आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:ऊर्जा बाजारात झाले कोळशाचे पुनरागमन

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष १३०६ : ब्रिटनचा उन्हाळा. नाइट्स, बॅरन्स बिशप्स म्हणजेच ब्रिटनचे सरंजामदार गावांमधील आपली संस्थाने व किल्ल्यांपासून दूर लंडनला आले होते. तिथे संसदेचा पहिला प्रयोग सुरू होता. सरंजामदारांचे स्वागत हवेत मिसळलेल्या एका विचित्र गंधाने केले. तिखट, मसालेदार गंध नाकामार्गे घशापर्यंत जात होता. हा गंध कोळशाचा होता. त्या वेळेपर्यंत लंडनचे कारागीर लाकडाऐवजी तो काळा दगड जाळत होते. सरंजामदारांनी धुराचा विरोध केला असता सम्राट एडवर्डने कोळशाच्या वापरावर बंदी घातली. या बंदीचा फार परिणाम झाला नाही म्हणून कठोरपणे दंड आकारला, भट्ट्या तोडण्यात आल्या. मात्र, काळ कोळशासोबत होता. १५०० मध्ये ब्रिटनमध्ये ऊर्जा टंचाई निर्माण झाली. कोळशाचे संघटित आणि व्यापक खाणकाम सुरू करणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला. पहिली औद्योगिक क्रांती कोळशाच्या धुराने झाकून पृथ्वीवर आली. याच्या सुमारे ५२१ वर्षांनंतर जगाला पुन्हा कोळशाच्या धुरामुळे त्रास जाणवायला लागला. कारण धुराचे वातावरण पृथ्वीचे तापमान वाढवून विनाश घडवत होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या जागतिक मेळाव्यात ठरले की, २०२३ पर्यंत विकसित देश व २०४० पर्यंत विकसनशील देश कोळशाचा वापर बंद करतील. यानंतर थर्मल पॉवर म्हणजेच कोळशापासून वीज तयार होणार नाही. भारत-चीन राजी झाले नाही, पण ४० देशांनी कोळशाचा त्याग केला. २० देशांनी हेही ठरवले की, २०२२ अखेरपासून कोळशावरील वीज प्रकल्पांचे आर्थिक पोषण बंद केले जाईल. अशा रीतीने नव्या खाणींचे काम थांबले. अँग्लो ऑस्ट्रेलियन मायनिंग दिग्गज रिओ टिंटो यांनी ऑस्ट्रेलियातील आपल्या खाणीतील ८०% भागीदारी विकून कोळशाला श्रद्धांजली देण्याच्या व्यवसायाची नोंद केली. काळा सम्राट परतला : कोळसा मेला नाही. कल्पनारम्य नायक किंवा भारतीय मालिकांच्या हीरोप्रमाणे तो परतला. पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करत जगातील ऊर्जा योजना काळ्या समुद्रात बुडवल्या. पर्यावरण संरक्षणाची वचने व दावे मागे राहिले. संपूर्ण जग कोळसा घेण्यासाठी धावत आहे. जे कोळशाचे युग संपल्याची निमंत्रणे वाटत होते ते सर्वात पुढे आहेत. जगातील सुमारे ३७% वीज कोळशाद्वारे येते. याच्या क्षमतेचा बहुतांश हिस्सा युरोपच्या बाहेर स्थापित होता. युरो-स्टेटच्या आकडेवारीनुसार २०१९ पर्यंत युरोपला आपल्या केवळ २०% ऊर्जेसाठी कोळशाचा मोह होता. उर्वरित ऊर्जा सुरक्षित स्रोत व गॅसद्वारे येत होती. युरोप २०२५ पर्यंत आपले बहुतांश कोळसा वीज संयंत्र बंद करणार होता. मात्र, आता रशियाचा गॅस मिळत नसल्याने ऑस्ट्रिया, जर्मनी, इटली व नेदरलँड्सने आपली जुनी संयंत्रे सुरू करण्याची घोषणा केली. