आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट भाष्य:भारताच्या आयटी राजधानीतील बदलते वारे

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकची राजधानी आणि स्टार्ट-अप व टेक्नो-एंटरप्राइजेसचे इंजिन असलेल्या बंगळुरूला चांगले हवामानही लाभले आहे. हे भारतातील सर्वोत्तम मेट्रो शहर आहे. येथील उत्तम शैक्षणिक संस्था हे उद्योग, नवीन नोकऱ्या, घरे आणि पायाभूत सुविधांसाठी हुशार लोक उपलब्ध करून देतात. पण, आनंदी, निश्चिंत आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारी सामाजिक संस्कृती हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. पूर्वी मुंबई हे उद्योजकतेचे आणि ग्लॅमरसाठी स्वप्नांचे शहर मानले जात होते, आज ते बंगळुरू मानले जाते. अमेरिकेने आपल्या शहरांना जी नावे दिली आहेत, उदा. न्यूयॉर्कला ‘बिग अॅपल’, शिकागोला ‘विंडी सिटी’, ‘व्हर्जिनिया इज फॉर लव्हर्स’ इ., त्याचप्रमाणे बंगळुरूला ‘फील गुड सिटी’ असे नाव देता येईल.

त्यामुळेच आज कर्नाटक आणि त्याच्या राजधानीत जे फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते त्याची हवाच बिघडवणार आहेत. एकेकाळी भाषेच्या नावाखाली फुटीरतावादी राजकारण आणि लढाऊ कामगार चळवळींनी मुंबईची जादू जवळजवळ नष्ट केली होती. बंगळुरूमध्येही तसे घडावे, असे या देशाला अजिबात नको असेल. देशातील आघाडीच्या बायोटेक उद्योजक किरण मुजुमदार शॉ चिंतेत आहेत आणि म्हणूनच त्यांनी ट्विट करून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना हस्तक्षेप करून समजूत काढण्याचे आवाहन केले आहे. जातीय विभाजनाच्या अनेक पावलांनंतर, हिंदू मंदिरे आणि हिंदू धार्मिक कार्यक्रमांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने वगैरे लावण्यास बंदी घालण्याच्या अलीकडेच केलेल्या हालचालीनंतर हे आवाहन करण्यात आले. कर्नाटकातील सामान्य मुस्लिम हा एक प्रकारचा आर्थिक भेदभाव मानतील. व्यापक अर्थाने हा निव्वळ राजकीय हेतूने सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जाईल. जवळपास वर्षभरानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

गेल्या वेळी भाजपने येथे काँग्रेस-जेडी(एस) कडून सत्ता हिसकावून घेतली होती. त्यांनी आपले मुख्यमंत्री बदलले, परंतु तरीही त्यांना अंतर्गत असंतोषाचा सामना करावा लागतो. सध्याचे मुख्यमंत्री कमकुवत मानले जात असून त्यांचे कामही सुस्त झाले आहे. भाजप विरोधकांना, विशेषतः काँग्रेसला हलक्यात घेऊ शकेल अशा राज्यांपैकी कर्नाटक नाही. त्यामुळे ध्रुवीकरणाच्या सध्याच्या सूत्राची गरज आहे. जो फॉर्म्युला गुजरात आणि उत्तर प्रदेशात चालला, तोच कर्नाटकातही कामाला यावा, असा विचार झाला. कदाचित चालेलही. राजकारणात जिंकून देणारी निवडणूक हेच उत्तम सूत्र आहे, मग समाजाच्या आणि नैतिकतेच्या दृष्टीने परिणाम काहीही असोत. सुमारे दशकभरापासून भाजपची रणनीती तीव्र ध्रुवीकरणावर केंद्रित आहे, जेणेकरून मुस्लिम मते ‘सेक्युलर’ पक्षांसाठी अनावश्यक होतील. बहुतांश राज्यांमध्ये तो ५० टक्के हिंदू मते मिळवून निवडणूक जिंकू शकतो.

