आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथार्थ:अग्नीपरीक्षेचे वेळापत्रक : कवितेचे नवे सौंदर्यविश्व

2 वर्षांपूर्वीलेखक: पी. विठ्ठल
  • कॉपी लिंक

मराठी कवितेला सर्वार्थाने संपन्न करणारे एक प्रतिभावंत कवी म्हणून डॉ. यशवंत मनोहर यांची ओळख आहे. भूमिकानिष्ठ लेखन करून आंबेडकरी विचाराला एक नवं परिमाण आणि सौंदर्य डॉ. मनोहर यांच्या कवितेने दिलेच; पण एक मोठा वैचारिक हस्तक्षेपही त्यांनी मराठी कवितेत केला आहे. त्यांचा नुकताच 'अग्नीपरीक्षेचे वेळापत्रक हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. हा संग्रह 'इहवादी' सममूल्यतेचा पर्याय आपल्यासमोर ठेवतो.

मराठी कवितेला सर्वार्थाने संपन्न करणारे एक प्रतिभावंत कवी म्हणून डॉ. यशवंत मनोहर यांची ओळख आहे. भूमिकानिष्ठ लेखन करून आंबेडकरी विचाराला एक नवं परिमाण आणि सौंदर्य डॉ. मनोहर यांच्या कवितेने दिलेच; पण एक मोठा वैचारिक हस्तक्षेपही त्यांनी मराठी कवितेत केला आहे. 'उत्थानगुंफा' पासून ते 'अग्नीपरीक्षेचे वेळापत्रक' हा त्यांचा सुमारे पाच दशकांचा लेखनप्रवास पाहिला की थक्क व्हायला होते. त्यांनी केवळ कविताच लिहिली नाही, तर समीक्षा, सौंदर्यशास्त्र, साहित्यविचार, लघु कादंबरी, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनानेही समकालीन साहित्य व्यवहाराला एक नवी दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांचा नुकताच 'अग्नीपरीक्षेचे वेळापत्रक हा 'भव्य' कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. 'भव्य' हा शब्द मी संग्रहाच्या आकारासाठी वापरलेला नाही, तर काळाला व्यापून टाकणारा एक 'बृहद विचार' या कवितेत सामावलेला आहे म्हणून वापरलेला आहे. हा संग्रह 'इहवादी' सममूल्यतेचा पर्याय आपल्यासमोर ठेवतो. डॉ. मनोहर यांची ही इहवादी भूमिका सर्वश्रुत आहेच. या कवितेतलं तत्त्वचिंतन मानवतेचं सौंदर्यशास्त्र मांडणारं आहे. म्हणूनच कवीच्या एका विशिष्ट जीवनदृष्टीचा परिचय करून देणारा हा संग्रह मराठी कवितेतील अलीकडच्या काळातील एक अभूतपूर्व निर्मिती म्हणायला हवी.

अर्थात यापूर्वीचे त्यांचे समग्र लेखन ज्यांनी वाचले आहे, त्यांना मनोहरांची विचारनिष्ठा अपरिचित असण्याचे काहीच कारण नाही. समाजव्यवस्थेच्या परंपराधिष्ठित प्रतिगामी प्रारूपाचा त्यांनी अनेकदा वेध घेतला आहे. इथल्या तमाम सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणाची त्यांनी पुनर्तपासणी केली आहे. केवळ पुनर्तपासणी केली असे नाही, तर त्यांनी नव्या व्यवस्थेचा समताधिष्ठित पर्यायही समोर ठेवला आहे. 'पेरियार रामस्वामी नायकर, कवी केशवसुत आणि कवी बरटोल्त ब्रेख्त यांच्या व्यवस्थान्तराच्या ध्यासाला कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेला हा संग्रह मानवी अस्तित्वाच्या बाजूने बोलतो. 'कवी देतो/ मृत्यूला पर्याय / म्हणूनच कवीला नसतो पर्याय ' (पृ.११) कारण कवीच समाजव्यवस्थेच्या तमाम संहितेची चिकित्सा करतो. ही मनोहरांची धारणा आहे. या धारणेतून किंवा मनोभूमिकेतूनच ते समग्र व्यवस्थेतल्या आंतर्विरोधाला, असमतेला, धर्म आणि जातीय राजकारणाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ही कविता एका प्रखर बुद्धिवादी कवीची कविता आहे. बुद्ध ते आंबेडकर हे या कविताविश्वाचे प्रेरणाप्रवाह आहेत. संविधान मूल्य हा या कवितेचा गाभा आहे. एकूण पंचावन्न कवितांमध्ये सामावलेल्या या मूल्यविचाराला समजून घेणे म्हणजे आधुनिक राष्ट्रविचार आणि लोकशाहीयुक्त समाजरचनेला समजून घेणे होय. ही कविता भलेही राष्ट्रवादाचे नवे सिद्धांत मांडत नसली तरी नव्या जीवनमूल्यांचे विचारसंचित मात्र आपल्यापुढे अत्यंत प्रभावीपणे ठेवते. विविध राजकीय विचार प्रवाहांचे आणि त्यांच्या उन्मादाचे अधोरेखन करतानाच त्यांच्या धर्मातिरेकालाही समोर ठेवते.

