आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘न्यू इयर’ची गोष्ट:पुढच्या वर्षी  लवकर या..!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिमंतिनीला आज पहाटे चारलाच जाग आली. रात्री अकराला ती झोपली होती. अकरा ते बारा अणि बारा ते चार अशी पाचच तास झोप झाली. किमान सात तास झोप दिवसाकाठी झाली पाहिजे म्हणून भराभर मोठे मोठे टाके घेवून (काळाचे.. यु नो..) तिने झोप सांधण्याचा जीव तोडून प्रयत्न केला, पण पाच वाजायला आले तरी झोपच लागेना. आपण डोळे जरा जास्तच घट्ट मिटलेत, असं म्हणून तिने जरा डोळे सैल सोडले. पण मग ते उघडायलाच लागले. आज ३० डिसेंबर म्हणून जरा जास्त झोपून तिला उद्या जास्त जागायचं होतं. पण आपल्या आयुष्यात प्लॕॅनप्रमाणे काय घडलंय.. ते आता घडणार? करेक्ट पाच वाजले होते. पहाटेचा मंद वारा वाहात होता. एक पक्षी मंजुळ आवाजात गाणं म्हणत होता. जुन्या मराठी सिनेमात दाखवतात तसं वातावरण होतं. वाह मस्त..! सिमंतिनीला वाटलं, आपण पण आंघोळ करुन काळी बारीक चौकडीची साडी नेसून तुळशीची पूजा करावी का? या वातावरणाला फार फार शोभून दिसेल. नको.. नवीन वर्षात करू.. दर सोमवारी अशी पूजा करायचीच. किंवा मग महिन्यातून एकदा तरी. दर एक तारखेला. अगदी रविवार असला तरी. मुख्य म्हणजे नवरा उठायला पाहिजे. फोटो नाही काढला तर काय उपयोग? तसा सेल्फी काढता येईल म्हणा.. पण मग चेहऱ्यावर ते सुंदर, पवित्र, सात्विक भाव येणार नाहीत. तुळशीला पाणी घालताना नकळत किती सात्विक आणि सोज्वळ होतो आपला चेहरा... नवऱ्याचं आपल्याकडं धड कधी लक्षच नसतं. आपल्याकडंच लक्ष नसतं तर चेहऱ्यावरच्या भावांकडं काय असणार? भाव चेहऱ्यावरुन बदाबदा ओतत असले तरी नवऱ्याला त्याचा काय पत्ताच नसतो. फक्त स्वत:च्या भावाकडं लक्ष! एकदा आपण रडत होतो तरी नवऱ्याला तासभर कळलं नाही. नाक - डोळे लाल लाल झाले. शेवटी कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर तणतणत डोळे पुसत उठले. तेव्हा नवरा आश्चर्याने म्हणाला, “अशी अचानक कशी काय सर्दी झाली तुला? व्हिक्स टाकून वाफ घे दणदणीत. झटक्यात बरं वाटंल!’ याला तुम्ही निरागस वगैरे म्हण्ू शकाल. मी तर याला... जावू दे. मग सिमंतिनीने दात घासून छानसा मनासारखा चहा घेतला. एकदा चहा मनासारखा झाला की पुढचा अखंड दिवस मनासारखा जातो, असा तिचा ठोकताळा आहे. त्यामुळंच मनासारखं पीठ भिजवलं गेलं. मनासारखी कोबीची भाजी चिरली गेली. मनासारखा स्वयंपाक झाला. जेवणं झाली. दुपारची झोप संध्याकाळपर्यंत रेंगाळली. बॕॅक ऑफ द माईंड एकच प्रश्न होता. उद्या सेलिब्रेशन कसं करायचं? गेल्या वर्षी आपण काय केलं होतं बरं..! कुठे बाहेर गेलो होतो का? की घरीच पाणीपुरी, भेळ की चायनीज पिठलं केलं होतं? काय केलं होतं गेल्या वर्षी? सिमुचं डोकं भणभणल्यासारखं झालं. गेल्या वर्षीचं आठवत नाही. यंदा आपण वर्षोनुवर्ष लक्षात राहील, असं सेलिब्रेशन करायचं! ठरलं तर मग..! बाहेर जेवणं हे अगदीच काॕॅमन झालंय. शिवाय, दोन्ही मुलं लहान असली, तरी त्यांचे बेत मोठे होते. दोघांनाही घरी जेवायचं नव्हतं. ‘आई, आम्ही उद्या संध्याकाळी पिझ्झा, बर्गर आणि आईस्क्रीम खाणार आहोत. सगळं नेहाच्या घरी..' मृण्मयी