आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्स बार:बुकं औषध लावतात माह्या अंगावर...

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलेज पूर्ण झाल्यानंतर, मी एका संस्थेच्या एड्स जनजागृतीविषयक कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी झालो होतो, तेव्हाची ही गोष्ट. विलक्षण, अविश्वसनीय वाटावी अशी; पण सत्य, अगदी खरीखुरी! ‘रिअॅलिटी इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’ उक्तीचा अनुभव देणारी.

मुं बई आणि आसपासच्या भागातील रेड लाइट एरियांमध्ये, डान्स बारमध्ये जाऊन माहितीपत्रकं वाटणं, पथनाट्य सादर करणं असं काम आम्ही स्वयंसेवक करायचो. एकदा अशाच एका वस्तीमध्ये सकाळी बारा-साडेबाराच्या सुमारास आमचा ताफा गेला. माझ्याकडे बरेचदा इमारतींमध्ये, वस्त्यांमध्ये जाऊन माहितीपत्रकं वाटायचं काम असायचं. मी नेहमीप्रमाणे त्या भागातल्या पहिल्याच इमारतीत शिरलो. इमारत जुनी, मोडकळीस आलेली. इमारतीच्या खालच्या भागत एक मोठा हॉल होता. त्याला लागून काही खोल्या. भिंतींचे पोपडे पडलेले आणि हॉलमधून एक लाकडी जिना जाणारा. हॉलमध्ये तुरळक दोन-तीन बायका केस विंचरत, तंबाखू मळत बसलेल्या. एकमेकींशी गप्पाटप्पा मारत हसत होत्या, टाळ्या देत होत्या. मला पाहताच पहिली म्हणाली, ‘क्यू कवले क्या काम?’ एव्हाना अशा वस्त्या आणि तिथल्या बायका यांच्याशी मी परिचित झालो असल्याने, पहिल्यासारखा बिचकलो नाही. उलट, हसत हसत उत्तरलो, ‘कुछ नहीं दीदी, ये लो.’ असं म्हणत त्यांच्या हातात पत्रक दिलं. त्यावर एड्सची, एचआयव्हीची हिंदी, मराठी भाषेतली माहिती, तो होऊ नये म्हणून करायचे उपाय वगैरे बरंच काय काय लिहिलं होतं. तोंडात साठलेली तंबाखूची लाळ थुंकत दुसरी म्हणाली, ‘पढना किसको आता है इधर, क्या है इसमें ?’ मी त्यांना एचआयव्ही आणि त्याच्या प्रतिबंधाच्या उपायांची, साधनांची माहिती दिली. त्यावर पहिली म्हणाली, ‘लेकिन गिऱ्हाईक मानता नहीं है ना.. क्या करे ऐसे ही छोड दे. तू दे गा क्या पैसे? आया बडा सिखानेवाला. चल फूट!’ आता मात्र मी गप्प झालो. काय बोलावं ते मला कळेना. आम्हाला दिलेल्या प्रशिक्षणात असं काही प्रत्युत्तर आलं तर काय करायचं हे सांगितलं नव्हतं. मी गांगरून गेलो. तोच दुसरी म्हणाली, ‘समझता नहीं है क्या? जां बोली ना.. निकल... तिचा आवाज चढला होता.’ तेवढ्यात लाकडी जिन्यावरून एक आवाज आला, ‘क्या हुआ रे बन्नो? क्यू सुबह सुबह दिमाग चढा रही है?’ वर उभ्या असलेल्या बाईने खुणेनेच मला वर बोलावलं. अनेक पुरुषांच्या पावलांनी घासून घासून झिजलेल्या, गुळगुळीत झालेल्या लाकडी जिन्यावरून वर गेलो. तेथे चारपाच खोल्या होत्या. पडदे टाकलेल्या. पहिल्या खोलीत शिरलो. साधारणतः आठ बाय सातची खोली. खिडकी नसलेली. कोंदट आणि बंदिस्त. त्यात वर पत्रा. भिंतीलगत एक लोखंडी सिंगल पलंग. बाजूला तुटकं लोखंडी टेबल आणि एक लोखंडी कपाट. टेबलावर पाण्याची बाटली आणि इतर सामानसुमान. खाटेवर बसलं होतं, कधीकाळी अत्यंत देखणं असलेलं आणि पुरुषांच्या शरीरांखाली झिजून जीर्णशीर्ण झालेलं सौंदर्य. काळसर वर्णाचं. मोठं कुंकू लावलेल्या गोलाकार चेहऱ्याचं. पिवळी-हिरवी साडी नेसलेलं. केस मोकळेसे बांधलेले. चेहऱ्यावर काही ठिकाणी काळे व्रण, मनगटांवरही. आणि हातामध्ये पुस्तक! मी ते पाहून चकित! माझ्यासाठी तो धक्काच होता. तोवर मी अनेकदा अशा वस्त्यांत गेलो होतो, पण एकीच्याही हातात मी कधी पुस्तक पाहिलं नव्हतं. ‘ये दाग ना सिगरेट के है. पुरुषों की ना अपनी अपनी फँटसी होती है. कुछ लोगों को किधर किधर का राग निकालना होता है और बायको पें तो नहीं निकाल सकते, तो हमपे निकालते हैं...’ असं म्हणून तिने पुस्तक उघडलं. शेरलॉक होम्सच्या कथांचा मराठी अनुवाद होता तो. माझ्याकडे पाहत तिने विचारलं, ‘पानी पिओगे क्या?’ मी म्हणालो, ‘नाही, नको. मराठी येतं?’ ‘हो, मी मराठीच’, ती म्हणाली. ‘आता इथं राहून राहून बोलून ऱ्हायले हिंदी. त्यात पण येतात मराठी शब्द.’ तिला मराठी माणूस भेटल्याचा आनंद झाला होता. मी विचारलं, ‘मी पहिल्यांदाच अशी पुस्तक वाचणारी..’ मला नेमका शब्द काय वापरायचा हे कळलं नाही, म्हणून मी थांबलो. ती म्हणाली, ‘पुस्तक वाचत असलेली वेश्या पाहतोय असंच म्हणायचंय ना तुला? वेश्येनं वाचायचं नाई का भाऊ?’ ‘नाही, तसं नाही दीदी, पण... प्रामाणिकपणे सांगतो धक्का बसला मला पाहून,’ मी सांगितलं. ती हसली. काय सुंदर दात होते तिचे. पिवळसर, एका रेषेत. ती म्हणाली, ‘भाऊ, रात्री जीव एवढा दमून जातो ना की पुस्तकं वाचली की बरं वाटतंय बग जिवाला.’ मी म्हणालो, ‘पुस्तकं आणतेस कुठून दीदी?’ ती म्हणाली, ‘ओळखीचा आहे एक, गिऱ्हाईक होता. पुस्तकं विकतो तो. त्याला सांगते. महिन्याला होईल त्या धंद्यातून पैसे वाचवून घेते पुस्तकं. त्याला फोन केला की देतो इथवर आणून.’ ती पुढे म्हणाली, ‘सांगावंसं वाटतंय म्हण्ून सांगते. परवाचीच गोष्ट. नेहमीचं गिऱ्हाईक आलं. चांगलं पैसेवालं हाय. शादीशुदा. घरी पोरंबाळं, नातवंडंही झालीत आता. म्हटलं की, बाजूला बसलेय. आज नको. वैतागला ना तो. मी म्हटलं, ‘साहेब अंग, कंबर दुखतंय. तसा म्हन्ला, ‘ते काही नाय. मला पायजेल आत्ताच्या आत्ता.’ त्याला काय झालं होतं काय माहीत, जाम पागल झालेला. बीप्या पाहून लोकं येडी होतात नि इथे येतात... माझ्या तोंडून ‘श्शी! अरे बाप रे...’ असे उद्गार निघून गेले. ती म्हणाली, ‘नवीन काय नाय, चाल्तंच इथं हे... तो गेला रे गेला नि मी पुस्तक काढून बस्ले. बरं वाटलं. भाऊ, गोष्टीची पुस्तकं वाचली ना की मन रिझतं, विसरू होते ही खोली, हररोजच्या रात्री, दुखनं, ठनक... बुकं औषध लावतात माह्या अंगावर, फुंकर घाल्तात मायसारकं! वाचू नस्ते ना तर जीव दिला अस्ता मी...’ असं म्हणून ती उठली. तिने समोरचं कपाट उघडून मला दाखवलं.. मध्येमध्ये लोखंडी पत्रे घालून चार कप्पे केलेल्या त्या कपाटात दोन कप्प्यांत कपडे वगैरे सामान होतं आणि उरलेल्या दोनमध्ये होती ओळीने रचलेली पुस्तकं! ‘माजं कलेक्शन, बरोबर हाय ना शब्द भाऊ?’ असं म्हणून ती हसली.. फार गोड!

‘भाऊ, गोष्टीची पुस्तकं वाचली ना की मन रिझतं, विसरू होते ही खोली, हररोजच्या रात्री, दुखनं, ठनक... बुकं औषध लावतात माह्या अंगावर, फुंकर घाल्तात मायसारकं! वाचू नस्ते ना तर जीव दिला अस्ता मी..’ असं म्हणत ती उठली. तिने समोरचं कपाट उघडलं. लोखंडी पत्रे घालून चार कप्पे केलेल्या त्या कपाटात दोन कप्प्यांत इतर सामान होतं. उरलेल्या दोनमध्ये होती ओळीने रचलेली पुस्तकं!

{ संपर्क : ७६२०८८१४६३

बातम्या आणखी आहेत...