आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकाळी अकराची वेळ. सगळी घरातली कामं आटपून सविता निवांत बसली होती. नेहमीच्या रुटीनमधे बदल म्हणून तिने आज कांदेपोह्याच्या ऐवजी दहीपोहे केले होते. रोज आंघोळ झाल्यावर ती काॕॅटनचा छानसा ड्रेस घालते. आज एक फेंट आकाशी रंगाची निळी बॉॕर्डर असलेली साडी नेसली होती. तिनं पलंगावरच्या बेडशीट बदलल्या. दुपारी जेवणासाठी पोळी-भाजी झाली होती. कुकर साडेबाराला लावायचा आणि नवरा आॕॅफिसमधून आल्यावर दीडला जेवायचं, एवढंच काम बाकी होतं. काय कोण जाणे? पण आज तिला खूपच बोअर वाटत होतं. टीव्हीसुद्धा बघावसा वाटत नव्हता. आणि मैत्रिणीला फोन लावून गप्पाही माराव्याशा वाटत नव्हत्या. पुस्तक वाचवत नव्हतं. किती वर्षे दुसऱ्यांनी लिहिलेलं वाचायचंॽ सगळंच मोडीत गेल्यासारखं वाटायला लागलं. आयुष्यातल्या सगळ्या वाटा निष्क्रियतेकडे जातायत, असं तिला वाटायला लागलं. मुलं मोठी झाल्यावर आणि आपापल्या व्यापात रमल्यावर तिला रिलॕक्स वाटण्याऐवजी या रिकामपणाने छळलं होतं. नवरा आणि मुलं बोलत नव्हती असं नाही. ती बोलत होती. हसत होती. पण, सविता तरीही कंटाळली होती. रोज तासभर बिनकामाचं फिरायला तिला नको वाटत होतं. रस्त्यावर घमेल्यातून माती आणि खडी टाकणाऱ्या बायकांचा तिला हेवा वाटायला लागला. आपण काहीतरी असं काम करायला हवं..! हे कसलं घरातलं मिळमिळीत काम. म्हटलं तर तासाभरात आटपू शकतो आपण सगळं. आपण उन्हातान्हात राबून काळंभोर व्हायला हवं. नको ही सुखासीनता आणि ऐषआराम..
अचानक तिला काहीतरी आठवलं. लगेचच टु व्हिलर काढून ती निघाली. बघता बघता शहराच्या खुणा मागे पडायला लागल्या आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला डेरेदार झाडं दिसायला लागली. तेवढ्यानेच सविताला प्रसन्न वाटलं. तिनं झाडांकडे मोठ्या प्रेमाने बघितलं. आपण त्यांच्या उपस्थितीची दखल घेतली. त्यांनाही मला बघून बरं वाटलं असेल का? रस्ता सोडून ती दोन मिनिटांत एका प्लाॕॅटवर पोहाेचली. बाबांनी कधी काळी हा पाच गुंठ्याचा प्लाॕॅट तिला िदला होता. जमीन खडबडीत होती. बेसुमार गवत उगवलं होतं. रानझाडं फोफावली होती. बाजूच्याच प्लाॕॅटवर काम करणाऱ्या मजुराला तिने हाक मारली, “हे साफ करून घ्यायचं आहे. कराल तुम्ही?’ “माझं एकट्याचं काम नाही ताई. दोघांचं दिवसभराचं काम आहे.’ तो म्हणाला. त्यावर सविता म्हणाली, “चालेल. उद्या कराल का?’ “करतो. एक हजार रुपये होतील ताई. दोनशे रुपये अॕॅडव्हाॕन्स द्या.’ तिने पर्स उघडली. नेमके दोनशे रुपयेच होते. ते देत म्हणाली,“उद्या बरोबर नऊ वाजता कामाला सुरूवात करा. मी पण येणार आहे. सगळं साहित्य घेवून या.’ “हो ताई. सगळं झळझळीत करून देतो. आमचं कामच हे आहे..’ सविता माघारी वळली. ही जमीन झाडांसाठी तेवढी चांगली नाही. आपण शेणखत, गांडूळखत टाकू. बेल, चिंच, आवळा कडेला लावू. लहानशी विहीर खणून घेवू. आता ही जमीन छान हिरवीगार होईपर्यंत नवीन साडी, ड्रेस, दागिना काहीच घ्यायचं नाही. दागिने विकावे लागले तरी चालतील. खूप मेहनत करायची. सविता निघताना भारावून गेली होती. दोन वाजायला आले होते. आज कुकर लावायचा राहून गेला. जेवायला तीन वाजतील आज. वाजू देत. नवरा वाट बघत असेल. बघू देत. आपण आता थोडं बिनधास्त जगायला शिकलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्याला अर्थ देवू शकतो, त्यासाठी नेहमी हिरवी स्वप्नं बघितली पाहिजेत, झाडांसारखं सळसळलं पाहिजे, जरा जिवंतपणे जगायला शिकलं पाहिजे... अशा विचारात ती पुढं निघाली होती... अन् सुखावलीही होती!
संपर्क : ८२०८५३१९८९
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.