आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • ...but There Is Strength In The Wrist! | Article By Chandrabhaga Karabhari Palwe

मोडला नाही कणा...:...पण मनगटात ताकद आहे!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझं वय आता ७५ वर्ष आहे. माझं लग्न झालं तेव्हा मी १६ वर्षांची होती. तेव्हापासून मी माझ्या पतीसोबत शेती करत होते आणि आज ते हयात नाहीत तरीही करतेय. अामच्याजवळ अडीच एकर जमिनीचा तुकडा आहे. त्या तुकड्यात आम्ही कापूस आणि तुरीचं पीक घेतो. आज माझ्या कपाळावर कंुकू नाही; पण मनगटात ताकद नक्कीच आहे.

माझ्या मालकांनी शेतात विहीर खणण्यासाठी रोजगार हमी योजनेतून काम सुरू केले हाेते. यासाठी सरकारकडून मदत मिळणार असल्यामुळं त्यांनी विहिरीचं काम चालू केलं होतं, पण ते सुरू झाल्यावर पंचायत समितीने मुजरांच्या कामाचा हप्ता दिलाच नाही. माझ्या पतीनं सावकाराकडून व्याजानं पैसे घेऊन मजुरांना मजुरी दिली. विहिरीचे काम सुरू ठेवले. इतके सर्व करुन त्यांना अाशा होती की, सरकार पैसे देईल, पण सरकारने पैसे दिलेच नाहीत. या सगळ्याचा ताण येऊन माझ्या पतीने २०१२ मध्ये आत्महत्या केली. सरकारच्या रोजगार हमीच्या विहिरीनं माझा प्रपंच उद्ध्वस्त केला. घरची जबाबदारी आता मुलावर आणि माझ्यावरच होती. आम्ही पुन्हा शेती करण्यासाठी उभं राहिलो. िबयाणासाठी, खतासाठी, पेरणीसाठी पैसे नव्हते, तरी आम्ही कष्ट करुन पैसे जमवले आणि शेतीत पीक घेतलं. अशातच एकुलता एक मुलगा आजारी पडला. त्याच्या इलाजासाठीही पैसा नसल्यामुळे डोळ्यांदेखत माझा मुलगा गेला. नवरा जाऊन सहा महिनेही झाले नव्हते तर दुसरं दु:ख आमच्या नशिबी आलं. त्यावेळी जयाजीराव सूर्यवंशी आणि काही पत्रकारांनी पैशांची मदत केली. माझ्या पतीनं मागं ठेवलेल्या अडीच एकर शेतात मी आणि माझी सून कपाशीचं आणि तुरीचं पीक घेतो. याच्या उत्पन्नातून नातीच्या शिक्षणाला हातभार लागतो. शेतीत खूप पिकत नाही, तरीही शेती ही आमची आई आहे आणि शेतात राबायला आम्हाला आवडतं. आम्ही कष्ट करुन, शेतीत दिवस-रात्र राबून जगत आहोत.

चंद्रभागा कारभारी पालवे

बातम्या आणखी आहेत...