बुद्ध हे या संग्रहातलं एक महत्त्वाचं चिंतनक्षेत्र आहे. 'मी वाचतो आता बुद्धाचे डोळे/ मी वाचतो त्यातली आसवे/ आणि वाचतो त्यातले युद्ध / तृष्णला नामोहरम करणारे/ मी वाचतो बुद्धाच्या डोळ्यातला बुद्ध/ वाचतो त्यांचे अत्तदीपत्वाच्या संविधानाचे प्रिॲम्बल '(पृ.८५) बुद्ध म्हणजे आत्मतेजाचे भव्य प्रतीक. कवीच्या जीवनजाणिवेत बुद्ध असणे या घटनेला अनेक अर्थाने महत्त्व आहे. विशेषतः आजच्या अस्वस्थ वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर हा विचार अधिक प्रेरक आणि महत्त्वाचा वाटतो. बुद्धाच्या संवेदनशीलतेने कवी माणसाच्या दुःखमय अस्तित्वाचा आणि त्याच्या नव्या स्थित्यंतराचा शोध घेतात. त्याच्या आर्थिक आणि राजकीय आणि सांस्कृतिक सत्तेला प्रतिसाद देतात. दैववाद नाकारतात आणि एक सुसंगत अशी नवी जीवनदृष्टी देण्याचा प्रयत्न करतात. समाजस्वास्थ्याला बाधा आणणाऱ्या तथाकथित विचारांचा प्रतिवाद करून आत्मस्नेहाचा, सहिष्णुतेचा विचार या कवितेतून मांडतात. कोणत्याही अनैतिक अहंकाराला इथे स्थान नाही. खरं म्हणजे 'अग्नीपरीक्षेचे वेळापत्रक' हे एक सम्यक क्रांतीचे व्यापक निरूपण आहे. जे वाचकाला त्याच्या वास्तवरूपाचे आकलन करून देते. या संग्रहात 'नदीमाय' कवितेतून तर कवी नदीविषयीची आस्था इतक्या प्रांजळपणे मांडतात की, आपणही नदीच्या प्रवाहात अलगद उतरत जातो. आपल्या अनुभवाला आपल्या सांस्कृतिक संचितापर्यंत घेऊन जाणारा हा प्रवास लक्षणीय स्वरूपाचा आहे. 'मानवी जीवनाच्या शोधात / भटकणार्या माणसांनी / वाहत्या नद्यांच्या काठावर / मानवी जीवनाची क्षितिजे तयार केली' (पृ.२१)आणि 'तीर्थांमुळे नद्यांच्या वाट्याला रडणे आले' (पृ.२२) या एका महत्त्वाच्या सत्याला मनोहर उजागर करतात. खरंतर डॉ. मनोहर यांची संपूर्ण कविता ही हस्तक्षेपाची कविता आहे. शासनसत्तेचा अधिक्षेप वाढत गेला तर काय काय घडू शकेल? याचे सूचनही ते करतात. 'हे असेच सुरू राहिले तर / हुबेहूब माणसांप्रमाणे दिसणाऱ्या / प्रेतांचा समाज निर्माण होईल' (पृ.५९) ही भीती ते व्यक्त करतात. व्यक्ती आणि समाजाच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारे सरकार असेल तर असे नक्कीच घडू शकते, असे त्यांना वाटते. या संग्रहातल्या बहुतेक कविता दीर्घ आहेत आणि या सर्वच दीर्घ रचनांचा आशय सामाजिक असाच आहे. 'बुडती हे जन, न देखवे डोळा' ही तगमग या निर्मितीमागे आहे. आपल्याला हवी तशी प्रतीके निर्माण करून ती सर्वसामान्यांवर लादणे किंवा त्यांना गृहीत धरून नवीन व्यवस्था निर्माण करणारे 'अध्यादेशपर्व ' आकाराला आले की, कवीची अस्वस्थता वाढणे स्वाभाविकच आहे. हे प्रत्येक काळात घडले आहे. संतांनी केलेले बंड त्यादृष्टीने लक्षात घ्यायला हवे. कोणताही विचारी माणूस अशावेळी गप्प बसणार नाही. 'तुम्ही लोकशाहीचा विवेकवाद कवटाळता की हुकुमशाहीच्या सर्वनाशात बुडू इच्छिता? / ठरवा तातडीने ' (पृ.२४०) असा प्रतिसवाल ही कविता करते. समाजाने दुबळे होऊ नये किंवा गाफील राहू नये तर त्याने कायमच संघर्षाला सिद्ध असायला हवे. किमान जे घडतंय त्याच्याविषयीची जाणीव तरी त्याच्या मनात असायला हवी. ही सजग जाणीव निर्माण करणारी ही कविता आहे. हे नुसते वेळापत्रक नाही. ते 'अग्नीपरीक्षेचे वेळापत्रक' आहे. त्यामुळे त्यात कमालीचा दाह असणे स्वाभाविक आहे. या दाहाची सांगोपांग चिकित्सा इथे करण्याचे प्रयोजन नाही. परंतु एका कवीच्या चिंतन क्षेत्रात एकाच वेळी किती विषय सामावलेले असतात आणि हे सारेच विषय वाचकाला कोणता मानसिक अनुभव देतात हे मात्र अनुभवण्यासारखे आहे. कारण ही कविता अंत:करणातून लिहिली गेलेली 'विचारकविता' आहे. कवीच्या विचार कक्षेत ज्या ज्या गोष्टी आल्या त्या त्या गोष्टींचा हा एक थोर ऐवज आहे. तो वैचारिक दृष्टिनेही श्रेष्ठ आहे आणि भावनात्मक दृष्टिनेही श्रेष्ठ आहे. कारण या कवितेत काळाची, संस्कृतीची, भाषेची अनेक बीजे दडली आहेत. भावना आणि विचारांचे एकात्म रूप या वेळापत्रकात बघायला मिळते. आज सारे जग एका संक्रमणावस्थेतून जात आहे. निराशा, हतबलता आणि मरणभय आपल्याला वेढून आहे. कोरोनाने संपूर्ण जगाच्या रूढ मानसिक धारणांना धक्का दिला आहे. किंबहुना या काळाने एक नवीनच संहिता आकाराला आली आहे. विश्व संवादाचे आत्मीय रस्ते बाधित होत आहेत. विविध विचारांनी, धर्म आणि धारणांनी काळ संभ्रमित होऊ पाहत आहे. दंगली, बलात्कार, हिंसा, द्वेष आणि अस्मितेची केंद्रे बलाढ्य होत आहेत. सर्वसामान्य माणूस अगतिक झाला आहे. त्याच्या वाट्याला आलेले जीवघेणे स्थलांतर अस्वस्थ करणारे आहे. या सगळ्या बदलाची नोंदही ही कविता घेते. माणसाच्या समग्र जगण्याला व्यापून टाकणारा हा आशय या अनोख्या वेळापत्रकात सामावलेला आहे. मनोहरांची ही कविता माणसासकट त्याच्या संदिग्ध भोवतालावर भाष्य करते.

