आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Curiosity About The Dark Web Can Be Costly Without Adequate Security| Article By Akanksha Deshmukh

यंग इंडिया:पुरेशा सुरक्षिततेविना महागात पडू शकते डार्क वेबबाबतची उत्सुकता

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक ऑक्टोबर २०१३ रोजी २९ वर्षीय रॉस विल्यमला अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथून पोलिसांनी अटक केली होती. संगणक शास्त्रज्ञ रॉस हा जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक बेकायदेशीर ऑनलाइन मार्केटप्लेसचा ऑपरेटर होता. ‘सिल्क रोड’ नावाच्या त्या अनोळखी बाजारपेठेत सर्व काही विकता व खरेदी करता येत असे. फक्त दोन वर्षे, दहा महिन्यांत सिल्क रोडची कमाई सुमारे २१४ दशलक्ष डाॅलर झाली होती. या ऑनलाइन मार्केटमध्ये जगभरातील सरकारांची गुप्त कागदपत्रे, बनावट कागदपत्रे, चोरलेली क्रेडिट कार्डे, बेकायदेशीर शस्त्रे आणि ड्रग्ज, चाइल्ड पोर्न तसेच लोकांना मारण्यासाठी सुपारीही घेतली जात असे.

इंटरनेटमध्ये एक अंडरवर्ल्डसारखे जगही आहे, त्याला डार्क वेब म्हणतात. ते वापरण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर आवश्यक आहे. डार्क वेब ही गुन्हेगारीच्या जगाची किल्ली आहे, ती कोणीही पाहू किंवा ओळखू शकत नाही. रॉसच्या अटकेनंतर सिल्क रोड तर बंद झाले, परंतु त्यानंतर अशा हजारो वेबसाइट तयार झाल्या, ज्या आजही ऑनलाइन अब्जावधींचा अवैध व्यवसाय करत आहेत.

फेब्रुवारी २०२१ मध्ये बंगळुरू पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक केली. त्याने ‘डार्क वेब’द्वारे ड्रग्ज खरेदी करण्यासाठी तीन बिटकॉइन एक्सचेंज आणि १० पोकर साइट हॅक केल्या, त्यांच्याकडून ₹९ कोटी किमतीचे बिटकॉइन जप्त करण्यात आले. २०२१ मध्ये तीन लाखांहून अधिक भारतीयांची आर्थिक गोपनीय माहिती बँक खात्यांच्या माहितीसह केवायसी कागदपत्रांसह, हॅकर्सनी सार्वजनिकपणे डार्क वेबवर टाकली होती. एन्क्रिप्टेड आणि अज्ञात नेटवर्क असल्याने ‘डार्क वेब’ आजही जगभरातील तपास यंत्रणांसाठी एक न सुटलेले कोडे आहे. ‘क्लाऊड एसईके’ नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने म्हटले आहे की, भारताची शिक्षण व्यवस्था सायबर हल्ल्याचा पुढील बळी ठरू शकते.

आश्चर्यकारक बाब म्हणजे बहुतांश घटनांमध्ये ‘डार्क वेब’ होस्ट करणारे टीओआर (टाॅर) सॉफ्टवेअर अमेरिकन नेव्हीने विकसित केले होते. टाॅर वापरकर्त्यांचे ठिकाण आणि ओळख लपवते, परंतु ओपन-सोर्स असल्याने ते केवळ विशिष्ट सुरक्षिततेतच उपयुक्त आहे. या सुरक्षेमुळे पत्रकार, व्हिसलब्लोअर्स, निर्वासित, कार्यकर्ते निनावीपणे माहिती सामायिक किंवा प्राप्त करण्यासाठी याचा वापर करतात. ३५ टक्के डार्क वेब वापरकर्ते हे १८ ते २५ वयोगटातील आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. भारतात डार्क वेबच्या वापराबाबत कोणताही स्पष्ट कायदा नाही. अशी प्रकरणे केवळ आयटी कायद्यानुसार हाताळली जातात. खऱ्या समस्या इथेच निर्माण होतात. तरुणांमध्ये कमी दक्षता आणि ‘डार्क वेब’बद्दल अधिक उत्सुकता यामुळे ते या अज्ञात ऑनलाइन गुन्ह्यांच्या दुनियेत अडकत आहेत. आपल्यावर अनेक वेळा अन्याय होऊनही तो लाज आणि गोपनीयतेच्या आधारे ही गोष्ट लपवून ठेवणेच बरे समजतो, त्याचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत. याचा फायदा गुन्हेगार आणि हॅकर्सना होत आहे. तरुणांनी सावध राहून नव्या जगाची गुपिते जाणून घेण्याच्या कुतूहलाने ‘डार्क वेब’च्या शोधात निघाले पाहिजे, अन्यथा ते पापणी लवते न लवते तोच गुन्हेगारीचे बळी ठरू शकतात. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

आकांक्षा देशमुख तरुण पत्रकार deshmukhakansha4@gmail.com

बातम्या आणखी आहेत...