आणि अंगठा खाली झाला तर तो त्याला मारून टाकणार.. आणि सम्राटाने अंगठा खाली केला आहे. या एका चित्रातले नाट्य रिडलीला इतके भावले की, त्याने ‘ग्लॅडिएटर’ हा चित्रपट बनवण्याचे आव्हान स्वीकारले. आव्हान यासाठी की रोमन साम्राज्याची भव्यता, योद्ध्यांचे आयुष्य, इतिहासातले बारकावे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पात्रांची निर्मिती. सम्राट, सैनिक, योद्धे, राजकारणी.. हजारो वर्षांपूर्वी जसे होते तसे पडद्यावर दाखवणे.

या चित्रपटात मृत्यूच्या मैदानामध्ये केंद्रस्थानी आहे ‘मॅक्सिमस’. मॅक्सिमस रोमन सम्राट मार्क्स ऑरिलियसचा उजवा हात, त्याच्या सैन्याचा सेनापती. मार्क्सने पुकारलेल्या प्रत्येक युद्धाच्या हाकेला ओ देत त्याने त्याला विजय मिळवून दिला आहे. दुसरीकडे, सम्राटाचा मुलगा कमॉडस ऐशोआरामात रमलेला राजपुत्र आहे. त्याला साम्राज्याची धुरा दिली तर रोम लयाला जाईल याची जाणीव सम्राटाला आहे. म्हणून तो मॅक्सिमसला रोमचा सम्राट बनवू इच्छितो. पण, याची माहिती मिळाल्यावर कमॉडस सम्राटालाच संपवतो. इतकेच नाही तर मॅक्सिमसच्या बायको, मुलाला मारून त्यांचे मृतदेह लटकवतो. आपल्या कुटुंबावर आणि राजावर जिवापाड प्रेम केलेल्या मॅक्सिमसचे उद्ध्वस्त आयुष्य आणि सम्राटानेच आयोजित केलेल्या खेळातला ग्लॅडिएटर योद्धा बनून त्याने घेतलेला सूड याभोवती ही कथा गुंफलेली आहे.

मॅक्सिमसची भूमिका केलेला रसेल क्रो आणि कमॉडसची भूमिका केलेला वोक्वॅ फीनिक्स हे दोघं आपल्या भूमिका जगले आहेत. बाप साम्राज्यासाठी लढत असताना मौजमजा करणारा आणि त्याबद्दल कोणतीही अपराधी भावना नसणारा, बहिणीवर भावासारखे प्रेम न करता मालकी हक्क गाजवणारा, प्रियकर असणारा, वडिलांनी घेतलेल्या निर्णयामुळे दुखावला जाणारा आणि जनतेच्या प्रेमाचा, सैन्याच्या आदराचा भुकेला असा कमॉडस सगळ्या बारकाव्यांसह वोक्वॅने फार उत्कटपणे रंगवला आहे. वडिलांपाठोपाठ त्यांच्या लाडक्या मॅक्सिमसला संपवण्याची व्यवस्था करूनही तो जिवंत आहे, हे कमॉडसला कळते तेव्हा मॅक्सिमसचा संताप येण्याआधी सैन्याने त्याला मारून टाकल्याचे खोटे सांगितले. याचा अर्थ सैनिक आपला आदर करत नाहीत याचे त्याला अधिक दुःख होते. तरीही स्वतःला एक क्षणही बदलण्याचा प्रयत्न न करणारा कमॉडस आपल्या मतांवर ठाम आहे.

खरा चित्रपट मात्र रसेल क्रोने रंगवलेल्या मॅक्सिमसने खाऊन टाकला आहे. शौर्यधुरंधर सेनापती, सम्राटाने राज्य देऊ केले तरी ते नाकारणारा, आपल्या गावाकडे, घरी बायको-मुलाकडे परतण्यासाठी अधीर असलेला, सम्राटाच्या मृत्यूने बिथरलेला, बायको-मुलाच्या मृत्यूनंतर जगण्याची लालसा संपलेला आणि या सगळ्यांतून तावून सुलाखून कलोजियममध्ये अपराजित राहिलेला ग्लॅडिएटर योद्धा मॅक्सिमस रसेलने प्रभावीपणे उभा केला आहे. एकीकडे तो बायको-मुलावर प्रेम करणारा शेतकरी आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्या हातात सतत एक रक्ताने माखलेली तलवार आहे. ग्लॅडिएटर म्हणून कलोजियमच्या प्रांगणात (अरिनामध्ये) दिसेल त्याला संपवायचे एवढेच काम तो करतो.

