आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्थ डायमेन्शन:बोल री कठपुतली बोल...

भारती गोरे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रियांचे शोषण करणाऱ्या पितृसत्ताक व्यवस्थेच्या रक्षणाची सर्व जबाबदारी किती शिताफीने स्त्रियांकडूनच वाहून घेतली जाते. जेव्हा जेव्हा स्त्रीच्या माणूसपणाला अधोरेखित करणारे कायदे आले, त्यांचा विरोध स्त्रियांनीच केल्याचा इतिहास आहे...

ए वढ्या गर्दीमध्ये साडेचार-पाच वर्षांच्या त्या चिमुरडीकडे लक्ष गेलं. अवघी दीड-दोन फुटांची ती काया. सलवार-कुर्ता घातलेला. गोबरे-गुलाबी गाल. उगाच वाटलं, हिचे केस कुरळे असतील. विचारलं, ‘आपके बाल घुंघराले हैं क्या बेटा?’ आणि हात तिच्या गालाला स्पर्श करण्यासाठी नकळत पुढे गेले तर नुकतीच बोलायला शिकलेली ती छोकरी किंचाळली, ‘हिजाब मत छूना आंटी. हिजाब अल्लाह ताला का हुक्म है.’ मग कुठे माझं लक्ष तिच्या केसांना पूर्ण झाकणाऱ्या हिजाबकडे गेलं. बुरखा घातलेल्या आईचे बोट पकडलेली ती छकुली धर्मरक्षक बनली होती. तिची अम्मी अभिमानाने तिची पाठ थोपटत होती. माझ्या काळजात खोल कळ आली.

सुप्रीम कोर्टाने नुकताच दिलेला निर्णय आठवला की हिजाब इस्लामचा भाग नाही. जगातले शेकडो असे आधुनिक देश आठवले, जिथे हिजाबला बंदी आहे. मग आपल्याकडे यावरून उठलेले रान आठवले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य आणि संविधानाने दिलेले अधिकार सांगणारे शब्द आठवले. नाकावर ओघळणाऱ्या सिंदूरचा कोण अभिमान बाळगत हातभर घुंघट घेत, ‘अपने धरम की रक्सा हम नहीं तो कौन करेगा?’ म्हणणारी वाराणसीमध्ये भेटलेली नयी दुल्हन आठवली. ‘बिकिनी, हिजाब वा घुंघट... आमचा चॉइस आहे’ असे म्हणणाऱ्या स्त्रियांचा मुद्दा अगदी रास्त.

हिजाब वा घुंघट फॅशन वा ऊन-वाऱ्यापासून वाचवणारं केवळ एक वस्त्र असेल तर खरंच वाईट नाही. चॉइस म्हणून बायका ते वापरूच शकतात, पण खरी गोम इथेच तर आहे. नेमका हाच तर मुद्दा आहे की हा तुमचा चॉइस नाहीये. तुम्हाला माणूसपणापासून दूर खेचत व्यवस्थेने तुमच्यातील जी स्त्री ‘घडवली’ त्या स्त्रीचा हा चॉइस आहे. तसं नसतं तर शिक्षणाचा बळी देणारी ‘पहले हिजाब, फिर किताब’ ही घोषणा तुम्ही दिली नसती. ‘कीमती सामान परदे में रखा जाता है’चे समर्थन करत स्वतःच्या ‘सामान’ असण्यावर शिक्कामोर्तब केले नसते.

मुस्लिम मुलींमध्ये अक्षरशः नगण्य असलेलं शिक्षणाचं प्रमाण, स्वतःच्या अधिकारांबाबत असलेले अज्ञान, रोजगार तर दूरची गोष्ट.. किती भयंकर आहे हे... एकविसाव्या शतकात श्वास घेत सोळाव्या शतकाचे नियम वाहणं. आकडेवारी वगैरे मला माहिती नाही (ती गुगलबाबाकडून सहज मिळेल.) पण गेली वीस वर्षे मी शिक्षकी पेशात असूनही मी निव्वळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या मुस्लिम मुली शिकताना पहिल्या. कमाल म्हणजे ज्या थोडंफार शिकल्या त्यापैकी बऱ्याच जणींचा मी फक्त आवाज ओळखते, चेहरा नाही. कारण त्यांनी माझ्यासमोरही कधी बुरखा काढला नाही. अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या स्त्रिया हिजाब नको म्हणून आंदोलन करत आहेत आणि आमच्याकडच्या लेकीबाळी हिजाबसाठी आग्रही आहेत. या आग्रहापोटी कोणी त्यांना लाखोंची बक्षिसं देत आहेत, कोणी सत्कार करत आहेत, कुठे-कुठे इमारतींना त्यांचं नाव दिलं जात आहे. बक्षिसांची अशी खैरात वाटणाऱ्यांनी कधी शिकलेल्या-शिकू पाहणाऱ्या पोरीला एक दमडी तरी दिली असेल का? डॉ रझिया पटेलांनी एकदा या बायकांना विचारले, “तुम्हाला कायदेशीर अधिकार असावे वाटत नाही का?’ त्यांना उत्तर मिळालं- “हमारी कौम ही नहीं बचेगी तो अधिकार लेकर क्या करेंगे?’