म्हणाली. ‘अरे, मग आपल्या इथं करा ना पार्टी.. मी छान डेकोरेशन करुन देते.' ‘नको.. तिची आई डान्स करते आमच्या बरोबर.. आणि खूप हसते. तू सारखी ओरडत असतेस आमच्यावर..' मृण्मयी म्हणाली. ‘आणि आता आमचं ठरलंय सगळं!' ‘अरे मग इथे कोण आहे उद्या..?' ‘मी दहापर्यंत आहे उद्या आई. आम्ही दहा ते तीनपर्यंत फिरणार आहोत', चिन्मय म्हणाला. ‘त्यापेक्षा सातला जा आणि दहापर्यंत ये परत.' ‘मी काय आता लहान बाळ आहे का? सात वाजता जायला? आणि दहाला येवून काय टीव्ही बघत बसायचा? विनोदी कार्यक्रम बघून एन्जॉय करायचा थर्टी फर्स्ट?' ‘अरे, मी आणि बाबा आहोत ना? आपण तिघं मस्त काहीतरी करु या.' ‘मस्त म्हणजे काय ?' ‘मस्तपैकी वडा-सांबार, ढोकळा , केक पण करणार आहे मी..' 'बापरे, केक करणार आहेस? गेल्या वर्षी असा कडक झाला होता ना केक... खाताच येईना... आणि फोडताही येईना.' ‘अरे, मला प्रॅॕक्टिस नाहीये केक करण्याची. यंदा बघ कसा एकदम स्पाँजी करते ती..' “बरं ठेवून दे. मी उद्या खाईन.' “तुझा बाबा आणि मी खाऊन उरला तरच..' तेवढ्यात नवरा बोलला.. “अगं, मी पण उद्या नाहीये बहुतेक. पक्या ठरवतोय काहीतरी बेत. म्हणजे फिक्स नाहीय, पण माझं जेवण धरू नकोस. सकाळी दहाला बाहेर पडू ते रात्री तीन वाजतील बहुतेक.' “बहुतेक कशाला? सगळं फिक्स दिसतंय.' “समजा एक टक्का फिस्कटलं तर तू आणखी तमाशा करायला नको.' ‘वा.. म्हणजे तमाशा बघायला जाणार तुम्ही.. आणि माझ्या तमाशाची भीती.. वा.. हे बरं आहे!' ‘म्हणजे थोडक्यात फक्त मी बारा वाजता घरात एकटी असणार आहे.' ‘तू पण जा ना मैत्रिणींबरोबर ..’ ‘आता सांगताय.. तुमचं सगळ्यांचं फिक्स झाल्यावर? माझ्या मैत्रिणी मला विचारत होत्या.. काय करुया म्हणून? मीच म्हटलं, आम्ही सगळी घरी एन्जॉय करणार म्हणून आणि तुम्ही सर्व असे वागताय? सगळ्या खुसुखुसु हसत होत्या.. मी असं म्हटल्यावर!’ ‘आता त्या हसल्या तर मी काय करू?’ नवरा गरीब चेहरा तयार करत म्हणाला. ‘हे बघा.. मला.. मी..’ सिमंतिनीचा आवाज नकळत रडवेला झाला. ‘मग तुला मी एक आयडिया देतो.. तुम्ही उद्या फिरा सगळ्या जणी. आम्ही आज फिरतो.. आणि खरं म्हणजे आपलं नवीन वर्ष पाडव्यालाच असतं गं! त्याचा आपण मस्तपैकी प्लॕॅन करुया. म्हणजे तू नऊवारी नेस. मी तुला नऊवारी पैठणी घेतो. मी पण धोतर नेसतो. हवं तर तू मला धोतर घेवून दे. आणि एक छानसा सदरा घे.. घराला आपण सगळीकडं मस्तपैकी फुलांच्या माळा वगैरे लावूया. आणि हे बघ, जेवण बनवण्यासाठी आचारी ठेवू. बिल्डिंगमधे सगळ्यांना देवू जेवण..’ ‘अरे, पण एवढं ठरवलं कधी?’ ‘तुझा चेहरा बघून सुचलं मला हे सगळं.. ताजं ताजं..! तुझ्या डोळ्यांत पाणी नाही बघवत. का मी कॅन्सल करू सगळं? मित्रांना ठोकून देतो, तब्येत बरी नाही म्हणून! छातीत कळा येताहेत म्हणून सांगतो.’ ‘नको नको, जा तुम्ही..’ ‘बघ हां.. तू सांगतेयस म्हणून जातो.’ ‘जा.. जा.. जा.. आणि पुढच्या वर्षी लवकर या..’ नवरा मजेत एक डोळा बारीक करुन निघून गेला. सिमंतिनीने त्याच्याच दोन मित्रांच्या बायकांना दोन्ही डोळे बारीक करत फोन लावला.. ‘या माझ्या घरी तुम्ही.. सगळं बाहेरुन मागवून मस्त पार्टी करुया.’

डॉ. सई लळीत संपर्क : 9422414800

बातम्या आणखी आहेत...