एकेकाळी हजारो सैनिकांजवळ नेतृत्व केलेला मॅक्सिमस आपोआप ग्लॅडिएटर्सचा नेता बनतो. याचे आपण ऐकले की आपला जीव वाचेल याची जाणीव आधी त्याच्यासोबतच्या योद्ध्यांना होते आणि ते त्याच्या नेतृत्वाखाली लढू लागतात. जखमी अवस्थेत एका गुलामांच्या ताफ्यात दाखल झालेला मॅक्सिमस स्पेनचा आहे, अशा समजातून त्याला सगळे स्पॅनियर्ड म्हणू लागतात. रोमच्या गल्ली गल्लीत त्याच्या शौर्याच्या कथा रंगवल्या जातात आणि अशाच एका यशस्वी खेळानंतर नवा सम्राट आणि मॅक्सिमसचा शत्रू कमॉडस त्याला त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढून टाकण्याची आज्ञा करतो.

आधी मॅक्सिमस त्याला नकार देतो, पण नंतर स्वतःचा मास्क भिरकावून तो कमॉडसच्या समोर उभा राहतो. ‘मी मॅक्सिमस डेसिमस मेरिडियस, उत्तरेच्या सैन्याचा प्रमुख, फिलिक्स लीजन्सचा सेनापती, सम्राट मार्क्स ऑरिलयसचा सच्चा सेवक, एका हत्या झालेल्या मुलाचा पिता आणि हत्या झालेल्या एका बायकोचा पती आहे. मी सूड घेणार, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी..’ अशी गर्जना करतो. कमॉडसचा सगळा गर्व, आनंद त्या क्षणी संपतो आणि सुरू होते एक सूडयात्रा. तुरुंगात ठेवलेला गुलाम ग्लॅडिएटर मॅक्सिमस जिंकेल की दरबारी राजकारणाने पोखरलेला, बहिणीच्या जिवावर राज्य करणारा सम्राट कमॉडस जिंकेल या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना एका जबरदस्त नाट्यानंतर मिळते. पण, हे नाट्य अनुभवणारा प्रेक्षक मॅक्सिमसच्या माध्यमातून माणसाची जगण्यामागची प्रेरणा, त्याचा संघर्ष, त्याचा स्वर्ग, त्याचा नरक, त्याचा प्रतिशोध सगळे अनुभवतो.

मॅक्सिमस प्रतीक आहे, माणसाच्या जिवंत असण्याचे. त्याच्या संघर्षाचे, त्याच्या अंतिम ध्येयप्राप्तीचे. मृत्यूनंतर आपल्याला शांती मिळणार आहे, आपले गमावलेले प्रियजन भेटणार आहेत, असा त्याला विश्वास आहे. त्यामुळे पहिल्या फ्रेमपासून हा चित्रपट खरे तर मृत्यूशी जवळीक करतो. रिडली स्कॉटच्या मते, या चित्रपटाच्या केंद्रस्थानी मृत्यू आहे. एका मुलाखतीत तो म्हणतो, मी जेव्हा लोकेशन्सच्या शोधात होतो तेव्हा एका माझ्या एका सहकाऱ्याने शेतात डोलणाऱ्या गव्हाच्या ओंब्यांवरून हात फिरवला. कदाचित गव्हाच्या शेतात गेलेला प्रत्येक माणूस ते करतो.

पण, त्याच्या हाताकडे बघताना मला माझ्या चित्रपटाचा पहिला शॉट आणि मॅक्सिमसचे अंतिम ध्येय दिसले. हे शेत, हे घर, त्याची बायको आणि त्याचा मुलगा त्याच्यासाठी स्वर्ग आहेत. त्याचे आयुष्य या स्वर्गाच्या शोधात आहे. याच स्वर्गाचे वर्णन मॅक्सिमस सम्राट मार्क्सशी बोलताना करतो. तो म्हणतो, ‘इमरिटा ऑगस्टाच्या पलीकडे, डोंगरांच्या वस्तीत माझे घर आहे. फार लहान जागा आहे ती.. गुलाबी दगडी घरं सूर्यप्रकाशात तापतात. दिवसा परसदारच्या हिरवाईचा सुगंध, तर रात्री अंगणातल्या जाईजुईंनी परिसर धुंदावतो. बागेतील झाडं फळांनी डवरलेली आहेत.

माझ्या शेतातील माती, मार्क्स.. माझ्या शेतातील माती माझ्या बायकोच्या घनदाट केसांसारखीच काळी आहे.. दक्षिणेकडे द्राक्षांचे मळे, उत्तरेकडे ऑलिव्हचे.. माझ्या घराशेजारी जंगली घोडे संचार करतात, माझ्या लेकाशी खेळतात, माझ्या लेकाला त्यांच्यातलाच एक व्हायचे आहे..’ मॅक्सिमस बोलत असताना त्याचे डोळे चमकतात.. जणू तो त्याच्या गावी पोहोचला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीची ही भावना, हीच चमक त्याच्या डोळ्यात कलोजियमच्या मातीत शेवटचे क्षण मोजताना दिसते. मॅक्सिमसला त्याचा स्वर्ग सापडतो...

भक्ती चपळगावकर
bhalwankarb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...