आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’च्या गोष्टी:लक्ष्मीची बरकत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही गोष्ट आहे सर्वांत दुर्लक्षित घटकांपैकी एका घटकाची...लक्ष्मीची. झालं असं की, मी एकदा ऑफिसमध्ये एकटाच काम करत बसलो होतो. एका फ्लॅटमध्ये असलेलं आमचं छोटंसं ऑफिस. दोन-तीन कॉम्प्युटर टेबल्स, त्यावर लॅपटॉप्स आणि इतर सामानसुमान. हल्ली ज्याला स्टार्टअप्स म्हणतात ना, तसाच सेटअप. ऑफिस बंद व्हायची वेळ उलटून गेल्यामुळे मी थोडा जास्त वेळ बसलो होतो. एक प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता. तेवढ्यात दार वाजलं. आता या वेळी कोण कटकट आली असेल, असा विचार करून मी वैतागतच दार उघडायला उठलो. दार उघडतो न उघडतो तोच पुरुषी, घोगऱ्या आवाजांचा कोलाहल अंगावर आला. समोर चारपाच जण. चणीने बांधा मजबूत. कॉटनची साडी, भडक लिपस्टिक लावलेली. मेकअपही केलेला. कानात मोठे डूल. हातात कुंकू भरलेला डबा आणि टाळ्यांचा मोठ्ठाला आवाज. खरं सांगायचं तर पहिल्यांदा घाबरलोच जरा. कारण ‘अशा’ लोकांपासून जरा दूरच राहायचं असं बाळकडू मला पाजलेलं होतं. त्यावर मी बरीच मात केली होती, नाही असं नाही. पण तरी संस्कारांचे काही ना काही अंश असतानाच ना उरलेले, ते असे वर येतात उफाळून. ‘क्यूं डरता है रे, डर मत... हम कुछ नहीं करेंगे...’ असं म्हणून पुढे उभ्या असलेल्या म्होरक्या व्यक्तीने माझी अलाबला काढली. मी किंचित मागे सरलो. तशी थोडी जागा झाल्याचं पाहून ती व्यक्ती थेट आतच शिरली. मी एकटाच होतो तिथे! ‘दे रे कुछ पैसा... दुआ करूंगी तेरे लिए...’ असं म्हणून एक टाळी वाजवून त्या व्यक्तीने हात पुढे केला. चांगला मोठा होता तो पुरुषी हात आणि रापलेला. हातातल्या बांगड्यांमुळे विचित्र वाटत होता. मी तिच्याकडे पाहत राहिलो. चेहऱ्यावर व्रण होते. काळा वर्ण. पण दात स्वच्छ शुभ्र आणि फार म्हणजे फार प्रेमळ हसू. मला मेघना पेठे यांच्या ‘आए कुछ अब्र’ कथेतला हिजडा आठवला त्या क्षणी. तिच्या हास्याने पहिल्यांदा मला जी थोडीफार भीती वाटली होती, ती बरीच ओसरली. मी आता जरा सैलावलो आणि म्हणालो, ‘एक मिनिट रुकिये जरा...’ टेबलाच्या ड्रॉवरमध्ये असलेलं पाकीट काढायला गेलो. तेवढ्यात दरडावण्याचा आवाज आला, ‘ए तुमी कसं काय आलात इथं? आँ? चला इथून निघायचं. आत्ताच्या आत्ता. नाही तर असले बांबूचे फटके हानीन ना बोच्यावर...’ सोसायटीचा वॉचमन तणतणत आला होता. ‘जरा काय टॉयलेटला गेलो... तेवढ्यात...’ ‘ए तू अगर हात उठाएगा ना तो हम क्या उठाएंगे देख ले...’ असं म्हणून साडी वर करायची धमकी त्या घोळक्याकडून देण्यात आली. ‘वाट लगेगी तेरी. ऐसी बद्दुआ दूंगी ना’ या आणि अशा बाचाबाचीने एकच गोंधळ झाला. त्यावर वॉचमन काहीतरी बोलला. ‘कुछ नहीं होता. चिवत्या समजा क्या मुझको. क्या करना है कर... च्यामारी...’ मी पाकीट घेऊन गेलो आणि हातानेच वॉचमनला शांत केलं. मी म्हणालो, ‘अहो, माणसंच आहेत ना ही. एवढं काय त्यात. साडीबिडी विकायला येणाऱ्यांना पाठवता ना तुम्ही तसंच...’ मला खरं तर समाजातल्या सर्वांत खालच्या थरात फेकून दिलेली माणसं असं काहीतरी म्हणायचं होतं. पण शब्द नीट सुचले नाहीत आणि ती वेळ लेक्चर देण्याची नव्हती. मला ते द्यायचंही नव्हतं. त्याने ‘ही आणि माणसं... थू तिज्यायला,’ म्हणत नाक उडवलं. ‘साहेब, तुम्ही यांच्याकडे लक्ष नका देऊ. यांचं काय करायचं ते मी पाहतो.’ मी म्हणालो, ‘तुम्ही जा इथून. मी माझं पाहून घेईन.’ तसा वॉचमन माझ्याकडे ‘माणूस आहे की कोण? येडाबिडा झालाय का?’ अशा नजरेनं पाहत निघून गेला. मी पाकिटातून एक नोट काढत दिली. नाव विचारलं. ‘लक्ष्मी नाम है मेरा,’ उत्तर आलं. नोटेकडे पाहत ती म्हणाली, ‘साहब इतने से क्या होएंगा हमारा. रेशन भी नहीं आएंगा, दया करो.’ मी म्हणालो, ‘नहीं ये ठीक है.’ लक्ष्मी परत काहीतरी म्हणाली, ‘हम चार लोग हैं साब....’ ‘देखो. मैं ये दिल से दे रहा हूँ.’ असं मी म्हणालो तेवढ्यात लक्ष्मीने आपला डबा उघडला. त्यातलं कुंकू माझ्या कपाळाला लावलं. राकट होता तिच्या बोटाचा स्पर्श. मग डब्यातून एक नाणं काढून त्यावर थोडं कुंकू लावलं आणि मग ते नाणं, माझी नोट मलाच परत केली. म्हणाली, ‘साब, तुम, तुम्हारे बच्चे अगर पिझ्झा खाए तो कितना पैसा लगेगा? तुम ही सोचो. हमे रेशन चाहिये. आज कुछ नहीं मिला. ये देखो.’ असं म्हणून तिने ब्लाऊज बाजूला करून जिथे पैसे ठेवतात तिथे बोट केलं. ‘तुम्हारे जैसा मै लिखापढा होता तो भीख क्यूं मांगता ना? इधर बैठके कम्प्युटर चलाता ऐसेईच.’ असं म्हणून तिने बोटांनी कीबोर्डवर टाइप करण्याची खोटी खोटी कृती केली. ‘साब, ज्यादा बकवास नहीं करूंगी. लेकिन में छोटा था, तब मेरे आईबाबूने मुझे छोड दिया ऐसे ही. क्यूंकि मैं अलग था ना इसलिए. हम अमीर नही थें, लेकिन खातेपीते घरके थे. अगर में इस्कूल में जाता, पढता लिखता तो ऐसा तालियां बजाता नहीं आता इधर. बाबू बनता मैं. ठीक... नसीब अपना अपना. अब एक बार आप सोचो, अगर आपको घरवालोंने छोडके रख्खा होता, तो क्या आप आज जो हैं वो होते? अच्छा है आपको नहीं छोडा. किसी बच्चे को नहीं छोडना चाहिए.’ लक्ष्मीच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तिच्या टपोऱ्या डोळ्यांत ते साठून राहिलं आणि टचकन खाली पडलं. मी पुन्हा पाकिटात हात घातला. तशी ती हातानेच नाही म्हणाली, ‘साब, ये नोट और सिक्का आपके पास रखना, जेब में. ये हिजडे की दुआं है. बरकत आएगी आपको, लक्ष्मी सदा आपके साथ रहेगी, साब. याद रखना,’ तिने मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, अलाबला घेतली आणि ‘जाताय,’ म्हणून निघून गेली. बरकतीचं माहीत नाही, पण लक्ष्मी मी मनात जपून ठेवलीय....

प्रणव सखदेव संपर्क : 762088146

बातम्या आणखी आहेत...