आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सांगतो ऐका...:कॉफी

अरविंद जगताप19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक महिना झाला संदेश कॅफेमध्ये गेला नव्हता. मिताली सोडून गेली आणि त्याचं कॅफेमध्ये जाणं बंद झालं. तसाही मार्केटिंगच्या जॉबमुळे तो दोन आठवडे बाहेरच होता. तो आणि मिताली नेहमी त्याच कॅफेत भेटायचे. ठरलेलं टेबल होता. ठरलेला वेटर होता. ठरलेली कॉफी होती. ठरलेली वेळ होती. अर्थात, संदेश नेहमी उशिरा यायचा. मिताली एकटीच वाट बघत बसलेली असायची. कधी अर्धा तास. कधी एक तास. संदेशचीही चूक नव्हती. जॉबच तसा होता. वेळ हातात नसायची. समोरचा कधी भेटीची वेळ देणार त्यावर सगळं अवलंबून. त्यामुळे नेहमी उशीर व्हायचा. मितालीच नाही, तर नेहमीचा वेटर असलेला सुमीतसुद्धा त्याला वारंवार सांगायचा. पण, संदेशचं उशिरा येणं थांबलं नाही. आज मात्र संदेश वेळेवर आला होता. पण, कुणी भेटणार नव्हतं. सुमीत नेहमीप्रमाणे दोन कॉफी घेऊन आला.

संदेश त्याच्याकडे बघतच राहिला. सुमीतला काय सांगावं, हे त्याला कळत नव्हतं. ब्रेकअप झालाय म्हणावं? की मिताली आपल्याला सोडून गेली म्हणावं? सुमीत शांत होता. संदेश म्हणाला, ‘आज ती येणार नाही..’ सुमीत काहीच बोलला नाही. संदेश म्हणाला, ‘आता ती कधीच येणार नाही. आमचं ब्रेकअप झालंय.’ सुमीत शांत होता. संदेश पण आता फार काही बोलायच्या मूडमध्ये नव्हता. इशारा करून ती कॉफी परत न्यायला सांगत होता. पण, सुमीत तसाच उभा राहिला. म्हणाला, ‘आज कॉफी माझ्याकडून. मी विचार केला, की तुमच्याशी थोडा वेळ बोललं पाहिजे..’ संदेशला आश्चर्याचा धक्का बसला. कॉफी महाग होती म्हणून नाही. पण, संदेशला वाटलं की कुणाला तरी आपली काळजी आहे. महिना झाला त्याला या विषयावर बोलायचं होतं. पण, कुणाशी बोलणार? मिताली आपल्याला सोडून गेली, बोलणं बंद केलं, हे कसं सांगणार? त्याने तिला फेसबुकवर शेकडो मेसेज पाठवले. पण रिप्लाय नाही. मोबाइलवर तर त्याचा नंबर ब्लॉक केलाय. कंटाळून संदेशने प्रयत्न सोडून दिला.

सुमीत उभाच होता. संदेशने त्याला बसायला सांगितलं. सुमीत काही बोलू लागणार एवढ्यात संदेश म्हणाला, ती आली होती का इथे? सुमीतने नकारार्थी मान हलवली. काही क्षण दोघे शांत होते. संदेशला त्यांच्या भेटी आठवत होत्या. ती सतत त्याच्या बाइकच्या चावीशी खेळत असायची. त्याला दर आठवड्याला नवीन किचेन भेट द्यायची. कधी स्वतः बनवायची. तिला एसी फार सहन व्हायचा नाही. गरम कॉफीचा कप दोन्ही हातात धरून ठेवायची. कधी कप कपाळाला लावायची. सारखी हसायची. कधी संदेशचा हात हातात घ्यायची आणि भविष्य सांगायची. तिला भविष्य कळत नव्हतं. पण, ती उत्साहात बोलत राहायची. तिने दोघांसाठी पाहिलेली स्वप्नं सांगत बसायची. एवढी सलग बोलायची, की जणू संदेशच्या हातावर लिहिलेल्या ओळी वाचतेय. कधी कधी ती एकटक संदेशच्या डोळ्यांत बघायची. तिची ही सवय संदेशला आवडायची नाही. पण, मिताली सारखी त्याला चॅलेंज करायची. कोण जास्त वेळ एकटक डोळ्यात डोळे घालून बघतो. आणि या खेळात नेहमी तीच जिंकायची. संदेशच्या डोळ्यांची हमखास उघडझाप व्हायची. मिताली मात्र कितीतरी वेळ अजिबात डोळ्यांची उघडझाप न करता बघू शकायची. संदेशला नख खायची सवय होती. मितालीला त्याची ही सवय मोडायची होती. पण, ते काही शेवटपर्यंत जमलं नाही. आताही विचार करता करता संदेश नकळत नख खाऊ लागला. भानावर आला तेव्हा त्याने हात बाजूला केला. सुमीतकडे बघितलं. सुमीतने पुन्हा एकदा त्याला कॉफी घ्यायचा आग्रह केला.

