आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा स्पेशल:‘बॉडी शेमिंग’ची ऐसी की तैसी!

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्यापैकी कितीतरी जण इतरांच्या नजरेतून स्वत:कडे बघतात. स्वत:च्या शरीराकडे बघतात. परिणामी समाजमान्य सौंदर्याच्या निकषांमध्ये न बसल्यामुळे स्वत:चं जगणं अवघड करून घेतात. जगात कुणीही परिपूर्ण नाही हे वास्तव स्वीकारून स्वत:ला आहे तसं स्वीकारलं, स्वत:वर प्रेम केलं तर आयुष्यं हरनाम आणि शायजा यांच्यासारखं भरभरून जगता येऊ शकतं...

जा ड्या, बुलडोझर, म्हैस, बारक्या, हडकुळ्या, चिवळ्या, बुटक्या / काळ्या, लुकड्या, लंबूटांग, नांगराचा फाळ, फावड्या, नकट्या हे असे शब्द आपल्याला नवीन नाहीत. आजूबाजूचे संवाद जरा लक्ष देऊन ऐकले की या प्रकारचे शेकडो शब्द आपल्या कानावर पडतात आणि हे आपल्या इतक्या सवयीचं झालेलं असतं की, एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असताना हेच विशेषण म्हणून सहज आणि नकळत वापरलं जातं. ‘अरे, ती नाही का, ती जाडी..’ किंवा ‘तो नाही का, मरतुकडा..’ आणि त्यापुढे जे सांगायचं असेल ते सांगितलं जातं. माघारीच नाही तर तोंडावरसुद्धा असेच सहज संबोधले जाते. अनेकांना कल्पनाही नसते की, ही विशेषणे नसून असे शब्द वापरून आपण बॉडी शेमिंग करत आहोत, हा समोरच्या व्यक्तीचा अपमान आहे. अनेक जण तर हे मुद्दाम आणि ठरवून करतात.

एखाद्या व्यक्तीची त्याच्या शारीरिक ठेवण, रंग, रूप, उंची, वजन यासारख्या गोष्टींवरून मस्करी करणे हे बॉडी शेमिंग आहे आणि हा प्रकार आपल्याकडे तसा नवीन नाही. आजूबाजूला जेव्हा असे शब्द सर्रास कानावर पडतात, तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासाठी वापरले गेले तरी सामान्यतः हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो. विरोध केला तर चिडवणाऱ्याला अधिक चेव येतो. कधीतरी या गोष्टी दुर्लक्षित केल्या जात असल्या तरी वारंवार घडत असतील तर मात्र त्याचा खूप त्रास व्हायला लागतो, प्रचंड चीड यायला लागते. खिल्ली उडवणाऱ्यांना जरी यात आनंद मिळत असला तरी ज्याची खिल्ली उडवली जाते, त्या व्यक्तीच्या मनावर याचा दूरगामी व खोल परिणाम होतो. यामुळे आत्महत्या केल्याची पण उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. खरं तर कोणत्याही चांगल्या समाजात बॉडी शेमिंगला अजिबातच जागा नसावी. मात्र अनेकदा अनेकांना याचा सामना करावा लागतो. म्हणतात ना ‘We are our own worst critic’ तसंच काहीसं हे आहे.