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने (आयईए) सांगितले की, युरोपियन समुदायात कोळशाचा वापर २०२२ मध्ये सुमारे ७ टक्के वाढेल. संपूर्ण जगात कोळशाचा वापर यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये ८ अब्ज टन होईल. तो २०१३ च्या विक्रमी वापराइतका आहे. किंग कोलच्या किमतीत वाढ : या वर्षीच्या मे महिन्यात किंमत ४०० डॉलर प्रति टन इतकी झाली आहे. मायनिंग डॉट काॅम आणि इन्फोरिसोर्सने सांगितले की, जगाच्या ताज्या खाण गुंतवणुकीत कोळसा आता तांब्याच्याही पुढे आहे. २०२२-२३ मध्ये सुमारे ८१ अब्ज डॉलरचे १८६३ कोळसा प्रकल्प सक्रिय आहेत. २०२२ च्या जूनपर्यंत जगातील कोळसा पुरवठा साखळीतील गुंतवणूक विक्रमी ११५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती. यामध्ये मोठा हिस्सा चीनचा आहे. जगातील बँकर आणि कंपन्या कोळशाला भांडवल देत आहेत. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आणि पाचवा सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश आहे. येथील खाण उद्योगाला सिटी ग्रुप, बीएनपी पारिबा, स्टँडर्ड अँड चार्टर्डचे कर्ज जानेवारी २०२२ मध्ये २७ टक्के वाढले. आशियाची कोळशाची गरज पाहता इंडोनेशिया सर्वात मोठा पुरवठादार आहे. अमेरिका कोळशाचा स्विंग उत्पादक आहे. गेल्या वर्षी चीनने ऑस्ट्रेलियाकडून कोळसा आयातीवर बंदी घातली. त्यानंतर अमेरिकेची कोळसा निर्यात सुमारे २६ टक्के वाढली आहे. भारत आणि चीनची अस्वस्थता : रशिया, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया हे कोळशाचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत. यांच्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि कॅनडाचा नंबर लागतो. चीन, जपान आणि भारत सर्वात मोठे आयातदार आहेत. आता युरोपही या रांगेत बसणार आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनुसार, भारत आणि चीनच्या मागणीने बाजारपेठ हलवून टाकली आहे. यांचा कोळसा वापर संपूर्ण जगाच्या एकूण वापराच्या दुप्पट आहे. जगाची अर्धी कोळसा मागणी केवळ चीनकडून येते. चीनची ६५ टक्के वीज कोळशाद्वारे येते. त्यांच्याकडे कोळशाचा स्वत:चा मोठा साठादेखील आहे. गॅस महागल्याने व टंचाईमुळे येथील नव्या खाण प्रकल्पांतील गुंतवणूक वाढवली जात आहे. भारतात या वर्षी फेब्रुवारीत कोळशाचे संकट आले होते. महाकाय सरकारी कोल कंपनी कोल इंडिया पुरवठादाराऐवजी आयातदार बनली. या वर्षी भारताची कोळसा आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट झाली आहे. आयईएचा अंदाज आहे की, भारतात कोळशाची मागणी यावर्षी ७ ते १०% वाढेल. सर्व अपमान, शाप-अभिशापानंतरही कोळसा परतला आहे. आता जगाला धूररहित कोळसा हवा असेल तर एक टन कोळसा स्वच्छ करण्यासाठी १००-१५० डॉलर प्रति टन खर्च येऊ शकतो. ग्लोबल कार्बन कॅप्चर अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या मते, जगाला दरवर्षी यावर सुमारे १०० अब्ज डॉलर खर्च करावे लागतील. धूर किंवा महागड्या विजेपैकी एकाची निवड करावी लागेल आणि ही निवड सोपी राहणार नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत)

अंशुमान तिवारी मनी-९ चे संपादक anshuman.tiwari@tv9.com