आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर अलीकडं सिमेंट काँक्रिटची बनली आहेत. त्यासोबतच खेड्यातही वाडे आणि सपराची जागा स्लॅबच्या घराने घेतली आहे. जुन्या वाड्यांचे फोटोग्राफ मिळतात का, हे पाहण्यासाठी मी खेड्या-पाड्यात फिरत होते. ऐन दुपारची वेळ होती. रस्त्यावर फारसं कोणी दिसत नव्हतं. बहुतेक लोक शेतावर गेले असावेत. असाच एक वाडा मला दिसला. काळ्या दगडाला चौकोनी आकार देऊन एकसारखी मांडणी केलेला. लाल रंगाच्या, सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी दरवाजाकडे माझं लक्ष गेलं. मला आत जाण्याची इच्छा असूनही जाता येत नव्हतं. त्याला कारणही तसंच होतं. दरवाजाच्या आत बसलेला इमानी कुत्रा. मी आत जराही डोकावण्याचा प्रयत्न केला, तरी तो गुरगुरायचा. मला त्याची भीती वाटली, म्हणून मी लांबूनच फोटो क्लिक केला. मग मला जगभरातील अनेक जातींची, वेगवेगळी ठेवण असलेली कुत्री आठवली. कुत्र्यांची हुशारी, प्रामाणिकपणा, त्यांच्याविषयीची मिथक आणि रंजक गोष्टी तसेच पोलिस दलाचा सहायक असणं, एवढंच नाही तर त्याच पिसाळणंदेखील आठवलं. परंतु, मला भावलेला, मी लहान असतानाचा हा एक प्रसंग.. माझे वडील मित्राबरोबर गप्पा मारत उभे होते. त्यांचं बोलणं मी ऐकत होते. तेव्हा त्यांना वडिलांनी विचारलं, “तुम्ही भटके.. ना घर ना दार, ना कसला जगण्याचा आधार. मग तुम्ही मुलींच्या सोयरिकी कशाच्या आधारावर जमवता?’ त्यावर त्यांच्या मित्रानं दिलेलं उत्तर मला फार भावलं. ते म्हणाले, ‘पूर्वी आम्ही मुलींची लग्न जमवताना व्याह्याकडे किती कुत्री आहेत, हे पाहूनच मुली द्यायचो’. त्यावर वडिलांनी आश्चर्याने विचारलं, “असं का?’ तर ते म्हणाले, “जो माणूस एवढ्या कुत्र्यांना प्रेमानं सांभाळतो, त्या घरात माझी मुलगी निश्चितच उपाशी राहणार नाही.’ हे उत्तर ऐकल्यावर मला काही सुचेनासं झालं. गरीब जास्त श्रीमंत की श्रीमंत जास्त गरीब? असा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. आपल्या लाडक्या कुत्र्याला प्रेमानं कुरवाळत गाणं म्हणणाऱ्या दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातील गाण्याच्या ओळी मला आठवल्या... माझं माझं म्हणीत होतो, मलाच त्यांनी सोडलं। जन्मोजन्मीचं गड्या, तुझ्याशी नातं जोडलं॥ चल रं वाघ्या रडू नको, पाया कुणाच्या पडू नको। दुनिया सारी जरी उलटली, मला कधी रं सोडू नको॥
{ संपर्क : ७३८५३७८८५६
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.