आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्षय खूप लहान होता तेव्हाचा एक प्रसंग. आम्ही दोघंही नोकरी करायचो. एक दिवस माझी कामवाली बाई आली नव्हती. मुलाला कधी समोर बसवून तर कधी कडेवर घेऊन खेळवता खेळवता माझी सगळी कामं सुरू होती. शेवटचं काम राहिलं होतं भांडी घासण्याचं. पण तोपर्यंत मला खूप थकल्यासारखं झालं होतं. म्हणून मी माझ्या नवऱ्याला एक कप चहा करून दे असं म्हणाले. तर तो म्हणाला, हवं तर विकत आणून देतो पण मी स्वयंपाक घरात जाऊन चहा करणार नाही. माझं सासर पारंपरिक विचारसरणीचं.
सासरी नोकरमाणसांचा राबता होता. पुरूषांनी स्वयंपाक घरात जाणं त्यांच्या तत्त्वांविरुद्ध होतं. सासरी मी कुठल्याच पुरूष नातेवाईकाला स्वयंपाक घरात गेलेलं बघितलं नव्हतं. या कौटूंबिक पार्श्वभुमीमुळे मला शेवटी त्या दिवशी चहा नाहीच मिळाला. पण त्या घटनेनंतर मी निश्चय केला की आपल्या सुनेवर असा प्रसंग यायला नको. आपल्या मुलाला घरातली सगळी कामं आणि स्वयंपाकही शिकवायचा. आज सांगायला अभिमान वाटतो की अक्षय सगळा स्वयंपाक अगदी उत्तम करतो मग ते पोळ्या लाटणं, भाजी करणं असो किंवा पराठा,थालीपीठ करणं असो. स्वयंपाकच नाही तर स्वयंपाकाच्या सर्व जिन्नसांची खरेदी करणं, स्वच्छ करणं, नंतरची आवरासावर हे ही तो सगळं गृहिणीच्या चाणाक्षपणाने करतो. अधिक आनंद याचा आहे की तो हे सगळं खूप सहजतेने करतो. पुरूष असूनही मी ही कामं करतोय असा त्याचा कुठलाच अर्विभाव नसतो. घरकामात आपलं योगदान हीच त्याची कामं करण्यामागची भावना असते.
नातेवाईकांच्या घरी गेल्यावर तिथल्या स्त्रिया जर काही कामं करत असतील तर अक्षयही सहजतेने त्यांच्यात सामील होऊन त्यांना मदत करतो, त्याची ही वृत्ती तो ‘माणूस’
असल्याचंच द्योतक नाही का? वयाच्या एका टप्प्यानंतर मुला-मुलींना शिक्षणासाठी घर सोडावं लागतं. अशावेळी घराबाहेर राहताना स्वत:चं सगळं स्वत:ला करता यायला हवं. कुणावर अवलंबून राहण्याची वेळ यायला नको असं मला व्यक्तीश: वाटतं. हाच विचार मी अक्षयलाही दिला. त्यालाही तो पटला आणि त्यामुळेच शिक्षणासाठी अक्षयचं पुण्याला राहणं असो किंवा आता नोकरीनिमित्ताने बर्लिनला राहणं असो त्याचं कुणावाचून कधीच काही अडलं नाही. उलट त्याची बर्लिन मधली मित्रमंडळी वीकली ऑफच्या दिवशी अक्षयच्या हातचं खास भारतीय पद्धतीचं जेवण आवडतं म्हणून घरी मैफल जमवतात.
अक्षय सगळा स्वयंपाक शिकवण्याबद्दल आज जेव्हा मी मागे वळून विचार करते तेव्हा लक्षात येतं की आपण ओल्या मातीला योग्य वेळी आकार द्यायला सुरूवात केली. आपला निर्णय आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर थोडा धाडसाचा असला तरी योग्यच होता. अर्थात त्यावेळी काही काळासाठी नवऱ्याने नाराजी दाखवली असली तरी नंतर त्यानेही पाठिंबा दिला. आज सांगायला याही गोष्टीचं समाधान वाटतंय की नवरा कधीकधी नाश्त्याला पोहे, उपमा वगैरेचं ‘सरप्राईज’मला देतो.सध्याच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात माझ्या रोजच्या दिवसाची सुरूवात नवऱ्याने बनवलेल्या मस्त गरमा गरम आल्याच्या चहाने होतेय...
नीता वाळवेकर संपर्क : ९८९००५५८५३
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.