आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे अंतरंग:बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारी चिनी कला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागच्या लेखात आपण चीनच्या कला-संस्कृतीचा आढावा घेतला. प्रचंड राजकीय-सामाजिक उलाढाल तसेच युद्धे, ताओ, कन्फुशियसच्या तत्त्वज्ञानाचा कलेवर कसा आणि किती प्रभाव पडला, ती कशी विकसित होते गेली, हे आजच्या भागात जाणून घेऊयात.

ए केकाळी शांघायमध्ये अनेक स्टुडिओ उभे होते. पुढे टेलिव्हिजन आला आणि विविध मालिकादेखील सुरू झाल्या. पण या सगळ्यात खंड पडला माओंनी सुरू केलेल्या सांस्कृतिक क्रांतीमध्ये. चीनची ही कला-संस्कृती होरपळून निघाली, पूर्णपणे ढवळून निघाली. आज चीनची कला संस्कृती कशी आहे? एवढी प्रचंड राजकीय उलाढाल, अनेक युद्धे आणि बुद्ध, ताओ, कन्फुश्यस ह्यांच्या तत्त्वज्ञानाचा कलेवर कसा आणि किती प्रभाव पडला, ती कशी विकसित होत गेली हे आपण आता पाहणार आहोत.

चिनी कला ही प्राचीन तशीच आधुनिकदेखील आहे. खुद्द चीनमध्ये किंवा तैवान, सिंगापूर या देशांत प्रचलित कलादेखील चिनी कला मानली जाऊ शकते. पारंपरिक चिनी कलेवर कन्फुश्यसवाद, ताओवाद आणि बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. जसजशी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बदलत गेली, नवीन तंत्रज्ञान विकसित होत गेले, चिनी कलेतही तो फरक दिसून आला. प्राचीन चीनमधील कलाकार आणि कारागीर, शाही न्यायालय आणि अभिजात वर्गाच्या संरक्षणावर खूप अवलंबून होते. कन्फुश्यसचे तत्त्वज्ञान, ज्याचा प्रसार इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाला, त्याने एक कठोर सामाजिक आणि राजकीय पदानुक्रम आणि सुसंवाद, सुव्यवस्था आणि नियमन यांचे जाळे स्थापित केले. शिक्षणाबद्दल आदर आणि भूतकाळातील आदराच्या या वृत्तीने हिंसक राजवंशीय बदलांमधूनही कलात्मक परंपरा जपणाऱ्या सुशिक्षित अभिजात वर्गाची निरंतरता सुनिश्चित केली. राजदरबारात नोकरीसाठी परीक्षा देणे गरजेचे केले गेले आणि या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना विद्वान अभिजात वर्गात उन्नत करण्यात आले. ताओवादाने “स्वर्ग, पृथ्वी आणि मी’ आमचे एकत्र अस्तित्व आहे, या संकल्पनेवर जोर दिला आणि त्याचे प्रतिबिंब कलेवर दिसू लागले. निसर्गाशी जोडून साधे जीवन जगणे, यावर ताओचे तत्त्वज्ञान आधारित होते. कलाकारांनी त्यांच्या भूदृश्यांमध्ये पाणी, झाडे, पर्वत आणि ढग यांसारख्या घटकांच्या समतोलातून निसर्गातील सुसंवाद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. विस्तीर्ण नैसर्गिक सेटिंग्जमध्ये लोकांना अनेकदा लहान व्यक्ती म्हणून चित्रित केले गेले. या काळातील अनेक, लेखक, चित्रकार, शिल्पकार, कवी ह्यांनी कन्फुश्यसची विचारधारा झुगारून दिली आणि निसर्गाच्या जवळ राहून कला निर्मिती केली. पहिल्या शतकाच्या आसपास चीनमध्ये आलेल्या बौद्ध धर्माने ताओवादी संकल्पनांशी सुसंगतता निर्माण केली. बौद्ध धर्माचा विविध कलांवर प्रभाव पडू लागला. धर्म वाढवण्यासाठी देवालये बांधण्यात आली आणि त्यामध्ये बुद्धांची प्रतिमा पण बसवण्यात येऊ लागली. नाटक आणि कवितांच्या माध्यमांद्वारेही बौद्ध धर्माचा प्रचार होऊ लागला. बुद्धांची ध्यानस्थ प्रतिमा निसर्गाच्या अधिक जवळ वाटू लागली.

अनित्याच्या अनुषंगाने इतर कलांवरदेखील प्रभाव पडला. बौद्ध धर्माचा विशेष प्रभाव चीनमधील शिल्पकला आणि वास्तुकलेवर अधिक झाला. जुन्या सिल्क रोडच्या जवळ असलेल्या कान्सू प्रांतातील तुनहुआंगजवळील मोकाओ लेण्यांमध्ये सर्वात जुनी शिल्पे सापडतात. सहाव्या शतकाच्या मध्यात, बुद्ध, बोधिसत्त्व आणि मैत्रेय यांची मुक्त-स्थायी, त्रिमितीय शिल्पे विशेष चिनी शैलीत तयार होऊ लागली. सुई आणि थांग राजघराण्यांच्या काळात (इ.स. ५८१ - ९६०) बौद्ध वास्तुकला आणि शिल्पकलेची भरभराट झाली. थांग राजवंशांत कलेवर परकीय प्रभाव भरपूर दिसून येतो. याच काळात भारतातील गुप्त राजवंशाच्या कलेने प्रेरित होऊन चिनी बौद्ध शिल्पकला शास्त्रीय स्वरूपात परत आली. मिंग राजघराण्यापर्यंत, म्हणजे सुमारे ६०० वर्षे बौद्ध शिल्पकलेची भरभराट होत राहिली. या काळानंतर जेड, हस्तिदंत आणि काचेमध्ये उत्कृष्ट सूक्ष्म शिल्पे तयार केली गेली. बौद्ध मंदिरांची वास्तू कन्फ्युशियन आणि ताओवादी मंदिरांसारखी होती. भारतीय स्तुपांवर आधारित पवित्र ग्रंथ आणि अवशेष ठेवण्यासाठी पॅगोडा बांधले गेले. या प्रकारे बदलत्या काळानुसार आणि त्या काळाच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित कलेवर विविध प्रभाव पडल्याचे दिसून येते. चिनी कलेमध्ये ललित कला, लोककला आणि कार्यप्रदर्शन कला समाविष्ट आहेत आणि चित्रकला, कविता, सुलेखन, वास्तुकला, मातीची भांडी, शिल्पकला, कांस्य, जेड कोरीव काम, कापड आणि इतर सजावटीच्या कलादेखील येतात.

सुवर्णा साधू संपर्क : suvarna_sadhu@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...