सुमीत संदेशला बोलणार एवढ्यात संदेश म्हणाला, ‘मला सिम्पथी नकोय. मी सुखी आहे. उलट बरं झालं ती सोडून गेली. मुली अशाच असतात..’ मग संदेशने कॉफीचा हिशेब काढला. दीड वर्ष तो आणि मिताली जवळपास रोज त्या कॅफेमध्ये यायचे. बिलाचा हिशेब केला तर लाखभर रुपये सहज खर्च झाले होते संदेशचे. तेवढ्या पैशात आपण एखादा छान मोबाइल घेतला असता किंवा बाइक घेतली असती, असं त्याला वाटून गेलं. संदेश खूप वेळ सुमीतला समजावत राहिला, की मुलींवर पैसे खर्च करण्याची चूक करू नकोस. आपण मुलं खूप हळवे असतो. मुली खूप कठोर असतात. संदेश मनाला येईल ते बडबडत राहिला. अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सुमीतही अस्वस्थ झाला. त्याला आठवत होतं, संदेश आणि मिताली याच टेबलवर तासन््तास गप्पा मारत बसायचे. हसायचे. भांडायचे. मध्येच संदेश रागावून निघून जायचा. मग सुमीत त्याला बोलावून आणायचा. खरं तर संदेश रागावला तरी फार लांब जायचा नाही. बाहेर कुठेतरी उभा राहायचा. सुमीत त्याची समजूत घालून त्याला परत आणायचा. सुमीतच्या हातची कॉफी दोघांना आवडायची. संदेश यायला उशीर करायचा तेव्हा सुमीत मितालीशी बोलत बसायचा. तिला वाचायला काहीतरी आणून द्यायचा. त्याच्या मोबाइलवर असलेले गमतीशीर व्हिडिओ दाखवायचा. त्यामुळे मितालीला संदेशची वाट पाहणं फार जिवावर यायचं नाही. संदेश आल्यावर मात्र सुमीत दोघांकडे फिरकायचा नाही. पण, दोघे सारखे कुठल्या ना कुठल्या गोष्टीत त्याला बोलवायचे. कधी संदेशच्या शर्टचा रंग मितालीला आवडायचा नाही. मग मिताली सुमीतला बोलवायची आणि विचारायची, ‘तुला हा रंग आवडतो?’ अशा वेळी सुमीतची पंचाईत व्हायची. पण, खूपदा त्याचं उत्तर मितालीला अपेक्षित असलेलं असायचं. अशा वेळी खोटं खोटं रागवत संदेश म्हणायचा, ‘हा आपलं बोलणं चोरून ऐकतो..’ तिघेही हसून विषय बदलायचे. त्यांच्या कित्येक भांडणात सुमीत साक्षीदार होता. मध्यस्थ होता.

संदेशने कशीबशी कॉफी संपवली. सुमीतला म्हणाला, मला वाटलं होतं निदान कॉफीसाठी तरी कधी येईल ती इथे. पण, पोरींची आवड खोटी असते. आपण उगीच खरं समजतो सगळं. मला सांग, माझ्यात काय कमी आहे? काय दोष आहे? असं अचानक तिने सोडून जाण्यासारखं काय केलं मी? तिच्यासाठीच तर सगळी धावपळ चालू होती. लग्न करायचं म्हणून दोन जॉब करत होतो. पैसे वाचवत होतो. तिला फार वेळ देता येत नव्हता. पण, शेवटी तिच्या आनंदासाठीच चाललं होतं. काय मिळालं तिला? मला दुखवून सुखी होणार नाही ती. तिला एखादा मूर्ख नवरा भेटेल, जो तिला एक मिनिट पण वेळ देणार नाही. अशा मुली कधीच सुखी राहत नाहीत. सुमीत शांतपणे ऐकत होता. त्याने दोघांचे कप उचलले. विसळून ठेवले. दुसऱ्या टेबलवर ऑर्डर विचारायला गेला. संदेश एकटाच बसलेला होता. सुमीत आपल्या कामात मग्न होता. काचेतून बाहेर बघताना त्याला अचानक मिताली दिसली.

कॅफेच्या दाराशी येऊन उभी राहिली. तो घाईत बाहेर गेला. मिताली त्याला बघून हैराण झाली. संदेश तिला ओरडून विचारू लागला. रागावू लागला. विनंती करू लागला. मिताली काही बोलली नाही. संदेश जरा वेळाने भानावर आला. त्याचं लक्ष तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेलं. तो हैराण होऊन बघत राहिला. मिताली म्हणाली, दोन आठवडे झालं लग्न होऊन. तू नेहमी उशीर करायचास. मी एकटीच वाट बघायचे. त्या प्रत्येक वेळी सुमीत माझी खूप काळजी घ्यायचा. एकटं वाटू द्यायचा नाही. हसवंत राहायचा. बोलत राहायचा. हळूहळू लक्षात आलं, की मला आनंदी ठेवण्यासाठी किती धडपड करतो तो. एक दिवस मीच त्याला विचारलं, ‘लग्न करशील?’ सुमीत आधी ‘नाही’ म्हणाला. तो तुझा विचार करत होता. पण, मी त्याला म्हणाले, ‘संदेशशी लग्न हा विषय माझ्यासाठी संपला. तू त्याचा विचार करू नको. माझा विचार करून सांग.’ मग तो म्हणाला, ‘मी तुला घरी कॉफी पाजू शकतो. कॅफेत नाही..’ मला तरी कुठे आयुष्य कॅफेत काढायचं होतं? मला माझ्यासाठी वेळ असणारा जोडीदार पाहिजे होता. जॉब काय, मी पण करतेच की आता.

मिताली कॅफेत गेली. तिने घरून आणलेला डबा सुमीतला दिला. जाताना तिने संदेशकडे बघितलंही नाही. संदेश काही क्षण पाठमोऱ्या मितालीकडे बघत राहिला. मग अचानक त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं. एक मीटिंग होती. आता त्याला आयुष्यात कधीच कुठल्याच गोष्टीला उशीर करायचा नव्हता. संदेश घाईत बाइकला किक मारून निघाला. वेळेची किंमत कळायला फार मोठी किंमत चुकवली होती त्याने...

बातम्या आणखी आहेत...