आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेतली ‘ती’:‘बंधू रं शिपाया, तू दे रं दे रुपाया’

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे वर्ष वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून ठिकठिकाणी साजरे करण्यात आले. लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या अनेक गीतांतून कवितेतून व्यवस्थेला थेट प्रश्न केले, जात-पातविरोधी, शोषणाविरोधी जाणिवा मांडल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या जाती-धर्मातल्या बहुजन, कणखर स्त्रीचं चित्रण अत्यंत ताकदीने मांडलं. खरं तर वामनदादांच्या कवितेतली स्त्री चित्रणं, जात जाणीव आणि विद्रोहाची नाळ आज अनेक कवींच्या कवितेशी जुळते. पण याचा अभिमान वाटून घ्यावा? की विशिष्ट सत्तेशी लढण्यासाठी अजूनही कवितेतून संताप, उद्रेक, राग व्यक्त करावा लागतो याची खंत वाटून घ्यावी ? असा प्रश्न आजच्या पिढीपुढे निर्माण झाला आहे. कारण जात, सत्ता, पुरुषी वर्चस्व याविरुद्धचा लढा तेव्हाही संपला नव्हता आणि आजही संपत नाहीय. आजही एकटी बाई बघून पुरुषातला बलात्कारी नर जिवंत होतो. आजही समाजात, कुटुंबात स्त्रीला दुय्यमच दर्जा दिला जातो. घटस्फोटित, विधवा, एकल महिलेला सन्मानाची वागणूक मिळत नाही. नैतिकतेच्या नावाखाली तिच्यावर विशिष्ट मर्यादा घातल्या जातात. अशी दुटप्पी समाजव्यवस्था सगळीकडे आहे. मराठीत अनेक कवींनी त्यात स्त्री कवीसुद्धा अपवाद नाहीत. कवितेतून उदात्त, दैवी असं स्त्रीत्व या प्रतिमेचं समर्थन केलं असलं तरी काही दलित कवितेतून मात्र हे मातृत्व, स्त्रीत्व वेगवेगळ्या रूपात चित्रित झालंय. यातल्या बहुतांशी कवितेत रोजच्या जगण्यातली कष्टकरी स्त्री निव्वळ दबलेली, पिचलेली, हताश, हतबल नाही तर गरिबीशी, परिस्थितीशी दोन हात करत माणूस बनू पाहणारी, चारित्र्य, पातिव्रत्य, नैतिक मूल्यांच्या पल्याड केवळ स्त्री म्हणून जगू पाहणारीही आहे.

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. अशा अनेक रचना करणारे वामनदादा म्हणजे बाबासाहेबांच्या प्रज्ञा शील, करुणा, संघर्ष या सर्वांचं चालतं-बोलतं गाणं.

बंधू रं शिपाया, तू दे रं दे रुपाया चोळीच्या खणाला बाई होळीच्या सणाला चवलीचा चुडा म्हणते मनगटी भरीन चवलीच्या बाळ्या बिंदल्या बाळाला करीन दुबळंवाडीची ही दुबळी बहीण डोंगरदरीत ही लोटली आईनं

अशा स्त्री मनाच्या हळव्या भावभावना, जात वर्ण आणि वर्ग जाणीवेतली हतबलतेची जाणीवही व्यक्त करते. वामनदादांची कविता ही मराठी कवितेतल्या वेगळ्या प्रकारच्या स्त्री प्रतिमा अधोरेखित करते. वामनदादांचं ‘भिलणी’ हे एक गाणं आहे. भारतीय समाजव्यवस्थेची उकल करण्यात हे गाणे खूपच उपयोगी आहे. भारतीय पुरुषांप्रमाणेच स्त्रियादेखील जाती-जातींमध्ये विभागलेल्या असल्या तरी स्त्रियांच्या ठायी जातींच्या भिंती ओलांडण्याची क्षमता आहे, असे वामनदादा या गीतातून सांगतात :

‘भिलणी कोळणी तेलणी साळणी मराठणी माळणी गं पोटासाठी एक ठिकाणी खपतो साऱ्या जणी गं’ भारतामध्ये वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था कशी निर्माण झाली याविषयी मतमतांतरे असली तरी ती स्त्रियांनी निर्माण केलेली नाही याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.

वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था यांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये स्त्रियांवर विविध प्रकारची बंधनंही आलेली होती. त्यामुळे इतिहासामध्ये स्त्रियांनी वर्ण-जातिव्यवस्थेचा निषेध केला आहे. आजदेखील स्त्रियांवर जातिव्यवस्था लादली जाते. या जातिव्यवस्थेचा विपरीत परिणाम स्त्री जीवनावर झालेला आहे. स्त्रियांनी जात पाळली पाहिजे, अशा प्रकारचा संस्कार हा स्त्रियांवर मुद्दामहून केला जातो; परंतु पुरुषप्रधानता जोपासणाऱ्या जातिव्यवस्थेचे पालन करण्यामध्ये स्त्रियांचे हितसंबंध नसतात. म्हणून होता होईल तेवढा भगिनीभाव जोपासण्याचा प्रयत्न स्त्रिया करीत असतात.

एकमेकींशी हितगूज करणे, सुख-दुःख वाटून घेणे, शेजारणीची आस्थेने चौकशी करणे, कामाच्या ठिकाणी जात विसरून एकमेकींच्या जीवनाशी समरस होणे या बाबी स्त्रिया सहजतेने करीत असतात. जातीच्या भिंती ओलांडून एक प्रकारचा भगिनीभाव अनुभवावा यासाठीदेखील स्त्रिया आसुसलेल्या असतात. विदर्भासारख्या प्रदेशामध्ये एकमेकींना बहुजन समाजातल्या स्त्रिया सहजच ‘बयना’ म्हणतात. ‘बयना’ म्हणजे बहीण! पण कोणत्याही स्त्रीला ‘बयना’ म्हणत असताना तिच्या जातीचा विचार या स्त्रियांच्या मनामध्ये येत नाही. अर्थातच, समाजाच्या जातीयवादी प्रभावामध्ये स्त्रियांच्या वर्तनात काही प्रमाणात जातीयवाद येत असेल; पण होताहोईल तेवढा भगिनीभाव जोपासण्याचा प्रयत्न स्त्रिया करीत असतात. याची अतिशय समर्पक अशा शब्दांमध्ये नोंद वामनदादा कर्डक यांनी घेतलेली आहे. त्यांनी भिलणी, कोळणी, तेलणी, साळणी, मराठणी, माळणी, मांगिणी, बुद्धीणी अशा दलित, शेतकरी, आदिवासी आणि - इतर आजच्या भाषेत ओबीसी स्त्रिया - या पोटाच्या भुकेसाठी कशा एकत्र येऊन शेतमजुरी करतात आणि शेतावर काम करत असताना आपापल्या जाती विसरून त्या कशा परस्परांच्या ‘बहिणी’, ‘वहिनी’ बनतात : ‘कुणी आमच्या बहिणीतरी कुणी आमच्या वहिनीतरी.’ या बहुजातीय स्त्रिया परस्परांच्या सहकारी बनतात आणि भगिनीभावाचा एक मुक्त असा श्वास वर्ण जातिव्यवस्थेचा गोठलेपण असलेल्या गावापासून लांब शेतामध्ये अनुभवतात याची चर्चा या गाण्यामध्ये केलेली आहे. जात हलकी असो की वाईट, ती विषारी आहे आणि ती आपण टाकून दिली पाहिजे, अशा प्रकारचा विचार या स्त्रिया शेतामध्ये शेतमजूर म्हणून करीत असतात. शेतमजुरी हे आर्थिक काम करत असताना जाती ओलांडण्याची प्रेरणा या स्त्रियांना शेतमजुरी देते. म्हणजे वर्ग बनण्याच्या प्रक्रियेत ‘जात’ आपण टाकून दिली पाहिजे आणि जातीच्या संकुचित, छोट्या अस्मितांना गोंजारण्यापेक्षा आपण सारे कष्टकरी लोक एकत्र झालो पाहिजे, किमान कष्टकरी स्त्रिया या एकत्र आल्या पाहिजे आणि त्यांनी जात, पितृसत्ता, धर्म यांची बंधने झुगारून दिली पाहिजे, असा अतिशय विद्रोही स्वर वामनदादांच्या ‘भिलणी’ या गाण्यामध्ये दिसून येतो.

‘तुम्हाला चीड यावी तिची ठिणगी उडावी भुकेल्या माणसाची भूक जाळीत जावी कविता हीच आता जगाचे गीत व्हावी’ असा मानवतेचा संदेश आपल्या कवितेतून देणाऱ्या वामनदादांची कविता स्त्रीविषयक जाणिवांच्या कवितेतही अत्यंत महत्त्वाची ठरते.

सारिका उबाळे संपर्क : sarikaubale077@gmail.com

बातम्या आणखी आहेत...