आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींच्या गावा:सायकल...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या बालपणी स्कुटर, फटफटी क्वचितच एखाद्याकडे असायच्या. चारचाकी तर अतिश्रीमंत लोकांची चैन. पण एक किंवा दोन सायकली मात्र प्रत्येक घरात असायच्याच. हवा भरणं आणि पंक्चर या व्यतिरिक्त कुठलाही मोठा खर्च नसलेली, लावायला ज्याला आजच्या भाषेत पार्किंग म्हणतात त्यासाठीही सुटसुटीत, पेट्रोलचा खर्च नाही उलट चांगला व्यायाम घडवणारी अशी ही सायकल प्रत्येक दारात असायचीच. मला आठवतं तसं माझ्या लहानपणी कधीतरी खिळा लागून ट्यूब टायर पंक्चर झालेल्या सायकलची दुरुस्ती चार-आठ आण्यात होत असे. चाकांमध्ये हवा तर फुकटच भरून द्यायचा सायकलवाला. काहीजण हवा भरायचा पंप खरेदी करुन स्वतःच हवा भरायचे. मला एखाद्याला सायकलमध्ये हवा भरताना पहायला खूप मजा यायची. दोन्ही पायात पंपाचा स्टँड अडकवून हॅंडल हातात धरून खाली वर केले की टायर टरारून यायचा. हवा भरलेली सायकल सरळ रस्त्यावरून धूम पळायची. आडवाटेवरून जाताना मात्र सायकल चालवणाऱ्याचा कस लागायचा. कच्च्या मातीच्या अरूंद वाटेवरून सायकल चालवताना हॅंडल हाताने घट्ट पकडून, डोळे उघडे ठेवून ती चालवावी लागते. जरा तोल सुटला की कपाळमोक्ष ठरलेलाच! सायकलच्या मागे मोठे कॅरिअर असायचे. प्रत्येकजण स्वत:च्या सोयीप्रमाणे, गरजेप्रमाणे त्याचा वापर करायचा. शेतकरी गवताच्या पेंढ्या आणत तर कोणी धान्याची पोती, कोणी मुलांना शाळेतून आणायचे तर कोणी आपल्या कारभारणीला डब्बलसीट बसून गाव फिरवून आणायचा. आठवडी बाजारला जाताना हीच सायकल अख्खं कुटुंब अंगावर घेऊन फिरायची.

काही हौशी मंडळी सायकलच्या चाकाला रंगीत पट्ट्या लावत. चाक फिरताना त्या पट्ट्यादेखील फिरायच्या ते खूप मोहक दिसायचे. रात्री अपरात्री सायकल चालवणारे पुढच्या बाजूस डायनॅमो लावत. मित्र मिळून सायकलवरून जाताना एक कॅरिअरवर तर दुसरा सायकलच्या नळीवर बसत असे. लहान बाळाला सायकलने नेण्यासाठी नळीवर तोल साधुन बांधलेली लोखंडी, छोटी खुर्ची असायची. बाळाला बसायला त्यात दुपट्याचे मऊ आसन घालून अलगद बसवले जाई. ते बाळही सायकलच्या हॅंडलला पकडून ऐटीत बसायचे आणि हरखून जायचे. रस्त्यात कोणी सायकलला धडकू नये म्हणून ट्रिंगट्रिंग करणारी घंटी बसवलेली असे. वात्रट पोरे आडवी आली की घंटी वाजवून रस्ता मोकळा केला जायचा. सायकलच्या नळीवर बसलेला एखादा थोराड मुलगा गंमत म्हणून घंटी सारखीच वाजवू लागला की वडिलांकडून ओरडा मिळत असे.

मलाही लहानपणी सायकल चालवायला खूप आवडायचे. शिकताना नळीखालून पाय टाकून एका पायाने पायडल फिरवायचे. थोड्या दिवसांनी सायकलचा तोल साधता येवू लागला की दुसरा पाय टाकायचे धाडस करू लागले. त्यात अनेकवेळा सायकलसह रस्त्यावर आपटी खावी लागायची. हातापायाला खरचटून जखम व्हायची. त्यातून रक्त आले तरी पर्वा न करता त्यावर रस्त्यावरची माती लावायची आणि नव्या उमेदीने पुन्हा सायकल चालवायची. नळीखालून सायकल चालवायला शिकताच मी सीटवरून सायकल चालवण्याचा प्रयत्न करू लागले, पण दोन्ही पायडलपर्यंत पाय पुरत नसतानाही सीटवर बसले आणि हाय रे नशीब! बाभळीच्या तोडून टाकलेल्या काट्यांच्या पांजरीवरच जावून पडले. सीटवरून सायकल शिकायची घाई नडल्याने काटे सगळ्या अंगात घुसले. ढोपर रक्तबंबाळ झाले आणि सगळ्या अंगाला मुक्का मार बसला. मैत्रिणींनी काट्यांतून उचलून हाताला धरून घरापर्यंत पोहोचवले. पडल्याचे, लागल्याचे दुखत होतेच पण घरात आईकडून मार पडणार हे दु:खात दु:ख होते. डोळ्यांतील पाणी पुसून काहीच घडले नाही अशा आविर्भावात घरात प्रवेश केला, पण सोबत आलेल्या मैत्रिणींनी गौप्यस्फोट केलाच. सायकलची वाकलेली सीट आणि हॅंडल पाहून बाबा काय समजायचे ते समजले. आईने जवळ घेऊन आपल्या पदराने डोळे पुसले. मार मिळण्याऐवजी सहानुभूती मिळाल्याचे पाहून जखमेवर फुंकर मिळाल्याचे समाधान मिळाले. आठ दिवसांनी जखमा भरून येताच बाबांनी मला सीटवरून सायकल शिकवायला सुरूवात केली. आठवडाभरात मी ती चालवण्यात पटाईत झाले. पुढे हिरो होंडा, स्कुटी, चारचाकीही चालवू लागले पण सायकल चालविण्याची मजा अविस्मरणीय! बालपणाच्या अनेक मौजमजामध्ये सायकल चालवायला शिकणे म्हणजे काही वेगळे केल्याप्रमाणे वाटायचे. यामुळे बाहेरची सर्व कामे करण्याची ड्यूटी मलाच करावी लागायची, पण वाऱ्याच्या वेगावर स्वार होत सायकल चालवायची मजा न्यारीच होती..!

भारती सावंत संपर्क : 9653445835

बातम्या आणखी आहेत...