आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Birth Control Kit: Aag Rameshwari, Bomb Someshwari |artical By Vandana Dhaneshwar

मधुरिमा स्पेशल:बर्थ कंट्रोल किट : आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी

वंदना धनेश्वर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीसोबतच्या शरीरसंबंधांना नकार दिल्यास जिथे प्रसंगी विवाहांतर्गत बलात्कार घडतात, बेडरूममध्ये बायकोच्या नकाराने नवऱ्याचा ‘पुरुषार्थ’ जिथे दुखावतो, स्त्रियांनी समर्पण केल्यास देशात बलात्कार होणारच नाहीत अशी बेमुवर्तखोर विधानं करणारे राजकारणी जिथे अाहेत तिथे प्रजनन दर नियंत्रणाच्या ‘उदात्त’ हेतूने महिलांचं समुपदेशन केलं जाणं हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे...‘कंट्रोल’ एकाच्या हाती अन् प्रबोधन दुसऱ्याचंच हीच प्रजनन दर नियंत्रण कार्यक्रमाची खरी शोकांतिका आहे...

उदा. १ : एका महिलेला २ अपत्ये. पहिला ८ वर्षांचा मुलगा, तर दुसरी ४ वर्षांची मुलगी. महिलेचे वय साधारणतः ३५. पाळी अनियमित झाल्यामुळे ती क्लिनिकला तपासणीसाठी गेली. सर्व तपासण्या झाल्यानंतर तिला दिवस गेल्याचे निदान आले. त्या महिलेचा यावर विश्वासच बसेना. कारण फक्त एकदाच कुठल्याही सुरक्षा साधनांशिवाय तिच्या पतीने तिच्याशी संबंध ठेवले होते. तिने नवऱ्याला यासंदर्भात हटकल्यावर, “एखाद्या वेळेस नाही वापरले तर काय फरक पडतो?’ अशी नवऱ्याची प्रतिक्रिया होती.

उदा. २ : राधाला दोन मुली. दोन्ही मुलींचा जन्म सिझेरियनद्वारे झाला. २ मुलींसाठी ५ वेळा ती गर्भपाताला सामोरं गेली होती. दरम्यान, एक दिवस अचानक तिची पाळी चुकली आणि ती गर्भवती राहिली. सगळ्यांनी उपदेश केला की, या वेळेस नक्की मुलगाच होईल. वंशाला दिवा नको का...? लेखाच्या सुरुवातीला सांगितलेली दोन्ही उदाहरणं माझी परभणीची वैद्यकीय तज्ज्ञ मैत्रीण डॉ. आशा चांडक हिने सांगितलेली. निमित्त होतं आमच्या दोघींमध्ये आशा सेविकांना दिलेल्या किटबद्दल झालेली चर्चा. ही उदाहरणं वरवर साधी दिसतात, मात्र दोन्ही उदाहरणांमध्ये एक गोष्ट समान आहे. आणि ती म्हणजे गर्भधारणेसंदर्भात संबंधित स्त्रीचं कुठलंच मत विचारात घेतलं न जाणं. स्त्रीला अनियोजित गर्भधारणेला सामोरं जावं लागणं.

ही उदाहरणं सांगण्याचं कारण म्हणजे राज्य सरकारने ग्रामीण भागातील आशा कार्यकर्तींना पुरुषाच्या रबरी जननेंद्रिय असलेल्या किटचं वाटप केलंय. जन्मदर नियंत्रण हा यामागचा उद्देश. यावर अनेक ठिकाणी नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. अगदी नैतिकतेचा वगैरे मुद्दाही मांडण्यात आला. वास्तविक महानगरांमधल्या आशा सेविकांना त्यात काही वावगं वाटत नसलं तरी ग्रामीण भागातल्या आशा सेविकांची अवस्था मात्र अवघडल्यासारखी झालीय.

