आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक-एक पावलातून मार्ग:12  महिन्यांत 12 नवीन व चांगल्या सवयी अंगी बाणवा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्ष, नवा उत्साह, नवा उद्देश. फक्त सात दिवस झाले, केलेले संकल्प विसरलात? हो, तेच, ज्याला इंग्रजीत न्यू इयर रिझोल्युशन म्हणतात. रोज जिमला जाईन, पौष्टिक आहार घेईन, वेळेवर उठणार, व्हर्जन २.० होणार. घरातील लोकांचे डोळे सांगत होते, ते आपल्याला माहीत होते. आणि आपणही मान्य केले, जे जसे आहे तसेच राहते. पण, जरा विचार करा, ही रिझोल्युशनची कल्पना किती नाट्यमय आहे? एक तारीख बदलल्याने सर्वकाही बदलू शकते का? वर्षानुवर्षे खूप खात राहिल्याने साचलेली चरबी स्वप्नात केलेल्या व्यायामाने कधी कमी होते का? नववर्षाच्या संकल्पाचा मार्ग म्हणजे अयशस्वी होण्याची हमी. पण, हार मानू नका, आणखी एक मार्गही आहे. १२ महिन्यांत १२ नव्या सवयी अंगी बाणवा. पहिल्या महिन्यात एक सवय लावा, त्या पायावर इतर. अगदी लहान वाटणाऱ्या गोष्टीपासून सुरुवात करा. त्याची आपल्याला सवय होईल तेव्हा खूप आनंद होईल. एकेक पाऊल टाकावे, घसरावे, पडावे, पुन्हा उठावे, अशा प्रकारेच मार्ग निश्चित होतो. काही सोप्या कल्पना तुम्हाला सांगत आहे. त्यातील एक घेऊन आपला प्रवास सुरू करा... १. उन्हात थांबा : सकाळी उठून सूर्यदेवाकडे तोंड करा. व्हिटॅमीन डीच्या नैसर्गिक स्रोताशी शरीर जोडा. ५-७ मिनिटे पूर्ण आनंद घ्या, मग रोजचे काम करा. २. झाडाला मिठी मारा : हवेत, पाण्यात, भाज्यांमध्ये, फळांमध्ये सर्वांमध्ये जीव आहे. जिवंत झाडामध्ये तर सर्वाधिक. म्हणून त्याच्याशी मैत्री करा, त्याला मिठी मारा. तुम्हाला बरे वाटेल ३. मिरर वर्क : डोळ्यात डोळे घालून स्वतःला स्वतःशी भेटवा. सुकलेल्या फुलाला पुन्हा बहरवा. स्वतःचे नाव घेऊन म्हणा - कसाही असो, माझे तुझ्यावर प्रेम आहे... ४. अनोळखी व्यक्तीकडे बघून हसणे : अनोळखी व्यक्तीकडे पाहून हसा. शक्य असल्यास बोला. आजकाल जग अशा वृत्तीपासून दूर जाते. पण ही एक कला आहे, ती कामी येते. ५. फळांचे सेवन : बॅगेत फळ घेऊन ऑफिसला जा. भूक लागल्यावर चिवड्याऐवजी ते खा. मिठाई हवी असेल तर खजूर ठेवा, मिठाईपेक्षा ते चांगले. ६. फोन व्रत : रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत फोन वापरू नका. प्रियजनांना सांगा, नो व्हॉट्सअॅप, इमर्जन्सी असेल तरच कॉल करा. मनाचे ओझे कमी होईल, आपण ताजेतवाने जागे होऊ. ७. देण्याचा आनंद : तीनशे रुपयांची एक काॅफी कमी प्या, गरीब मुलाची फी द्या. वीस रुपयांच्या कॉफीलाही चव असते, त्या मुलाचा चेहरा आठवा! ८. महिन्याला एक पुस्तक : एक पुस्तक बरोबर ठेवा. मध्यंतरात काही पाने वाचा. पुस्तक मनासाठी डंबेलचे काम करते, मन आणि मेंदू तंदुरुस्त ठेवते. ९. कृतज्ञता डायरी : झोपण्यापूर्वी वही उघडा. ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणा. ज्याने तुम्हाला आनंद किंवा समाधान दिले आहे, त्याला म्हणा - मी कृतज्ञ आहे... हसत हसत झोपा. १०. कमी खर्च करा : प्रत्येक लग्नासाठी नवीन कपडे खरेदी करू नका, आपल्या बहिणी आणि मैत्रिणींशी अदलाबदल करा. त्यांचेही भले व आपलेही. ११. ताजे खा : दररोज एक भाजी निवडून आणा. पाचही इंद्रियांच्या वापराचा आनंद घ्या. फ्रिजमध्ये पदार्थ खचाचखच भरू नका. ताजे अन्न खा. १२. जादू की झप्पी : व्हाॅट्सअॅपवर इमोजी पाठवता, पण खरी भावना दाखवायला घाबरता. कुटुंबातील एखाद्याला आज, आत्ताच मिठी मारा. खऱ्या स्नेहाचा आनंद घ्या. तर या काही सोप्या कल्पना होत्या, त्या तुम्ही तुमच्या आयुष्यात एक एक करून अमलात आणू शकता. परंतु, आपण आपली स्वतःची यादी तयार केली तर ते अधिक चांगले आहे. हो, या मोहिमेवर एका मित्राला सोबत घ्या, हा माझा सल्ला आहे. थोडी जबाबदारी असेल, थोडी प्रेरक चर्चा होईल. तुम्ही घसरलात तर तो तुम्हाला पकडेल, त्याने तुम्हाला जज करू नये किंवा तुम्हाला हसू नये. एखादे मूल लेगोचे घर बनवते तेव्हा तो दगडांच्या वर एक दगड ठेवतो. सवयीचा ताजमहाल असाच बांधला जातो. जीवन हळूहळू सुधारते. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

रश्मी बन्सल लेखिका आणि वक्त्या mail@rashmibansal.in

बातम्या आणखी आहेत...