आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Congress Has Consistently Lost To BJP On These Three Fronts | Rajdeep Sardesai

दृष्टिकोन:या तीन आघाड्यांवर काँग्रेसचा सातत्याने भाजपकडून पराभव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दशकात काँग्रेस आणि भाजपच्या नशिबातील फरकाचा सर्वात आश्चर्यकारक आकडेवारी ही आहे : २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ७.८४ कोटी मते मिळाली, ती २०१९ मध्ये जवळपास तिप्पट होऊन २२.९ कोटी झाली. त्याच वेळी काँग्रेसला २००९ मध्ये ११.९ कोटी मते मिळाली होती, ती २०१९ मध्ये ११.९४ कोटी मतांनी तेवढीच राहिली. याचा अर्थ असा की, भाजपची वाढ झपाट्याने झाली, तर काँग्रेसला नवीन आणि काठावरील मतदारांना आकर्षित करण्यात अपयश आले. वर्ष २००९ आठवा, तेव्हा काँग्रेसने राष्ट्रीय निवडणुकीत भाजपचा शेवटचा पराभव केला होता. तेव्हा काँग्रेस हा उदयोन्मुख पक्ष होता. त्याने २०६ जागा जिंकल्या होत्या, ही १९८४ मध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरची त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्या तुलनेत भाजपला केवळ ११६ जागा जिंकता आल्या, ही १९९१ नंतरची त्याची सर्वात वाईट कामगिरी होती. पण, यशाबरोबरच आत्मसमाधान मिळते. उद्याचे ठोस काम करण्याची आणखी एक संधी द्यावी, या विचाराने मतदारांनी काँग्रेसला विजयी केले होते. पण, काँग्रेसला वाटले, आपल्या वर्चस्वाचे नवे पर्व सुरू झाले. उलट २००९ च्या निकालांनी भाजपला सावध केले आणि अटल-अडवाणी युग संपल्याचे समजले. २०११-१२ या काळात यूपीए सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले गेले आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला वेग आला होता. काँग्रेसला या आंदोलनाला आव्हान देता आले नाही, तर भाजपने या सरकारविरोधी लाटेचा फायदा घेत नरेंद्र मोदींना तगडा नेता म्हणून पुढे केले.

प्रश्न असा आहे की, भाजप २००९ नंतर पुनरागमन करू शकत असेल आणि त्यानंतर अवघ्या पाच वर्षांनी पहिले संसदीय बहुमत मिळवू शकत असेल, तर काँग्रेस तसे का करू शकत नाही? उत्तर कोणत्याही पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेल्या तीन घटकांमध्ये आहे - भक्कम संदेश, प्रेरणादायी नेतृत्व, मजबूत संघटना. २०१२ ते २०१४ या काळात भाजपने हे तिन्ही घटक मिळवले होते. त्यांनी भ्रष्टाचारमुक्त, स्थिर प्रशासनाचे आश्वासन दिले आणि ‘अच्छे दिन आयेंगे’चा नारा दिला. महागाई, भ्रष्टाचार आणि युती-राजकारणाने त्रस्त झालेल्या मतदारांवर याचा परिणाम झाला. मोदींमध्ये भाजपला मनमोहनसिंग यांच्या अगदी विरुद्ध असलेला एक प्रेरक नेता सापडला. दुसरीकडे संघ परिवाराच्या रूपाने भाजपकडे जनतेशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधू शकेल असे केडर होते.

गेल्या दशकात काँग्रेस या तिन्ही आघाड्यांवर संघर्ष करताना दिसत आहे. भाजपच्या अति-राष्ट्रवादापुढे तिला स्वतःचे कथन उभे करता आले नाही. हिंदू विरुद्ध हिंदुत्व यानेही पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गोंधळात टाकले, कारण २०१८ मध्येच सोनिया गांधींनी कबूल केले होते की, काँग्रेस हा मुस्लिमांना अनुकूल पक्ष असल्याचे लोकांना पटवून देण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. राहुल गांधींची खिल्ली उडवण्यातही भाजपला यश आले. त्याने हुशारीने त्यांची ‘पप्पू’ अशी प्रतिमा निर्माण केली. राहुल सामान्यांशी संवाद प्रस्थापित करू शकले नाहीत आणि त्यांच्या उदासीनतेमुळे काँग्रेसला उलट फटकाच बसला. २०१९ च्या लोकनीती पोस्ट-पोल सर्वेक्षणात आढळून आले की, १८ ते २१ वयोगटातील तरुणांमध्ये मोदी आणि राहुल यांच्यातील लोकप्रियतेतील अंतर सर्वाधिक आहे. राहुल सोशल मीडियाचा वापर करून तरुणांमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. संघटनात्मक पातळीवरही काँग्रेस पुन्हा पुनरुज्जीवित होऊ शकली नाही. सत्तेत राहण्याची तिला इतकी सवय झाली होती की, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज तिला जाणवलीही नाही. सेवा दलासारख्या तळागाळातील संघटना उपेक्षित झाल्या, तर पक्षश्रेष्ठी संस्कृतीने प्रादेशिक नेत्यांच्या सक्षमीकरणात अडथळा आणला.

आज काँग्रेसला केवळ मोदीविरोधापलीकडे जाऊन भारत जोडोचा संदेश काय ते देशाला सांगावे लागेल. सत्तेला ‘विष’ न समजणारा राहुल यांच्यापेक्षा प्रेरणादायी आणि प्रभावी नेता त्यांना शोधावा लागेल. त्याचबरोबर बूथ स्तरापासून सुरुवात करून आपल्या तळागाळातील संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणावा लागेल. भाजपच्या यशात बूथ-लेव्हल मॉडेलचाही मोठा वाटा आहे आणि बूथ कमिट्या व पन्नाप्रमुख हे त्यांच्या निवडणूक यंत्रणेचा अविभाज्य भाग झाले आहेत. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष एवढा दमदार प्रचार करू शकतो, तर काँग्रेस तसे का करू शकत नाही? (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) राजदीप सरदेसाई ज्येष्ठ पत्रकार rajdeepsardesai52@gmail.com

बातम्या आणखी आहेत...