आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथार्थ:विद्रूप विकासाच्या विरुप कथा!

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिक पुरी
  • कॉपी लिंक

उदारीकरण, जागतिकीकरण आणि बाजारीकरण या बाजारकेंद्रीत व्यवस्थांनी माणसांच्या जगण्यात सुविधा आणल्या पण सुख मात्र आणलं नाही. विकासाच्या मागे धावतांना, आपण विनाशाच्या गर्तेत जात आहोत याचं भान सामान्य माणसाला अजूनही आलेलं नाही. हे भान लेखकाला असतं. मनोहर सोनवणे यांनी याच जागरूक भावनेतून लिहिलेल्या कथा ‘ब्रँड फॅक्टरी’चा विषय आहे. आपल्यातलं माणूसपण किती लयाला गेलं आहे ते जाणून घेण्याचं हे एक प्रमाण मापक आहे.

नव्वदच्या दशकात आलेल्या उदारीकरणाच्या भस्मासुराने जागतिक स्तरावर सामान्य माणसांच्या समृद्ध जगण्याची अडगळ करून टाकली व नंतर त्यालाही अडगळीत लोटून दिलं. जागतिकीकरणात सामान्य माणसाला स्थान नाही. अब्राहम लिंकन यांच्या भाषेत सांगायचं तर जागतिकीकरण ही, श्रीमंतांची, श्रीमंतांसाठी, श्रीमंतांनी निर्माण केलेली व्यवस्था आहे. ज्यांत गरीब हे केवळ श्रीमंतांचे भारवाही हमाल होण्यापुरतेच उरले आहेत. अर्थात हे मत जागतिकीकरणाच्या कृपेने जगभरातील ब्रँडेड वस्तू विकत घेऊन स्वतःचं ‘सोशल स्टेटस’ मोठं झालं आहे असं समजणाऱ्या मध्यमवर्गीयांना कधीच मान्य होणार नाही. पण हा भस्मासूर आज ना उद्या यांच्याच डोक्यावर हात ठेवून त्यांचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही. करोनाच्या काळात या भस्मासूराचं तांडव आपण अनुभवलं आहे. एका झटक्यात अर्थव्यवस्थेची धूळधान झालेली आपण पाहिली आहे. यात केवळ शेतकरी, स्वयंरोजगार तेवढे बचावले. पण थोड्या काळासाठी आलेलं हे शहाणपण विसरून लोक पुन्हा जागतिकीकरणाच्या गरब्यात सामील होऊन नाचू लागतीलच. काही माणसे त्याला अपवाद असतात. मनोहर सोनवणे हे लेखक तर आहेतच पण ते कवी, पत्रकार आणि संपादकही आहेत. त्यामुळे नाक-कान-डोळे उघडे ठेवून त्यांना वावरावं लागतं. त्याहीपेक्षा त्यांचा मेंदू उघडा आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच वर्तमानाचा अर्थ लावण्याची किमया त्यांना जमली आहे. त्यांचा ‘ब्रँड फॅक्टरी’ हा कथासंग्रह या वर्तमानातील मानवी जगण्याचा वेध घेणारा आहे. या कथा मागील चाळीस वर्षांतील आहेत. १९८० ते २०२० या काळात जगाने अनेक उलथापालथी पाहिल्या. त्यांचा या कथांना संदर्भ आहे. याचा आधार आहे उदारीकरण, जागतिकीकरण व बाजारीकरण. यांच्या तावडीत सापडलेल्या सामान्य माणसाचे जगणे कसे बदलले, भरकटले, विस्कटले, याची मांडणी या कथांमधून दिसून येते. या कथा मनोरंजन करणाऱ्या नाहीत. विचार करायला लावणाऱ्या आहेत. पण त्या वाचनीय आहेत. प्रत्येक कथेची शैलीही विशेष आहे. एक लेखक म्हणून यासाठी त्यांचं कौतुक करायला हवं. या कथा मागील चार दशकांचा दस्तावेज आहेत. कारण या काळात आपल्या जगण्यात जे अंतर्बाह्य बदल होत गेले त्याच्या नोंदी या कथांमध्ये आढळून येतात. माणूस म्हणून आपण कसे