आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे अंतरंग:कॅलिग्राफी : चीनची कला-संस्कृती

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये चित्रकलेप्रमाणेच कॅलिग्राफीकडेही आत्म-अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून बघितले जाते. प्रत्येक कलेवर तत्कालिन काळाचा प्रभाव असतो. तसेच चीनमध्ये कॅलिग्राफीचेही आहे.

सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकास एकदा म्हणाले, “मी जर चीनमध्ये जन्माला आलो असतो तर चित्रकार नाही, कॅलिग्राफर झालो असतो!” कॅलिग्राफी, चिनी सांस्कृतिक खजिन्याचा अनोखा कलात्मक प्रकार जो चिनी कलेचे प्रतिनिधित्व करतो. प्राच्य जगाच्या इतिहासातील हा सर्वात प्राचीन कलात्मक प्रकार म्हणून ओळखला जातो. कॅलिग्राफीचा अर्थ, ‘सुंदर लेखन’ आणि चीनमध्ये हे लेखन शाई आणि ब्रशला विशिष्ट वापर करत शतकानुशतके चालत आलेय. जगभरात कॅलिग्राफी होते, मात्र चिनी संस्कृतीत कॅलिग्राफीला जे महत्त्व आहे ते अतुलनीय आहे. कॅलिग्राफीला चिनी संस्कृतीत सर्वोच्च दृश्यात्मक कलाविष्कार म्हणून पाहिले गेले; चित्रकला आणि शिल्पकलेपेक्षा देखील कॅलिग्राफीला आत्म-अभिव्यक्तीचे आणि संवर्धनाचे साधन म्हणून, कवितेच्या बरोबरीने स्थान दिले गेले. या कलेत पारंगत असणे फार महत्त्वाचे होते, इतके की राजदरबारी नोकरीसाठी कॅलिग्राफी निपुण असणे आवश्यक होते. एका चौरसात बसणारा एक शब्द, जो सौंदर्यपूर्ण रीतीने लिहिला जातो. शाईत बुडवलेला ब्रशला दाब किती आणि कुठे द्यावा, रेघ कुठून कशी ओढावी आणि त्या मूर्त शब्दाला प्रतिमेचे रूप देणे म्हणजेच कॅलिग्राफी. अशा वेळेस ब्रश हा त्या कलाकाराच्या मनाचा समन्वय साधून, जणू हाताच्या बोटांसारखी कागदावर उतरतो. लिहिण्याचे नियम जरी सारखे असले तरी प्रत्येक व्यक्तीची कॅलिग्राफी वेगळी असते, कारण ती त्या व्यक्तीच्या भावनांची अभिव्यक्ती असते.

कल्पना आणि माहितीची नोंद ठेवण्याच्या गरजेपोटी सुरुवातीला कॅलिग्राफी सुरू झाली, आणि पाहता-पाहता तिने कलेचा दर्जा घेतला. ब्रश, शाईचा दगड (दिव्याखालची काजळी आणि गोंदणाचे मिश्रण), दगड गाळण्यासाठी लागणारी सहाण आणि कागद किंवा रेशमाचे कापड, ह्या चार गोष्टींशिवाय कॅलिग्राफी लिहिली जात नाही. या चार गोष्टींना चीनमध्ये, ‘वन चांग स पाव’ (अभ्यासाचे चार खजिने) असे म्हटले जाते आणि त्यांना खूप महत्त्व आहे. पुढे कॅलिग्राफीचा वापर केवळ राजाच्या चुकांना कागदावर उतरवण्यापुरता मर्यादित न राहता, कोरीव ठसे-शिक्के, राज्याची मोहोर, सुशोभित पेपरवेट्स, शाईचे दगड, यासारख्या असंख्य कला प्रकारांच्या विकासासाठी होऊ लागला. चिनी लिपी म्हणजे चित्र लिपी, जी चित्रांतून बोलते. मुळाक्षरे नसलेली ही लिपी, अनेक वेलांट्यांनी, काना-मात्रांच्या विशिष्ट वळणांनी लिहिली जाते. वरवर केवळ रेघांचा गुंडाळता दिसणारा शब्द, अनेक अर्थ आणि प्रत्येक रेषेचे वैशिष्ट्य कायम करून जातो. चिनी कॅलिग्राफीचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रेषेचा लांबी, रुंदी, जाडी, त्या रेषेचा प्रवाह, सगळं अपरिवर्तनीय असतं. कॅलिग्राफीचे जाणकार, किती जाड किंवा बारीक ब्रश वापरलाय, इथपासून ते काढलेल्या रेषेचा ओघ, वेगाने घेतलाय की नाजूकतेने, ब्रशला दाब किती, कुठे कमी-जास्त आहे, हे सांगू शकतात.

चीनमध्ये चित्र कलेप्रमाणेच कॅलिग्राफीकडेदेखील आत्म-अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून बघितले जाते. ज्याप्रमाणे चित्रकलेवर, संगीतावर काळाचा प्रभाव असतो, त्याची एक जात तयार होते, त्याचप्रमाणे, चीनमध्ये कॅलिग्राफीचे आहे. चिनी भाषेत कॅलिग्राफीला ‘षू फा’ म्हणतात. याचे पाच प्रकार प्रचलित आहेत. जुन्या काळी राजांच्या मोहरांवर केलेली कॅलिग्राफी; किमान २००० वर्षांपूर्वीची ही लेखनकला आजही वापरली जाते. ही थोडी चित्रलिपींच्या जवळ जाते. नंतर आली कारकुनी पद्धत, जिने चित्र लिपीला थोडे सोपे केले. ही पद्धतदेखील अजून वापरली जाते. पुढे ब्रश वर न उचलता लिहिली गेलेली ‘सेमी-कर्सिव्ह’ पद्धती आणि त्याही नंतर आलेली ‘कर्सिव्ह’ पद्धती, या दोन आजच्या कॅलिग्राफी फार क्वचित वापरल्या जातात. आणि सर्वात जास्त वापरली जाणारी ‘च्चन षू’ पद्धती, जी आज सगळ्यात जास्त प्रचलित आहे. आजही कॅलिग्राफी आणि त्याच्या जाणकारांबद्दल चीनमध्ये प्रचंड आदर आहे. कॅलिग्राफीच्या राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातात. हल्ली एक नवीन पद्धत सुरू झालीय, आपल्याकडे जशी रांगोळ्या, वाळूतली शिल्पे बनवण्याची स्पर्धा असते, जी लगेच पासूनही जाते; तशीच पाण्याने कॅलिग्राफी करण्याची स्पर्धा सध्या चीनमध्ये प्रचलित आहे. ही अक्षरे दोन मिनिटांत वाळून जातात, कॅलिग्राफीची ही कला मात्र पुढे अनेक वर्षे टिकून राहील, यात शंका नाही.

सुवर्णा साधू संपर्क : suvarna_sadhu@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...