आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाओंच्या नेतृत्वाखाली स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सुरू झालेला चीनचा प्रवास फारसा सुकर नक्कीच नव्हता. पदोपदी, अनेक गोष्टींसाठी चीनला लढा द्यावा लागला. जागतिक स्तरावर स्वतःचे अस्तित्त्वच नव्हे, तर एक महाकाय प्रचंड शक्तिशाली देश म्हणून जगात चीनला मान्यता मिळाली. भाषेची सर्वांत मोठी अडचण असूनही, चीन आज जागतिक व्यापारावर राज्य करतो आहे. भारत आणि चीनने तर मागच्या वर्षी व्यापाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या दोन्ही देशांच्या द्विपक्षीय व्यापाराने तब्बल १०० अब्ज अमेरिकी डॉलरचा ऐतिहासिक आकडा ओलांडला. परंतु, हे दोन्ही आशियाई दिग्गज, त्यांच्या संबंधांच्या खराब पॅचमधून जात असल्याने दोन्ही देशांतल्या सरकारांनी, या बातमीचा कोणत्याही प्रकारचा उत्सव करण्याचे टाळले. व्यापार मात्र जोरदार सुरू आहे. शेवटची १० अब्ज डॉलरची वाढ तर गेल्या दोन वर्षांत, म्हणजे कोरोना काळात झाली आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आत्मनिर्भरतेवर वाढीव धोरणात्मक भर आणि सीमेवर सतत तणाव असतानाही, त्यातच चीनच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू असूनही, संपूर्ण कॅलेंडर वर्षाच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये भारताचा चीनसोबतचा द्विपक्षीय व्यापार ४४ टक्क्यांनी वाढला आहे. आयात विक्रमी ४६ टक्क्यांनी वाढली, तर निर्यात ३५ टक्क्यांनी वाढली आहे. मानवी श्रमापेक्षा तंत्रज्ञानाची मदत घेणे चीनला मान्य आहे. तसे पहिले तर भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात चिनी आयातीवर अवलंबून आहे. चीनच्या आयातीवर संपूर्णपणे बहिष्कार टाकला तर भारतातील अनेक उद्योगधंदे कोसळतील. अनेक गोष्टींसाठी लागणारा कच्चा माल चीनमधूनच भारतात येतो. कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाल्यास बऱ्याच वस्तूंचे स्थानिक उत्पादन मोठ्या प्रमाणात धोक्यात येऊ शकते. गेल्या तीन दशकांत भारत आणि चीन यांच्यात अस्तित्वात असलेला समतोल, चीनला अनुकूल असलेल्या सत्तेच्या संतुलनामुळे हरवला आहे.सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय-आर्थिक आणि जुनी सभ्यता या गोष्टींबद्दल योग्य आकलन न झाल्यामुळे, दोन्ही देशांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. पण, एकूणच चीनविषयी गैरसमजांची मालिका संपूर्ण जगात सुरू असते. चीन हे एक कोडं आहे, रुबिक क्युबसारखं! जितका प्रयत्न करू तितके आपण फसत जातो, पण एकदा का त्याची थिअरी कळली की सगळं सोपं होऊन जातं आणि हे कोड सोडवण्याची थिअरी म्हणजे भाषा! नव्वदच्या दशकात चीनदेखील बाहेर बघू लागला आणि पाहता पाहता त्याने पूर्ण जगाला काबीज केलं. आज संपूर्ण जगे चीनची बाजारपेठ बनलंय. चीनमधली प्रगती डोळे दीपवून टाकणारी आहे. त्या देशाची घोडदौड सुरूच आहे. आज बलशाली अमेरिकेचा तेवढाच बलाढ्य प्रतिस्पर्धी म्हणून चीनकडे पाहिलं जातं. चीनची आर्थिक प्रगती होते आहे. आत्ता कोरोनामुळे त्याला आळा बसला असला, तरी चीन कधीही परत प्रगतिपथावर स्वार होऊ शकतो. असा हा चीन. जगाला भंडावून सोडणारा, हाँगकाँगसारख्या सगळ्यात मोठ्या बंदराचे अर्थकारण न जुमानता त्याला गुडघे टेकायला लावणारा आणि तरी अनेकांना आकर्षित करणारा. कम्युनिस्ट राजवट असूनही प्रचंड आर्थिक प्रगती करणारा हा देश. चित्र-विचित्र लिपीत लिहिणारा आणि तेवढेच विचित्र आवाज काढत बोलणारा हा चीन. नेहमी सगळ्यांशी युद्धाचीच भाषा बोलणारा, भारत, भूतान, दक्षिण आशियाई देश आणि समुद्र यांवर वर्चस्व गाजवू पाहणारा चीन. औद्योगिक क्रांतीच्या अगोदरचे; होकायंत्र, रेशीम, चहा, कागद, काड्यापेटी असे अनेक शोध लावणारा चीन. अशा या चीनचे गेल्या दोन वर्षांत आपण अनेक पैलू पहिले. त्यांचे राजकारण, त्यांची नीतिमत्ता, त्यांचे समाजकारण आणि अर्थकारणदेखील. त्याचबरोबर, चिनी माणूस, त्याची कला-संस्कृती, त्याची जिद्द हे देखील आपण पाहिले. चीन म्हणजे केवळ जगाला कोरोना देणारा देश नाही, हे सांगण्याचा हा गेल्या दोन वर्षांत मी केलेला लहानसा प्रयत्न. एक मात्र खरे, चीनवर राग धरा, त्याचा तिरस्कार करा, त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार टाका किंवा त्याच्या भाषेवर, संस्कृतीवर, खाद्यपदार्थांवर प्रेम करा... पण, चीनकडे दुर्लक्ष करून मात्र चालणार नाही, एवढे नक्की..!
संपर्क : suvarna_sadhu@yahoo.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.