संपुष्टात येत गेलो याचा हा चिकित्सक वृत्तीने केलेला अभ्यास आहे. या कथासंग्रहातील अकरा कथा या मानवी जीवनाचे वेगवेगळे पैलू उलगडत जातात. त्यांची फक्त नावे वाचली तरी त्या कथांचा विषय आकळून येतो. ‘ब्रँड फॅक्टरी’, ‘मायावरण’, ‘तुमचीच गोष्ट’, ‘मॉलमध्ये एकटं एक मूल’, ‘माणूस मिसिंग’, ‘कार्ल मार्क्सचा डोळा’, ‘वेलकम टू कस्टमर केअर’, ‘अधांतर‘ इत्यादी. या कथांची कथनशैली वेगळी आहे. त्यांत तोचतोचपणा नाही. या कथा उदारीकरणातील मानवी जगण्याच्या शोकांतिका असल्या तरी त्यांना कलात्मक व रंजक मूल्य लाभलेलं आहे. ‘मॉलमध्ये एकटं एक मूल’ ही यांतील सर्वाधिक महत्त्वाची कथा. ती जागतिकीकरणात विस्थापित झालेल्या माणसांची रुपक कथा आहे. हा मॉल म्हणजे हे जग व त्यांत हरवलेलं मूल म्हणजे तुम्ही आम्ही सारेच. पण आपल्या हरपलेपणासाठी जागतिकीकरण स्वतःला जबाबदार मानत नाही. त्यासाठी आपणच जबाबदार आहोत असं ते आपल्याला पटवून देतं. ही कथा अकीरा कुरोसावा यांच्या ‘राशोमान’ चित्रपटाची आठवण करून देते. ज्यांत वेगवेगळी माणसे हरवलेल्या एका मुलीविषयी सांगतात. ‘तुमचीच गोष्ट’ व ‘कार्ल मार्क्सचा डोळा’ या रहस्यात्मक शैलीतल्या गोष्टी आहेत. ‘मादाम फिअरलेसचा फेरा’ ही उपहासिका आहे. डेंग्यूच्या साथीमुळे होणारी हलचल ही कथा सांगते. सध्याच्या करोनाच्या साथीचीही ती आठवण करून देते. रोग कोणताही असो त्यांत गरीबच जास्त मरतात आणि नव्या व्यवस्थेत फक्त श्रीमंतच श्रीमंत होतात हे सत्य अधोरेखित करणाऱ्या या कथा आहेत. उदारीकरणात माणूस अनुदार झाला आहे. सोनवणेंच्या लिखाणातून आजच्या माणसाच्या जगण्याविषयी अनेक शेरे येतात जे विचार करायला लावतात. अर्थात त्यासाठी तुमचा मेंदू विचारमग्न असण्याची अट आवश्यक आहे. ‘मॉलमध्ये एकटं एक मूल’ या कथेतील, “कोणतीही कृती म्हटलं की, त्यामागे हेतू असलाच पाहिजे. आजकाल हेतूशिवाय कोणी कोणतीही कृती करत नाही.” तसेच, “…आणि माणसानं व्यवहारी असणं चांगलं मानतात. माणसानं उगाच कशात गुंतून पडू नये. गुंतवणूकसुद्धा सरप्लस देणारी, रिटर्न देणारी असली पाहिजे, तरच तिचा उपयोग.” ही वाक्ये किंवा ‘मायावरण’ कथेतील, “माणूस उघडा पडू नये म्हणून स्वतःला झाकून घेतो. स्वतःच्या सरव्हायव्हलसाठी माणसाला मायावरण आवश्यक आहे.” हे विधान कोणीही तपासून घ्यावे.

या कथा विषण्ण करणाऱ्या असल्या तरी मला स्वतःला त्या सकारात्मक वाटतात. कारण सोनवणेंनी या कथांच्या रुपाने आपल्याला एक आरसा दाखवला आहे. त्यांत डोकावून आपण आज कुठे आहोत, काय करत आहोत याची जाणीव सजग वाचकाला होऊ शकेल. विकास हवा पण तो स्वतःच्या माणूसपणाचा बळी देऊन नको, हा ठाम निर्धार करून आपण पुढे जात राहिलो तरच या जागतिकीकरणाला काही अर्थ आहे. त्याचं भान देणऱ्या या कथा आहेत.

ब्रँड फॅक्टरी (कथा संग्रह) लेखक – मनोहर सोनवणे मुखपृष्ठ – अन्वर हुसेन प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स किंमत – रुपये २५०

pratikpuri22@gmail.com

बातम्या आणखी आहेत...