आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे अंतरंग:चीनची चित्रकला संस्कृती

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये चित्रकलेचा चार प्रमुख कलांपैकी एक असा लौकिक होता. समजात आणि राजदरबारातदेखील चित्रकारांना अत्यंत सन्मानाने वागवले जात असे. चिनी चित्रकला ही जगातील सर्वात जुन्या आणि अखंड कलात्मक परंपरांपैकी एक आहे, ज्याची उत्पत्ती सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी झाली असावी. सर्वात जुनी चित्रे शोभेची होती, प्रातिनिधिक नव्हती, त्यात चित्रांऐवजी नमुने किंवा रचनांचा समावेश होता. पाषाणयुगातील चित्रे रेखा, ठिपके किंवा प्राण्यांनी तयार केलेली असत. पुढे मात्र कलाकारांनी त्यांच्या सभोवतालच्या जगाचे प्रतिनिधित्व, दगडांवर रंगवण्यास सुरुवात केली.

कन्फ्युशियन क्लासिक्समध्ये कलर पेंटिंगचा उल्लेख आहे. चीनमध्ये अगदी प्राचीन काळातील रेशीम, लाख किंवा मातीची भांडी यांच्या नमुन्यांवरही तेल रंगाचा वापर आढळून आलाय. परंतु याला विशिष्ट स्वरूप आणि शैली प्राप्त व्हायला ख्रिस्तपूर्व तिसरे शतक उजाडले. कारण या काळात चिनी चित्रकारांना ब्रशचा शोध लागला. सुरुवातीला शिकारी, लढाया, मिरवणुका आणि यासारख्या महत्त्वाच्या घटनांची सचित्र नोंद ठेवण्याच्या उद्देशाने चिनी चित्रकला आकृती-चित्राने सुरू झाली. हान राजवंश काळात ऐतिहासिक दृश्ये आणि आकृत्यांची भित्तिचित्रे आधीपासूनच अस्तित्वात होती आणि हान दरबारात सम्राटाच्या उपस्थितीत चित्रकार होते. औरंगाबाद नजीकच्या अजिंठा लेण्यासाराख्याच चीनमध्ये तून-हुआंग आणि मो-काओ लेण्या आहेत, जिथे बुद्धाच्या जीवनावर आधारित अप्रतिम भित्तिचित्रे, म्युरल्स पाहायला मिळतात.

चिनी चित्रकलेवर बौद्ध आणि ताओवादाचा खूप प्रभाव आहे. मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद प्रकट करण्याच्या कलाकाराच्या क्षमतेवर भर दिला जातो. चित्रकाराने ब्रशस्ट्रोकमध्ये अाध्यात्मिक ऊर्जा ओतण्यासाठी वेग, चैतन्य, आत्मविश्वास आणि तांत्रिक प्रभुत्व यासह कार्य केले पाहिजे. चिनी चित्रे एखाद्या विषयाचे वास्तविक स्वरूप टिपण्याऐवजी त्याचे आवश्यक स्वरूप किंवा वर्ण टिपतात. त्यांचा एकच दृष्टिकोन नसतो, पेंटिंगचे प्रत्येक क्षेत्र पाहणाऱ्यासाठी आल्हाददायक असले पाहिजे. लँडस्केप अनेकदा विहंगम दृष्टिकोनातून रंगवले जातात, जेणेकरून एकाच वेळी अनेक गोष्टी दाखवता येतात.

चिनी पेंटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याने कागदावर आणि रेशमावरील ब्रश आणि शाईने त्याचे वैशिष्ट्य आणि विकास हजारो वर्षांमध्ये निश्चित केले आहे. चित्रकार पाने, गवत, झाडे, फुलांच्या पाकळ्या, बांबू, पर्वत, खडक, मासे, पाणी, बोटी पेंट करण्यासाठी स्टिरियोटाइप ब्रशस्ट्रोकचा सराव करतात. एकदा का चित्रकाराने या तंत्रांवर प्रभुत्व मिळवले की, तो तांत्रिकतेच्या पलीकडे जाऊन त्याच्या वैयक्तिक शैलीत मुक्तपणे आपली प्रतिभा व्यक्त करू शकतो. जेव्हा एखादा कलाकार केवळ तंत्रापासून मुक्त होतो आणि कागदावर आपली जिवंत प्रतिभा व्यक्त करतो त्याला ‘फ्लाइट ऑफ द ड्रॅगन’ असे म्हणतात.

चिनी चित्रकलेचे तीन मुख्य विषय आहेत : मानवी आकृत्या, निसर्गचित्रे आणि पक्षी आणि फुले. तांग राजवंशाच्या काळात आकृती चित्रकला खूप विकसित झाली आणि लँडस्केप पेंटिंगने सुंग राजवंशाच्या काळात उंची गाठली. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात चिनी चित्रकारांना पाश्चात्त्य कलेची ओळख झाली आणि त्यांनी पारंपरिक चिनी चित्रकला, पाश्चात्त्य प्रभाववाद आणि दृष्टिकोन मिळून एक नवीन शैली विकसित केली. चिनी चित्रकलेत प्रतीकात्मकता अधिक असल्याने बऱ्याचदा पाश्चिमात्य लोकांना ती कळत नाही. म्हणजे पर्वत, नद्या, झाडे, प्राणी, पक्षी, फुले इ. त्यांच्या केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, तर मनुष्याच्या आयुष्यात त्याचे किती आणि कसे महत्त्व आहे यावर आधारित चित्र काढले जाते. चिनी साहित्यात प्लम ऑफ ब्लॉसम, ऑर्किड, बांबू आणि क्रिसॅन्थमम हे चार सज्जन म्हणून ओळखले जातात. ते चार ऋतूंचेदेखील प्रतीक आहेत. म्हणून अनेक पारंपरिक चिनी चित्रकलेत आपल्याला या चार गोष्टी हमखास पाहायला मिळतात. चिनी चित्रकलेची प्रमुख सहा तत्त्वे शिये ह यांनी लिहून काढली, ज्यात चिनी चित्रकलेत काय पाहावे, चित्रकाराचे प्रभुत्व कसे ओळखावे हे सांगितले आहे. अर्थात, चिनी चित्रकलेच्या प्रत्येक कालखंडात या सहा तत्त्वांचा अर्थ लावण्याची स्वतःची खास पद्धत आहे त्यांचा उपयोग आहे, जो रंग, कालावधी आणि कलाकारानुसार बदलतो. आजही चीनमध्ये आणि जागतिक कला क्षेत्रात चिनी चित्रकलेला तेवढाच मान आहे. होतकरू चित्रकार हजारोंच्या संख्येने दरवर्षी कला विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी परीक्षा देतात. या परीक्षा कधी कधी २४ तास चालतात, ज्यात त्यांनी कला असाइनमेंटचा एक निर्दिष्ट संच पूर्ण करणे आवश्यक असते. या दीड-दोन लाख विद्यार्थ्यांमधून केवळ ४००-५०० अर्जादारानाच प्रवेश मिळतो. अर्थातच चीन त्यांची ही पारंपरिक कला जोपासण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे हे दिसून येते.

सुवर्णा साधू संपर्क : suvarna_sadhu@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...