ग्रामीण महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती करणे, त्यांना गुप्तरोग, शरीरशास्त्र, प्रजनन, लैंगिक शिक्षणासंदर्भात समुपदेशन, औषधोपचाराविषयीचे गैरसमज दूर करणेे हे आशा सेविकांचे मुख्य काम. भारताची लोकसंख्या, ग्रामीण भागातल्या सोयी-सुविधा आणि यंत्रणा या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर सद्य:स्थितीत या आशा सेविका या सरकारी आरोग्य यंत्रणा आणि ग्रामीण जनता यांच्यातला महत्त्वाचा दुवा आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात जिथे लैंगिकतेबद्दल, लैंगिक शिक्षणाबद्दल बोलणे निर्लज्जपणाचे मानले जाते अशा ठिकाणी आशाताईंच्या कामाचे महत्त्व आणि गरज ठळकपणे अधोरेखित होते. शिवाय, गर्भ नियंत्रणाच्या मार्गदर्शनासाठी पुरुष जननेंद्रियाच्या वापरावरून उडालेल्या संभ्रमामुळे आपला तथाकथित सुशिक्षित समाज आजही लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत किती

मागास आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेय. आणि त्यामुळेच बर्थ कंट्रोल किटवरून निर्माण झालेले (की करण्यात आलेले...?) शाब्दिक वादळ अर्थहीन वाटते. अर्थात, हे वादळ अर्थहीन वाटत असले तरी तथ्यहीन नक्कीच नाही. याचे कारण म्हणजे जनसामान्यांमध्ये जागृती आवश्यक , मात्र यासाठीचा जो टीजी अर्थात टार्गेट ग्रुप आहे त्याची निवड सर्वथा अयोग्य आहे. मात्र त्याबद्दल कुणीच बोलत नाही. पुरुष जननलिंग वापरून ज्या महिलांमध्ये प्रजनन दर कमी करणे, अनियोजित गर्भधारणा आणि गर्भपात टाळणे याबद्दल जागृती निर्माण केली जातेय, त्या महिलांचं शरीरसंबंध, गर्भधारणा यासंदर्भातलं मत किती जोडीदार विचारात घेतात? मुलं किती आणि कधी होऊ द्यायची, दोन मुलांमधलं अंतर किती असावं याबद्दल किती पुरुष बायकोशी संवाद साधतात? कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया जोडप्यापैकी नक्की कुणी करायची यावर किती दांपत्यांमध्ये निकोप चर्चा होते? कुटुंब नियोजनाची साधनं वापरण्याबद्दल किती पुरुष जागरूक आणि संवेदनशील असतात...? कळीच्या अशा अनेक मुद्द्यांवर मात्र वर्षानुवर्षे कुठलाच ठोस उपाय शोधलेला नाही.अमलात आणण्याचे कष्ट घेतले गेले नाही. आणि आता पुरुषी रबरी जननलिंग वापरून महिलांमध्ये प्रजनन दर नियंत्रणाचे प्रयत्न करणं म्हणजे ‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी’ अशातली गत आहे...कारण मुळात ज्या गोष्टींवर स्त्रियांचं (यामध्ये ग्रामीण, शहरी, निमशहरी अशा सगळ्याच क्षेत्रातल्या महिला) कुठलंच नियंत्रण नाही. त्यांना याबाबतीत नकाराची मुभाच नाही. त्याबद्दल त्यांच्यात जागरूकता निर्माण करून काय साध्य होणार आहे? फार दूर कशाला, मध्यंतरीच्या काळात बीडच्या माजलगावमधील एक ऊसतोड कामगार महिला स्वत:च्या १७ व्या प्रसूतीला सामोरं गेल्याच्या बातम्या झळकल्या. त्यावर चर्चा झाली. पण फलित शून्य. मागील दोन वर्षांत कोरोनाकाळात देशातल्या अनेक भागांतल्या महिला अनियोजित गर्भधारणांना सामोरं गेल्या. कुणाचा रोजगार हिरावला, कुणाला स्वत:ची व्यसनं करता आली नाहीत, तर कुणाला सातत्याने घरातच बसून राहावं लागल्याचं नैराश्य...अशा एक ना अनेक क्षुल्लक कारणांचा राग पुरुषांनी पत्नीवर काढला. कधी हा राग शारीरिक, मानसिक, भावनिक हिंसाचाराच्या वाढलेल्या टक्केवारीत दिसला, तर कधी लैंगिक अत्याचारातून उद्भवलेल्या अनियोजित गर्भधारणांमधून प्रतिबिंबित झाला.

