आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Corona | SuperPower Pakistan | Nitin Thorat Special Rasik Article | Divya Marathi | Says Pakistan Will Be A Superpower!

अनलॉक:म्हणे पाकिस्तान होणार महासत्ता!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराचीमधून आलेलं धुळीचं वादळ नैसर्गिक नव्हतं, तर तो पाकिस्तानचा गेम होता.. गेम!’ दत्तू आणि सुखाअप्पाच्या या लॉजिकवर हसावं का रडावं तेच मला कळेना. धुळीतून आलेल्या ड्राय जंतूंपासून ते मधमाशीच्या आकाराच्या ड्रोन कॅमेऱ्यापर्यंतचे शोध मी ऐकत होतो अन् मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेत होतो...

‘२०२४ ला भारतात कुणाचीबी सत्ता येऊ द्या, पण त्या टायमाला पाकिस्तान महासत्ता होणार आणि तो देश जगावर राज्य गाजवणार..’ असं म्हणत दत्तूनी नाइंटीचा चौथा ग्लास रिकामा करून खाली ठेवला आणि खारे शेंगदाणे तोंडात टाकले. सुखाअप्पाही फुल्ल झिंगलेला. तर्र डोळ्यांनी माझ्याकडं पाहत अप्पा म्हणाला, ‘तुला काय वाटतं नित्या, आत्ता जी पुण्या-मुंबईत आलं हुतं, त्ये धुळीचं वादळं नैसर्गिक हुतं व्हय? छ्या.. आरं, त्यो पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय कट होता कट..’ दत्तू आणि सुखाअप्पाचं ते अगाध ज्ञान ऐकताना मलाही एखादा पेग भरावा, असंच वाटू लागलं. न पिता त्यांची ही बौद्धिक संपदा गळी उतरवणं अशक्यच वाटत होतं.

गावाकडच्या नदीकिनारी संध्याकाळच्या वेळेला आमच्या तिघांची मैफल जमलेली. दत्तू आणि सुखाअप्पा म्हणजे आमच्या छोट्याशा गावचा एन्सायक्लोपीडिया. ग्रामपंचायतीच्या इलेक्शनपासून आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंत आणि रामाअण्णाच्या दुकानातल्या तेलाच्या डब्याच्या रेटपासून ‘नासा’नं शोधलेल्या नव्या ग्रहापर्यंत प्रत्येक विषयाचं त्यांचं स्वत:चं असं वेगळं लॉजिक.. आज ते पाकिस्तानच्या महासत्ता होण्यामागची गुपितं माझ्यापुढं उघडं करू लागले आणि मी हसणं कंट्रोल करत गपगुमानं ऐकू लागलो.

‘नित्या, तुला काय वाटलं, ते आखाती देशातून आल्यालं धुळीचं वादळ कराची, राजस्थान, गुजरातमार्गे पुण्या-मुंबईत आलं होतं होय? आरं, ते पाकिस्तानवाल्यांनी पुण्या-मुंबईत पाठवलं होतं. अन् ते नुसतं धुळीचं वादळ नव्हतं, तर त्याच्यात ड्राय जंतूंची भुकटी मिक्स केल्याली होती. आता ती भुकटी पुण्या-मुंबईत सगळीकडं पसरलीया. शेतात पसरलीया. इथून पुढं ती भुकटी आपल्या पोटात जाणार. मग आपल्याला कोरोनासारखा रोग होणार आणि त्याची लस फक्त पाकिस्तानकडंहे.. गुमान आपल्याला पाकिस्तानसमोर हात जोडावा लागणार. पाकिस्तान लय पैशे कमावणार आणि २०२४ ला महासत्ता होणार..’

दत्तूचं वाक्य संपतं ना संपत तोच सुखाअप्पांनी त्याच्या पाठीत बुक्का घातला आणि त्याच्याकडं रागानं पाहत म्हणाले, ‘नित्या, ऐकतोय म्हणून कायबी सांगतो का? त्या धुळीच्या वादळात भुकटी भिकटी काय नव्हती नित्या, पाकिस्ताननी मधमाशांच्या आकाराचे ड्रोन कॅमेरे बनवल्यात. ते ड्रोन त्यांना भारतात पाठवायचं हुते. म्हणून कराचीतल्या सगळ्या पवनचक्क्यांची तोंडं भारताच्या दिशेनं फिरावली. जसं बटण टाकलं तशी धूळ उडाली अन् पाकिस्ताननी त्या धुळीत आपले ड्रोन सोडले. ते सगळे ड्रोन भारतात आल्यात. त्याच्यात बारकाले कॅमेरेत अन् ते सगळे कॅमेरे आपल्यावर लक्ष ठेवूनहैत..’ असलं अचाट लॉजिक ऐकताना माझं डोकं जड झालं होतं. मी म्हणालो, ‘पण मग ते ड्रोन कुठं आहेत आता?’

तसे सुखाअप्पा हसत म्हणाले, ‘आपल्या सगळ्या सरकारी इमारतींवर मव्हाळ बसलेलं असतंच की. त्या मव्हाळांच्या माशांमध्ये या ड्रोनच्या माशा बसल्यात. पण, पाकिस्तानला फायदाहे फक्त शेअर मार्केटच्या इमारतीवर बसलेल्या मधमाशांचा. त्या माशा आपल्या शेअर मार्केटचे आकडे पाकिस्तानला दाखवणार. त्याच्यावर पाकिस्तान त्यांचे आकडे लावणार. बरोबर आपलं मार्केट कोसळणार आणि पाकिस्तानचं मार्केट उसळणार. दोन वर्षांत पाकिस्तान महासत्ता होणार बघ..’

