आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग प्पा आणि मानसिक आरोग्य यांचं फार जवळचं नातं आहे. मानसिक आरोग्य ठीक असेल तर शारीरिक आरोग्य उत्तम असण्याची शक्यता असते. लोकांत मिसळणे, भावना व्यक्त करणे व मनसोक्त गप्पा मारणे हे तर जीवनाचे अविभाज्य अंग आहे. गप्पांअभावी आयुष्यात एकटेपणा जाणवतो. काही लोकांबरोबर गप्पा मारताना आपणास आपला वेळ कसा आनंदात गेला हे समजत नाही. काही लोकांचा सहवास नकोसा व त्रासदायक वाटतो.
सर्वसाधारणपणे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीस भेटतो तेव्हा औपचारिकता राखण्यासाठी काही प्रश्न विचारत असतो. उदाहरणार्थ एकेकाळी शिक्षक असलेल्या मावशीला, ‘आता आपली गुडघेदुखी कशी आहे? बरी आहे ना?’ लगेच तिचं रडगाणं सुरू होतं. चेहऱ्यावर त्रासिक भाव येतात. ‘चालायचं वयोमानानुसार होणारच. बसताना-उठताना गुडघे करकरतात. थंडीत थोडा त्रास होतो.’ मावशीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्याची जागा तणाव व चिंतेने घेतलेली असते. अकाली वृद्धत्व आल्याप्रमाणे ती वागू लागते. तिला होणारा त्रास पाहून विचारपूस करणारी व्यक्ती गरज नसताना सहानुभूती व्यक्त करते. त्या सहानुभूतीने तिचा आजार बरा होणार नसतो. अशा प्रकारच्या संवादाने नकारात्मक भावनांची व विचारांची देवाणघेवाण होत राहते. होणाऱ्या चर्चेमुळे जीवन किती वाईट व त्रासदायक आहे हा संदेश व सगळ्या भावना अचेतन मनात खोलवर रुतून बसतात. भेटीनंतर दोन्ही व्यक्तींना आनंद होण्याऐवजी दुःख होते.
त्याऐवजी आपण मावशीला विचारले की, ‘आपला सातवीतला द्वाड विद्यार्थी अमोल, ज्याला तुम्ही सरळ केलं तो आता काय करतो?’ लगेच मावशीच्या चेहऱ्यावर उत्साह संचारलेला दिसेल. डोळ्यामध्ये विशिष्ट प्रकारचे तेज दिसेल. आजार व दुखणे कोसोदूर पळून गेले असेल. तिच्या देहबोलीत सकारात्मक बदल झालेले असेल. त्या द्वाड मुलाला कसं चांगल्या मार्गावर आणलं, त्यामुळे त्याच्या आयुष्यात कसा आमूलाग्र बदल झाला आणि आता तो कसा मोठा व्यक्ती झालाय याबद्दल त्या रंगवून सांगायला सुरुवात करतील. शरीरामध्ये छान वाटण्यासाठी अवश्य असणारे हार्मोन्स स्रवतील. त्यावेळेपुरता तिच्या आयुष्यातल्या कटकटी, गुडघेदुखी व इतर आजारपण कुठल्या कुठे गायब झालेले असतील. ती व्यक्ती परत तारुण्यात प्रवेश करेल. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपल्यालादेखील आनंद होईल. चांगल्या भावनांची देवाण-घेवाण होईल व दोघांचा वेळ आनंदात जाईल. थोडक्यात सांगायचं तर गप्पा मारताना समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. तसंच तिला वाईट गोष्टींचे जाणीव करून देता कामा नये. तब्येत कशी आहे? ब्लड प्रेशर, डायबेटिस आता कसा आहे? सुना चांगल्या आहेत का? मुलगा काळजी करतो का, असे प्रश्न विचारून आपण नकळत जुन्या जखमेवरची खपली काढतो, अशी विचारपूस करण्याने त्या व्यक्तीस फायदा तर काहीच होत नाही, पण त्याचा त्याला त्रास नक्की होतो. गप्पांना ब्रेक लागतो. गप्पा नकारात्मक अथवा दोष देण्याकडे केंद्रित होतात. म्हणून गप्पा मारताना त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी, काळ किंवा त्यांनी केलेले कार्य याबद्दल बोलायला हवे. मग अनुभवा रंगणाऱ्या गप्पा, घनिष्ट झालेली मैत्री. एकटेपणा गायब होईल. काही क्षणापुरता आजार पळून जाईल. दोघांचा वेळ मस्त आणि मजेत जाईल. आयुष्य सुंदर वाटेल. { संपर्क : 9423553998
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.