आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनलॉक:कलेक्टर पिंटुशेठ झिंदाबाद !

नितीन थोरातएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खुशखबर... खुशखबर... खुशखबर... आ ज रात्री ठीक साडेसात वाजता.. आज रात्री ठीक साडेसात वाजता.. चंक्या वाण्याच्या दुकानासमोरच्या चौकात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. भावी जिल्हाधिकारी... तालुक्यातले पहिले भावी आयपीएस अधिकारी... अंबडगावचे भूषण आणि काळतोंडे परिवाराचे कुलदीपक गणेशराव काळतोंडे ऊर्फ पिंटुशेठ यांचा आज जंगी सत्कार ठेवण्यात आला आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला येऊन पिंटुशेठ यांच्या आत्मविश्वासाला बळ द्यावे, ही काळतोंडे परिवारातर्फे आग्रहाची विनंती...

डोक्यावर भोंगा घेऊन एक जीपगाडी फिरत होती. अंबडगावच्या चौकात मी जोडीदारासोबत चहा पीत बसलो होतो. जीपवर पिंटुशेठचा फ्लेक्सही लावला होता. पांढरा सदरा, डोळ्याला गॉगल, हातात सोन्याचं ब्रेसलेट घातलेले पिंटुशेठ युवा नेत्यासारखे दिसत होते. करमणूक म्हणून मी कार्यक्रमाला जायचं ठरवलं आणि बरोबर साडेसातला जोडीदारासोबत चौकात जाऊन बसलो. पिंटुशेठ दिमाखात व्यासपीठावरच्या खुर्चीवर बसलेले होते. गावच्या सरपंचांनी पिंटुशेठचा सत्कार केला आणि माइक पिंटुशेठच्या वडिलांच्या हातात आला. कमालीचे भावुक झालेले पिंटुशेठचे वडील बोलू लागले...

‘आमचा पिंट्या काल-परवापर्यंत पांदीला डुकरं मारत हिंडायचा. पण, आता आमचा पिंट्या जिल्हाधिकारी होणार या आनंदात काय बोलावं तेच सुचंना.. मी जोडीदाराकडं बघितलं आणि म्हणालो, ‘पिंट्या यूपीएससीची प्रीलिम पास झालाय का?’ जोडीदारानं नकारार्थी मान डुलवली अन् म्हणाला, ‘नाय.. त्याला पुण्यातल्या एका यूपीएसीच्या क्लासला अ‍ॅडमिशन मिळालंय.’ मी डास मारावा तसा कपाळावर जोरात हात मारला आणि समोर बघू लागलो. पिंट्याचे वडील पुढं बोलू लागले... ‘मी सगळ्या गावासमक्ष आज पिंट्यापुढं मागणी घालतोय, की उद्या तू कलेक्टर झाला की पहिल्यांदा आपल्या गावातल्या स्मशानभूमीचा कायापालट कर. गावात डांबरी रस्ते बनव. मागच्या वर्षी तुझा आज्जा वारला तवा त्याची मैत न्यायलाबी नीट रस्ता नव्हता. दोन वेळा आज्जा तिरडीवरून खाली पडला तवा माझ्या मनाला किती सल लागली.. याचा तू बदला घेतला पाहिजे पिंट्या. ‘वाँटेड’ पिक्चरमधल्या सलमान खानसारखा तू आयपीएस हो आणि कंबरेला पिस्तूल लावून साऱ्या गावात फिर तू पिंट्या. एकाबी गुंडाला जिवंत सोडू नको. आपलं रानबी कुणी कोराय नाय पाहिजे. अन् पाइपलाइन टाकताना कुणी वाकड्यातबी शिरलं नाय पाहिजे. एकदा का आमचा पिंट्या कलेक्टर झाला की मग बघतो आमच्या वावरातून ऊस बाहेर काढताना शेजारच्या रानातली लोकं रस्ता कसा देत नाय..?’

‘अरे विषय काय, हा बाबा बोलतोय काय..’ असं म्हणत वैतागून मी जोडीदाराकडं बघितलं, तसं जोडीदारानं मला शांत राहायला सांगितलं. निवेदकानं माइक घेतला आणि पिंटुशेठच्या आईला बोलण्यासाठी बोलावलं. पिंट्याच्या आईनं डोळ्याला पदर लावला आणि दोन मिनिटं मुसमुसत रडून घेतलं. ‘पिंट्या कलेक्टर हुईल असं मला स्वप्नातबी वाटलं नव्हतं. पण, बाळा तू कलेक्टर झाला की मामानी आपल्यावर केलेला अन्याय विसरू नको. तुझ्या मामांनी तुझ्या आईच्या वाटणीची दीड एकर अजून माझ्या नावावर केल्याली नाय. पहिली त्यांच्या ताब्यातून ती जमीन घे अन् माळ्यावर ठेवल्याली पितळीची भांडीबी मला आणून दे. बास! लेकरा.. एक आई म्हणून मला तुझ्याकडनं येवढीच अपेक्षाहे..’

कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या मंद माणसांच्या कार्यक्रमाला आलो, असा विचार मनात येत असताना निवेदकानं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सुरू केला. त्यामध्ये दहावी - बारावीत नव्वदहून जास्त टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पिंटुशेठच्या हस्ते करण्यात आला. दहा - बारा पोरांचा सत्कार झाला आणि पिंटुशेठ माइकसमोर आले. हे महाशय भाषणात काय दिवे लावणार, असा विचार डोक्यात आला तोच ‘भावी जिल्हाधिकारी... तालुक्यातले पहिले भावी आयपीएस अधिकारी पिंटुशेठ यांचा विजय असो!’ अशा घोषणा होऊ लागल्या. स्टेजवर जाऊन पिंट्याच्या कानाखाली मारावी, असं वाटत असतानाच पिंटुशेठने भाव खात समोर उपस्थित असलेल्या वीस - पंचवीस लोकांच्या महाविराट जनसमुदायाकडं पाहिलं आणि सगळ्यांना हात करत शांत व्हायला सांगू लागला. मुळात घोषणा फक्त पिंटुशेठचे तीन मित्रच देत होते. लांबून त्यांच्या दिशेनं दगडं फेकावी असं वाटत होतं.

पिंटुशेठ बोलू लागले, ‘आईवडील.. माझे शाळेतले गुरुजन आणि समस्त गावकऱ्यांचा मी आभारी आहे, की तुम्ही मला हा मान दिला. कलेक्टर व्हावं असं माझं ध्येय नव्हतं. मी तीन वेळा दहावी नापास झालो तेव्हा तर मी आशाही सोडून दिली होती..’ अरे देवा! दहावी नापास झालेल्या पोराकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय, याचा मला साक्षात्कार झाला आणि गुमान मान खाली घातली. पिंटुशेठ पुढं बोलतच होते.. ‘पण नापास होणं म्हंजे तुम्ही अडाणी आहात, असा अर्थ होऊ शकत नाही. कदाचित पेपर तपासणाऱ्या गुरुजीचं त्याच्या बायकोसोबत भांडण झालेलं असू शकतं आणि त्याचा राग आपल्यावर निघाला असू शकतो. असा विचार करत मी सतरा नंबरचा फॉर्म भरून बाहेरून पेपर दिले आणि शेवटी मी पास झालो.

मला आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला, या राज्याला आणि या देशाला दाखवून द्यायचं आहे, की आमच्या रानातल्या उसात मधोमध गांजा पिकत असला म्हणून माझे वडील गुन्हेगार ठरत नाहीत. कारण गांजा ही या गावाची गरज आहे. चाळीस किलोमीटर अंतरावर जाऊन हे गावकरी गांजा विकत आणत असतील, तर त्यांची सोय व्हावी म्हणून वडिलांनी गावात गांजा पिकवला तर हा गुन्हा कसा होऊ शकतो? उलट ही समाजसेवा आहे आणि ग्रामपंचायतीनं माझ्या वडिलांचा सत्कार करावा, असा मी भावी कलेक्टर या नात्याने ग्रामपंचायतीला आदेश देतो. मगाशी वडील म्हणाले, की कलेक्टर झाल्यावर रस्ते नीट कर. पण मी वडिलांना जाहीरपणे सांगू इच्छितो, की याच रस्त्यांमुळे कितीतरी गरोदर बायका दवाखान्यात नेताना त्यांच्या नॉर्मल डिलिव्हरी झाल्या आहेत. त्यामुळं निदान दवाखान्याकडं जाणारे रस्ते कच्चेच असावेत, असा नियम करण्याचा माझा विचार आहे, जो मी कलेक्टर झाल्यावर अमलात आणेलच. उद्या माझा क्लासचा पहिला दिवस आहे. कुणाला कलेक्टर व्हायला पाच वर्षे लागतात.

कुणाला दहा वषे लागतात. पण, मी दोन-तीन महिन्यांत कलेक्टर होऊन परत येईल, याची मला खात्री आहे. कारण कलेक्टर होणं जास्त अवघड नाही. निदान या पिंटुशेठला तरी नाहीच नाही. तुमचा फक्त आशीर्वाद पाठीशी असू द्या आणि कलेक्टर होऊन येईल त्या वेळी वेशीपासून चंक्या वाण्याच्या दुकानासमोरच्या या चौकापर्यंत माझी मिरवणूक काढा, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे.’ एवढं बोलून पिंटुशेठ खुर्चीवर बसले आणि मी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घोळक्याकडं बघितलं. पिंटुशेठच्या हातून मिळालेली गुलाबाची फुलं पोरांनी शेणामध्ये रोवली होती. त्यांनी पद्धतशीरपणे पिंटुशेठला त्याची लायकी दाखवून दिली होती...

‘आमच्या रानातल्या उसात मधोमध गांजा पिकत असला म्हणून माझे वडील गुन्हेगार ठरत नाहीत. कारण गांजा ही या गावाची गरज आहे. चाळीस किलोमीटर अंतरावर जाऊन गावकरी गांजा विकत आणत असतील, तर त्यांची सोय व्हावी म्हणून वडिलांनी गावात गांजा पिकवला म्हणून हा गुन्हा कसा होऊ शकतो? उलट ही समाजसेवा आह..’ पिंटुशेठ असं म्हणाले आणि ते ऐकून मी धन्य झालो!

बातम्या आणखी आहेत...