कमाल आहे या पितृसत्ताक व्यवस्थेच्या चलाखीची... स्त्रियांचे शोषण करणाऱ्या या व्यवस्थेच्या रक्षणाची सर्व जबाबदारी किती शिताफीने स्त्रियांकडूनच वाहून घेतली जाते. जेव्हा जेव्हा स्त्रीच्या माणूसपणाला अधोरेखित करणारे कायदे आले, त्यांचा विरोध स्त्रियांनीच केल्याचा इतिहास आहे. वर्षानुवर्षे परिश्रम घेऊन डॉ. आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल तयार केले त्याचा सर्वाधिक विरोध हिंदू स्त्रियांनीच केला. स्त्रियांना संपत्तीचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, पुनर्विवाहाचा अधिकार असे कैक अधिकार देणाऱ्या बिलाविरुद्ध त्या वेळी प्रसिद्ध समाजसेविका (?) सुंदरी देवीने लिहिले की, हिंदू कोड बिल सनातन धर्मावरील आघात आहे आणि यामुळे (म्हणजे स्त्रियांना अधिकार दिल्यामुळे) सामजिक-धार्मिक-कौटुंबिक जीवनात उलथापालथ होईल. या सुंदरी देवी त्या काळी एमए होत्या...

अरेच्चा, अजून एक चित्र डोळ्यापुढे येते आहे. तीन तलाक रद्द करणाऱ्या कायद्याचा निषेध करण्यासाठी मुस्लिम स्त्रियांनी ‘स्वतःहून’ मुंबईत काढलेला अतिविशाल मोर्चा आठवतोय. ‘खुदा के बाद हमें शौहर का हुक्म मंजूर है और जो औरत शौहर की खिलाफत करेगी, कभी जन्नत न पा सकेगी’ असं म्हणत तलाक देऊन वाऱ्यावर सोडणाऱ्या नवऱ्याची बाजू घेऊन भांडणाऱ्या बायका तिथे खच्चून भरल्या होत्या.

थोडक्यात काय तर धर्म हिंदू असू दे, मुस्लिम असू दे वा इतर कोणता, धर्म आणि ही व्यवस्था वाचवण्याची जबाबदारी बाईची.. आणि आपला बोलविता धनी कोण याचा मुळी थांगपत्ताच नसलेल्या बायका आपल्या मूलभूत अधिकारांवर पाणी सोडत धर्मरक्षणासाठी कंबर कसून उभ्या राहतात. धर्माचे ‘धर्मवीर’ धर्मरक्षणाची बंदूक स्त्रियांच्या खांद्यावर ठेवूनच चालवतात आणि स्त्रिया ती चालवू देतात. नव्हे, त्यात पुढाकार घेतात. गुलामाला गुलाम राहण्यातच धन्यता वाटत असेल आणि व्यवस्थेने घडवलेली कळसूत्री बाहुली बनून गुलाम ‘संस्कृती’ आणि ‘धर्म’ यांचे रक्षण करण्यासाठी प्राण पणाला लावत असेल तर कायदे बिचारे काय करणार?

समोर ‘मुगल-ए-आझम’ सुरू आहे. ‘जब प्यार किया तो डरना क्या?’ गाण्यात लता मंगेशकरांचा सुरेल सवाल ‘परदा नहीं जब कोई खुदा से, बंदों से परदा करना क्या?’ ऐकतेय... स्त्री असो वा पुरुष, त्याच्या माणूसपणाला महत्त्व देणारे धर्मातील हे खरे तत्त्वज्ञान आमच्यासारख्या कळसूत्री बाहुल्यांना उमजणार नाही तोवर आम्ही बायका व्यवस्थेच्या वतीने बोलतच राहणार ... संपर्क : drbharatigore@gmail.com

बातम्या आणखी आहेत...