पुरुषी अहंकार म्हणा किंवा लैंगिक सुखाच्या भ्रामक समजुतींमुळे म्हणा, कुटुंब नियोजनाची साधनं वापरणं पुरुषांना कमीपणाचं वाटतं. आजही देशात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची टक्केवारी अधिक आहे. अर्थात, महिला याकरिता स्वखुशीने पुढे येतात असा त्याचा अर्थ नाही. बहुतांश वेळा ‘पुरुषार्थ’ दुखावला जाईल म्हणून महिलांवर या शस्त्रक्रियांची सक्ती केली जाते. वास्तविक अशा शस्त्रक्रिया स्त्रियांपेक्षा पुरुषांनी करणं वैद्यकीय आणि आरोग्याच्या दृष्टीने अधिक सोयीचे ठरते. मात्र अज्ञानापायी महिलांनाच शस्त्रक्रियेसाठी भरीस पाडलं जातं. अन्यथा त्यांना गर्भधारणा किंवा गर्भपाताला सामोरं जावं लागतं. गर्भारपणाला अनेकदा बुरसट मानसिकतासुद्धा कारणीभूत असलेली दिसते. ‘एवढ्या मोठ्या कुटुंबात एखादं मूल काय जड नाही आम्हाला’ असं म्हणून महिलेला प्रसूतीसाठी भरीस पाडलं जातं. शिवाय अलीकडच्या काळात तर अमुक-अमुक समाजाची लोकसंख्या घटते आहे म्हणून अधिक मुलं जन्माला घातली पाहिजेत, अशा विचारसरणीमुळे महिलांवर गर्भारपण लादलं जातं. कधी ‘मुलं ही देवाघरची फुलं’ म्हणून, तर कधी ‘अल्लाह की देन’ म्हणूनही मुलं जन्माला घातली जातात. याशिवाय नवरा तलाक-घटस्फोट देईल या भीतीने महिला पतीसोबतच्या शरीरसंबंधांबद्दल, त्याने कुटुंब नियोजनाची साधनं न वापरण्याबद्दल तोंडातून ‘ब्र’ उच्चारत नाहीत. विरोध दर्शवत नाहीत.

आपण सगळेच अशा समाजाचा भाग आहोत, जिथे जन्माला घातलेल्या मुलाचं संगोपन करण्याची जबाबदारी सर्वस्वी बाईचीच आहे असा बिनडोकपणाचा समज आहे, गर्भारपणाला सामोरं जाणाऱ्या महिलेचं आरोग्य, तिची मानसिकता, तिची शारीरिक सक्षमता याचा विचार करण्याची कुणालाच गरज वाटत नाही. परिणामी लागोपाठच्या गर्भारपणामुळे, गर्भपातांमुळे महिलेचं आरोग्य खालावतं. आणि ही केवळ ग्रामीण भागातली, कमी शिकलेल्या महिलांचीच व्यथा नाही तर शिकलेल्या स्त्रियांचीसुद्धा कथा यापेक्षा वेगळी नाही. आणि म्हणूनच अशा पद्धतीचं किट वापरून महिलांमध्ये जागरूकता वाढवण्याऐवजी, महिलांना प्रजनन दर नियंत्रणाची माहिती देण्याऐवजी पुरुषांमध्ये जन्मदर नियंत्रण करणारी साधनं वापरणं, सुरक्षित लैंगिक संबंधं, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घ्यायला लावणं प्रसंगी त्याची सक्ती करणं यावर भर देणं ही खरी काळाची गरज आहे. मुळातच, ‘तुला काय अक्कल आहे यातली...’ असं ज्या बाईला प्रत्येक वेळी ऐकावं लागतं, तिला अशा समुपदेशनाची गरजच नाहीए. मात्र दुर्दैव असं की हे कळण्याइतकी साधी अक्कल ना यंत्रणेला आहे ना पुरुषांना...घोडं पेंड खातंय ते इथेच... संपर्क : ८४२१३१७६८२

बातम्या आणखी आहेत...