कवी जेव्हा एखादी निर्मिती करतो तेव्हा त्याला विशिष्ट स्वरूपाचा परिणाम अपेक्षित असतो का? याचं कोणतंही तर्कशुद्ध उत्तर देता येणार नाही. पण ही कविता माणसाशी तर संवाद साधतेच ; पण ती काळाशी आणि प्रदेशाशीही बोलते. 'मुलखा! जीव देत आहेत शेतकरी हजारो / की कोणीतरी त्यांच्या हत्या करीत आहेत? लोक निष्कर्षाजवळ पोचत आहेत' (पृ.२५५) आपण जे लिहितो, जे बोलतो त्या भूमिकेशी प्रतिबद्ध राहणारे कवी म्हणून डॉ. मनोहर मला महत्त्वाचे वाटतात. ते भाषा नाकारतात. ते संस्कृतीच्या बऱ्या वाईटपणाची कठोर चिकित्सा करतात. सदविवेकाची होळी होऊ नये म्हणून ते वैचारिक जागर मांडतात. मानसिक गुलामी झुगारून कोणत्याही अवमूल्यनाचा ते निषेध करतात. सौहार्दाच्या सहिष्णु पुलाची बांधणी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ही बांधणी काळाची गरज आहे. सर्वसामान्यांविषयी, लोकशाहीविषयी खोल आस्था प्रकट करणारी ही कविता माणसाच्या विवेकशील स्वातंत्र्याचा सन्मान करते. मानवी संस्कृतीला एक विधायक वळण देऊ पाहते. व्यक्तिगत स्वरूपाचे हितसंबंधीय राजकारण असो की, संसदीय राजकारण असो- ही कविता त्यातल्या सत्याचा शोध घेते. त्या सत्याचे विश्लेषण करते. नीतीमान आणि सुदृढ समाजाला वैचारिक बळ देणाऱ्या या दीर्घ संहितेला परिवर्तनाचा एक लक्षणीय तत्त्वविचार लाभलेला आहे. म्हणूनच ही कविता 'क्रौर्याच्या आरंभबिंदूवर' स्पष्टपणे बोट ठेऊ शकते. 'माणुसकीच्या तारांगणाचा' खुलेआम गौरव करू शकते. म्हणूनच 'संदर्भासहित आजची मरणझड' अधोरेखित करणारा हा कवितासंग्रह मला अधिक महत्त्वाचा वाटतो.

▪️अग्नीपरीक्षेचे वेळापत्रक (कवितासंग्रह) : यशवंत मनोहर प्रकाशक : वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव पहिली आवृत्ती : जानेवारी २०२१ पृष्ठे : ३३६, किंमत : रु ४५४/- p.vitthal75@gmail.com

बातम्या आणखी आहेत...