तथापि, २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हा फॉर्म्युला पूर्णपणे प्रभावी ठरला नाही याची भाजपलाही जाणीव आहे. तेव्हा त्यांचे पारडे जडही होते, कारण गट बदलण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या सत्तधाऱ्यांशी त्यांचा मुकाबला होता. पंतप्रधानांनी तेथे २१ सभा घेतल्या होत्या. तरीही बहुमत मिळवण्यात भाजपला अपयश आले. अर्थात वर्षभरानंतर त्यांनी ते मिळवले. पण आता तो दुबळ्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारचा भार उचलत आहे. दुसरीकडे, त्यांचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा मूक असंतुष्ट आणि लिंगायत मतांचे प्रबळ दावेदार आहेत, ज्यांच्याशिवाय भाजप शक्तिहीन आहे. येदियुरप्पांप्रमाणे बोम्मईदेखील लिंगायत आहेत, पण त्यांच्या समर्थकांची संख्या येदियुरप्पांपेक्षा खूपच कमी आहे.

दक्षिणेत कर्नाटक हा भाजपचा एकमेव बालेकिल्ला आहे. पण, ध्रुवीकरणाचे राजकारण सामाजिक सलोखा बिघडवत आहे. मनात अब्जावधी डाॅलर्सचे सूत्र घेऊन बंगळुरूमध्ये जमलेल्या प्रतिभावान तरुणांना विमुखही करू शकते. मी येथे भाजपचे उगवते तारे आणि बंगळुरूचे (दक्षिण) खासदार तेजस्वी सूर्या यांचे विधान उद्धृत करू शकतो, त्यात त्यांनी गेल्या राष्ट्रीय स्टार्ट-अपच्या दिवशी म्हटले होते की, त्यांचे शहर देशातील ४० टक्के ‘युनिकॉर्न’ आणि ‘सुनिकॉर्न’ कंपन्यांचे घर आहे. भारतातील ९५ पैकी ३७ ‘युनिकॉर्न’ कंपन्या बंगळुरूमध्ये आहेत. त्यांची संख्या मुंबईत १७, गुरुग्राममध्ये १३, दिल्ली आणि नोएडामध्ये ४-४ आहे. बंगळुरूला आल्यावर आपल्याला आशावादाचा सुगंध आणि चमक जाणवेल. त्याच्या व्यावसायिक इमारतींपासून ते आयटी पार्क आणि रेस्टॉरंट्स, बार, पब आणि विमानतळ प्रतीक्षालयापर्यंत तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनवर तरुण उत्पादनाची डिझाइन करताना, करारावर स्वाक्षरी करताना किंवा नवीन स्वप्ने विणताना दिसतील. ‘रील’ बघण्यात कोणताही तरुण वेळ वाया घालवताना दिसणार नाही.

अलीकडील घटनांकडे लक्ष द्या. हिजाबबाबत वाद निर्माण झाला होता; आता मंदिरांभोवती दुकाने थाटण्यावर भेदभावपूर्ण बंदी घालण्यात आली. मात्र, कुठेही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. गोठ्याबाबत नवे कायदे करण्यात आले; हलाल मांसावर बहिष्कार टाकला. ही सर्व एकाच चिंताजनक पावलांची उदाहरणे आहेत. उद्योजकता विकासासाठी आणि गुंतवणूक वाढण्यासाठी सामाजिक एकात्मतेचे वातावरण गरजेचे नाही, असे म्हणता येईल का? हे आजचे सर्जनशील, तरुण उद्योजकच कोट्यवधी स्टार्ट-अप तयार करतात आणि आर्थिक विकासाला चालना देतात. कर्नाटकचे राजकारण बंगळुरूतून हे वातावरण हिसकावून घेत असेल तर ते नक्कीच वातावरण बिघडवणारे वारे आहेत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

शेखर गुप्ता एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...