पाश्चिमात्य संकल्पनांतून आलेले, दूरचित्रवाणी, सिनेमाच्या माध्यमातून पसरवलेले गेलेले सौंदर्याचे फोल मापदंड आपण शतकानुशतके अंधानुकरण करत पुढे नेत आहोत, ही खरी दुर्दैवाचीच गोष्ट आहे. प्रसारमाध्यमांनी सामान्यत: जास्त वजन असलेल्या पात्रांना शोचा ‘रनिंग जोक’ म्हणून चित्रित केलेले आढळते. परिणामी ‘फॅट जोक्स’ मारले जातात. कैक सौंदर्य प्रसाधन कंपन्यांनी लोकांना वेड्यात काढून न्यूनगंडाने पछाडून टाकले आहे. आपण तथाकथित सौंदर्य निकष चाचपडत पाण्यासारखा पैसा वाया घालतो आणि कंपन्या करोडो कमावतात हा भाग तर वेगळाच. ज्यांना हे शक्य नाही त्यांची मनोवस्था बिकट होत जाते. त्यातून अनेक गंभीर मानसिक आजार उद्भवतात. या बॉडी शेमिंगमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आयुष्यभर न्यूनगंड पाळले जातात आणि बलस्थानं दुर्लक्षित राहतात. व्यक्तिमत्त्व विकास खुंटतो. वास्तवात कुणीच परिपूर्ण नसते याचा विसर आपल्याला पडतो. तथाकथित मापदंड पाळणाऱ्या चौकटीत आपण जगतो आणि त्यापेक्षा जरा काही वेगळं असलं, केलं की फक्त आश्चर्यच व्यक्त होत नाही तर बोंबाबोंब होते. ट्रोल केलं जातं. हिणकस टिप्पण्या केल्या जातात. अनेक सिनेकलावंतांना याला नेहमीच सामोरं जावं लागतं. पण हरनामकौर दाढी तर केरळातली शायजा मिशी राखून आहेत. सामान्य लोकांमधून आलेले हे चेहरे आज लोकांना चांगलेच परिचित झाले आहेत. समाजमाध्यमात सध्या त्यांची वाहवा होत असली तरी हा प्रवास त्यांच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. २०१६ साली हरनामकौर या बॉडी पॉझिटिव्ह कॅम्पेनरचं नाव सर्वात तरुण दाढी राखणारी स्त्री म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेलं, तर शायजा मिशी राखून स्वतःवर भरभरून प्रेम करते आहे. या दोघींकडून बॉडी शेमिंगला बळी ठरलेल्यांनीच नाही तर बुरसटलेल्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समाज गटानेही घ्यावी तितकी प्रेरणा कमीच आहे. मुलींच्या / महिलांच्या बाबतीत हे बॉडी शेमिंग जास्त दिसत असल्याने ही दोन महिलांची उदाहरणं दिली आहेत. मला असं कुठेही म्हणायचं नाहीये की पुरुष/मुलं याला अपवाद आहेत. या दोन प्रातिनिधिक उदाहरणांबाबत बोलायचं असेल तर यांना हे का शक्य झालं हे शोधलं पाहिजे. अजूनही यांच्या रील्स खाली, व्हिडिओखाली हिणकस आणि विकृत कमेंट वाचायला मिळतात. फुकट दिलेले नसते सल्ले असतात. जिथे-तिथे डोकावून बडबडणारे लोक हा आपल्या दुटप्पी समाजाचाच चेहरा आहेत. यासारख्या गोष्टींमुळे आत्मसन्मानाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. सामाजिक दबावामुळे विशिष्ट रूपात दिसण्याची इच्छा, विवाहेच्छुक असतील तर विशेषतः मुलींच्या खानपानावर, रंगरूपावर करडी नजर ठेवलेली दिसते. मात्र, या दोघींना आणि यासारख्या स्वतःला आहोत तसं स्वीकारणाऱ्या अनेकींना हे समजलेलं आहे की, काहीही केलं तरी टीका होणारच आहे. आपल्याला जे पटतं ते आणि जे आहे, ज्यात बदल हो‌ऊ शकत नाही ते किमान मोकळ्या मानाने स्वीकारायला हवं, जेणेकरून भरभरून आयुष्य जगता येईल. लोकांना काय वाटतं, ते काय बोलतात, त्यांना आवडतं की नाही याने त्यांच्यावर, त्यांच्या स्वप्रतिमेवर फरक पडत नाही. इतरांच्या उणिवांवर हसणारे, व्यंगावर बोलणारे, त्यांचे आजार, त्यांच्या गरजा, त्यांची परिस्थिती, त्यांच्या मतांचा आदर यातलं काही समजून घेण्याइतकी समानुभूती अशा लोकांमध्ये नसते तेव्हा अशांच्या मताला आपण किती महत्त्व द्यायचं हे ठरवता आलं की अनेक गोष्टी सोप्या होतात. आपण जोपर्यंत इतरांच्या नजरेतून स्वतःकडे पाहणं बंद करत नाही तोपर्यंत त्रास कमी न होता वाढतच जातो.

कोणत्याही परिस्थितीत स्वतःला आत्मविश्वासाने कॅरी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तेव्हाच जमतं जेव्हा स्वतःवर व्यक्तीचं प्रेम असतं. व्यक्तीने स्वतःला स्वीकारलेलं असतं. या समाजाचा आपण एक भाग असल्याने त्याचा परिणाम आपल्यावर होतो, नकारात्मक गोष्टी त्रासदायक ठरतात. समाजमान्यतेसाठी धडपड केली जाते. हे सगळं मान्यच आहे. पण या चौकटीबाहेरचं काही आपल्या वाट्याला येत असेल, आलं असेल तर त्याला आपली उणीव म्हणत रडत बसायचं की त्याचं वेगळेपण मान्य करून पुढे जायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं लागतं. यातून बाहेर पडण्यासाठी स्वस्वीकार, स्वप्रेमासोबतच स्वत:ला त्रास होऊ नये म्हणून स्वत:ची काळजी घेणं, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं, मानसिक क्षमता सुधारण्यासाठी दिनचर्या व्यवस्थित आखून कामांचं नियोजन करणं, व्यायाम, योग, मेडिटेशन यांचा दिनचर्येत अंतर्भाव करणं गरजेचं ठरतं. निसर्ग हा सगळ्यात मोठा मार्गदर्शक आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने सकारात्मक संप्रेरकांची वृद्धी व्हायला मदत होते. बॉडी शेमिंगला बळी न पडता स्वतःला सिद्ध करणं, यातून बाहेर पडणं सातत्यपूर्ण प्रयत्नातून सहजसाध्य होऊ शकतं.

डॉ. निशिगंधा व्यवहारे संपर्क : v.nishigandha@gmail.com

बातम्या आणखी आहेत...