आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. वेदप्रताप हे वैदिक हिंदीचे आदरणीय पत्रकार, संपादक, लेखक तर होतेच, पण एक व्यक्ती म्हणूनही ते अतिशय प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत होते. विचारांवरील मतभिन्नता त्यांनी मनावर घेतली नाही. ते आर्य समाज कुटुंबातील होते. दिल्लीतील विद्यार्थिदशेत जेएनयूमध्ये मी माझा शोधनिबंध हिंदीतच लिहीन, यासाठी त्यांनी लढा दिला. त्यांनी हिंदीसाठी मोठी चळवळ सुरू केली आणि त्यांचे म्हणणे पटवून दिले. पण, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांवर त्यांचा आक्षेप नव्हता. त्यांची जीवनशैली साधेपणाची. पुरोगामी, समाजवादी विचारसरणीच्या लोकांशी त्यांचे संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे होते. त्यांच्यामध्ये कोणाबद्दलही वैयक्तिक दुर्भावना किंवा द्वेष नव्हता. त्यांनी पंतप्रधान देवेगौडा यांना हिंदी शिकवली होती. नरसिंह रावांपासून अटलजींपर्यंत सर्वांशी त्यांची मैत्री होती. ते पीटीआयचे संस्थापक-संपादक मानले जातात आणि त्यांनी त्या वृत्तसंस्थेच्या हिंदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले. राजेंद्र माथूर नवभारत टाइम्सचे मुख्य संपादक असताना वैदिकजींना त्यात संपादक-विचार हे पद देण्यात आले होते. या पदामुळेच त्यांना पीटीआय-भाषामध्ये काम करण्याची संधी मिळाली. भारतात पूर्वीही वृत्तसंस्था होत्या, हिंदुस्थान समाचार, इंग्रजीत पीटीआय-यूएनआय वगैरे होत्या, पण त्यांनी पीटीआय-भाषामध्ये हिंदी समृद्ध करण्याचे मोठे काम केले. ते समाजवादी नेते राज नारायण, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस यांच्या जवळचे होते. दुसरीकडे चरणसिंह, राजीव गांधी आणि नंतर सोनिया गांधींशीही त्यांचा संवाद होता. सुषमा स्वराज त्यांना अग्रज म्हणत असत. मधुर नातेसंबंध आणि त्याच वेळी आपले म्हणणे निर्भयपणे मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. वयाच्या ७८ व्या वर्षापर्यंत ते सक्रिय राहिले आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्तंभलेखन करत राहिले. त्यांना भारताच्या हितरक्षणाबद्दल काळजी होती. राजेंद्र माथूर यांच्यानंतर हिंदीत त्यांच्याइतकी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर पकड असलेला दुसरा पत्रकार झाला नाही. भारताचे परराष्ट्र मंत्रालयही वेळोवेळी त्यांचा सल्ला घेत असे. त्यांच्या विचारांचा भारतीय राजकारणावर अप्रत्यक्ष प्रभाव होता.
त्यांना अमेरिका, ब्रिटन, मॉरिशस इ. ठिकाणी भाषणे देण्यासाठी बोलावले जात होते. ते सर्व हिंदी संमेलनांना हजेरी लावत असत. पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळच्या प्रमुख नेत्यांशीही त्यांची वैयक्तिक मैत्री होती. त्यांची हाफिज सईदशी भेटही वादाचा विषय झाली होती, मात्र त्यांनी आपली बाजू मांडत आम्ही पत्रकार आहोत, आम्ही कोणालाही भेटू शकतो, असे सांगितले. ते उघडपणे टीका करायचे, पण कोणाबद्दलही कटुता ठेवत नसत. ते अथक प्रवास करायचे आणि कोणत्याही व्याख्यानाचे आमंत्रण स्वीकारायला सदैव तयार असायचे. धार्मिक कार्यक्रमांनाही संबोधित करत असत. एडिटर्स गिल्डच्या बैठकीत ते जोरदारपणे बोलत असत. ‘धर्मयुग’सारखे मासिक चालवण्याचा त्यांनी विडा उचलला होता. त्यांचे जीवन अतिशय लढाऊ होते आणि ते कधीही आव्हान स्वीकारण्यास मागे हटले नाही. हे खूप प्रेरणादायी आहे. १००-१५० हिंदी वृत्तपत्रांसाठी स्तंभ लिहिणे हे त्यांनाच शक्य होते. नियमित लेखनापासून ते कधीच मागे हटले नाहीत. त्यांनी स्वत:साठी कधीही पंचतारांकित सुविधांची मागणी केली नाही. माझा त्यांच्याशी पन्नास वर्षांचा परिचय होता. व्यक्तिशः ते अतिशय प्रामाणिक होते आणि सर्वांशी कुटुंबीय असल्यासारखे प्रेमाने बोलत असत. त्यामुळे त्यांच्या विचारांशी मतभेद असले
तरी कटुतेची परिस्थिती निर्माण झाली नाही. कुणालाही वैयक्तिक मदत करायला ते सदैव तत्पर असायचे. वैदिकजींच्या निधनाने भारतीय पत्रकारिता, साहित्य आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
आलोक मेहता लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.