मी समोरची बाटली उचलून त्यावरचं नाव वाचलं आणि परत खाली ठेवली. हे दोघं असं कोणत्या ब्रँडचं द्रव्य पितेत, ज्यामुळं त्यांचं डोकं इतकं फास्ट चालतं, हे पाहण्याची उत्सुकता मला आवरली नाही.

तसा दत्तू सुखाआप्पाकडं पाहत म्हणाला, ‘पण, अप्पा मला काय वाटतं. आपणबी असंच एखादं धुळीचं वादळ पाकिस्तानवर सोडलं, तर पाकिस्तान जगाच्या नक्षावरूनच गायब होऊ शकतंय..’

हे ऐकून अप्पा उत्सुकतेने पुढं सरकला अन् म्हणाला, ‘सांग की आयडिया सांग..’ डोळे बारीक करत, प्रचंड विचार करत असल्याच्या अाविर्भावात दत्तू बोलू लागला, ‘अप्पा, आपण काय करायचं, आपणहैना राजस्थानच्या वाळवंटावर स्फोटकांची भुकटी पसरून टाकायची. आपण रानात युरिया कशी टाकतो, सेम तशीच भुकटी टाकायची आणि आपणबी द्यायच्या पवनचक्क्या लावून. मंजी धुराळा उडाला की भुकटीबी जातीय सनाट थेट पाकिस्तानात. त्यांनाबी वाटंल, हे धुळीचं वादळहै. पण, आपण त्या धुळीत स्फोटकांची भुकटी पाठवल्याली असती. बरोबर धूळ साऱ्या पाकिस्तानात पसरली की झाला बेत तयार. पाकिस्तानवाले लय टमाटमा बोलाय लागले की द्यायचा लवंगी फटाकडा टाकून पाकिस्तानात. शून्य मिंटात फड पेटवल्यावानी खाक होतोय सारा देश..’

दोघंही मोठमोठ्यानं हसले. मीही कपाळावर हात मारून हसू लागलो. आडवे तिडवे पडून हसत हसत दोघंही शांत झाले. दोघांनाही दारू भलतीच चढली होती. तसा गदगदलेल्या स्वरात दत्तू बोलू लागला.. ‘च्यायला पण भारत- पाकिस्तानच्या भांडणात आपल्यासारख्या लोकांचा जीव जाईल लका अप्पा. मी काय केलंय, त्या पाकिस्तानचं वाकडं? तरीबी भारतावर सूड उगवायचा म्हणून त्ये मला मारून टाकत्यान. अन् आपल्याला पाकिस्तानचा राग येतो म्हणून आपणबी तिथल्या माणसांना मारून टाकायचा विचार करतो लका..’

सुखाअप्पांनी दत्तूच्या खांद्यावर हात टाकला नि त्याला समजावत म्हणाला, ‘शांत हो दत्तू.. आपण ही आपली आयडिया कुठल्याच गुप्तहेर यंत्रणेला सांगायचीच नाय. उगं आपल्यामुळं दोन देशात युद्ध नको. चल, आपलं आपण घरी जाऊ अन् जेवण करू. तुझ्या वहिनीनी माशे केल्यात आज..’

हे ऐकूनच दत्तूचा चेहरा खुलला. हळुवार उठत त्यानं सुखाअप्पाच्या खांद्यावर हात टाकला नि दोघंही गावाच्या दिशेनं चालू लागले. ‘लका.. वैनीच्या हातचे माशे खायचे म्हंजे सकाळपर्यंत गाढ झोप लागंत असती मला..’ ‘फकस्त झोपेत पाकिस्ताननी बॉम्ब टाकाय नको म्हंजे झालं लका..’ सुखाअप्पाच्या या वाक्यावर दत्तू हसायला लागला आणि दोघंही रमतगमत, डुलतझुलत घराकडं निघाले. समोरचे दोन ग्लास रिकामे होते. मनसोक्त दारू पिऊन त्या दोघांनी मेंदूतल्या लॉजिकची झिंग उतरवली होती. ग्लासातली दारू संपली होती अन् मनातलं वैरही सरलं होतं. पण, माझ्यासारख्या धर्मश्रद्धाळूच्या मनातल्या अदृश्य प्याल्यातलं वैराचं उत्तेजक द्रव्य तसंच होतं.. ‘आत’ काठोकाठ भरुन ‘बाहेर’ही ओसंडत होतं.. वैराचा, विखाराचा हा प्याला कधी रिता होणार याचं उत्तर पूर्ण शुद्धीत असूनही मला सापडत नव्हतं...

विषय कोणताही असो, गावाकडच्या लोकांचं त्याविषयी स्वत:चं एक वेगळं लॉजिक असतं. अतिशयोक्ती, विज्ञान, कल्पनारंजन, अध्यात्म, अंधश्रद्धा अशा सर्व विषयांना वरवंट्याखाली रगडून त्यांनी आपल्या लॉजिकचं खास झणझणीत वाटण तयार केलेलं असतं. त्यामुळं ते चाखताना डोक्याला झिणझिण्या आल्या नाही तरच नवल! अशाच करामती माणसांच्या, त्यांच्या कलागती स्वभावाच्या अन् अफलातून लॉजिकच्या मिश्रणातून घडणाऱ्या, खुसखुशीत आवरणातूनही काही मोलाचं सांगू पाहणाऱ्या या गोष्टी... दर पंधरा दिवसांनी येतील तुमच्या भेटीला...

नितीन थोरात
संपर्क : 8888849567
nitin.thrt@gmail.com

बातम्या आणखी आहेत...