आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाटेरी कुंपणात वर्षानुवर्षे जखडून असलेल्या स्त्रीवर्गाची घुसमट, कोंडी यांना वाट मोकळी करून देणारा ‘दमकोंडी’ हा ज्योती सोनवणे- पवार लिखित कथासंग्रह नुकताच तेजश्री प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झाला. महिलांच्या ज्वलंत प्रश्नांना अधोरेखित करणारा प्रस्तुत कथासंग्रह म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या आणि एकविसाव्या शतकातसुद्धा स्त्रीला दिले जाणारे दुय्यम स्थान यावर कडाडून भाष्य करणारा कथासंग्रह आहे. मराठवाड्यातील गावखेड्याच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कथा घडत असल्या तरी गाव शहराच्या पलीकडे जाऊन स्त्रीच्या भावविश्वावर लेखिका जास्त जोर देताना दिसते. कधी नवरा तर कधी मुलाच्या गुलामगिरीत बरीच वर्षे काढल्यानंतर एके दिवशी स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने एखादी स्त्री पेटून उठली तर त्या स्त्रीला अडवण्याची ताकद आणि हिंमत कोणाच्या बापातही नसते. अशाच स्त्रीचे प्रातिनिधिक रूप तुळसा या कथा नायिकेच्या माध्यमातून वाचकांसमोर येते. मुलीच्या हक्कासाठी व स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी वेळप्रसंगी कणखर बनलेली तुळसा आणि तिने आखलेला डाव याचे सुरेख वर्णन ‘डाव’ या कथेतून लेखिकेने केले आहे. प्रत्येक वेळी आपल्या इच्छा -आकांक्षा तडीस जातात असे नाही, हे ‘निर्धार’ या पुढच्या एका कथेत मांडून लेखिकेने जीवनातील विसंगतीवर बोट ठेवले आहे. आपल्या इच्छा सफल होवोत न् होवोत पण प्रयत्न न करता हार मानू नये, हेच या दोन्ही कथांमधून लेखिकेला सुचवायचे आहे, असे वाटते. प्रस्तुत कथासंग्रह “महिलांच्या न्यायासाठी लढणाऱ्या जगातल्या लाखो हातांना....!’ समर्पित केला असून स्त्रीवादी मराठी साहित्य प्रवाहात लेखिका ज्योती सोनवणे यांनी वेगळी व ठाम भूमिका कथा या साहित्य प्रकारातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. विधवा स्त्रियांच्या दुःख, वेदनांना कवेत घेणाऱ्या ‘कोंडमारा’ आणि ‘रेश्मा’ या कथांचा समावेशक संग्रहात केला असून विधवा बाईकडे पाहण्याचा समाजाचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन तसेच तिच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याच्या वाईट प्रवृत्तींवर लेखिकेने ताशेरे ओढले आहेत. ‘समाज काय म्हणेल?’ हा एक प्रश्न भाग पाडतो त्यांना आयुष्यभर दमकोंडी सहन करण्यास.....!’ या उद्धृत केलेल्या वाक्यात स्त्रियांच्या अख्या समस्येचं, हतबलतेच मूळ दडलेले आहे. हे रेश्मा व सुनीता यांच्या कहाणीतून प्रकर्षाने जाणवते.विधवा स्त्रियांचे प्रश्न मांडताना लेखिकेने त्यांच्या मुलांच्या वाट्याला आलेले भोग याकडेही आवर्जून लक्ष वेधले आहे. न केलेल्या चुकीसाठी व दोष नसतानाही एखाद्या गोष्टीसाठी सर्वस्वी स्त्रीला जबाबदार धरणारी मानसिकता समाजात रुळलेली आहे. ही मानसिकता बदलण्याची ताकद ज्योती सोनवणे या लेखिकेच्या लेखणीत नक्कीच आहे. हे ‘न केलेली चूक’ आणि ‘मोकळा श्वास’ या दोन कथा वाचताना मनोमन पटते. एखादी एकटी स्त्री स्वावलंबी जगण्यासाठी धडपडत असेल तर इतर बायाच कशा तिच्यावर संशय घेत, आपापसात कुजबुजतात आणि सविताताईंसारखी एखादी स्त्री त्या सर्वांच्या दृष्टिकोनात कसा बदल घडवून आणते व तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते याचे चित्रण ‘खरी ओळख’ या कथेत केले आहे. अशाच सकारात्मक बदलाची आज समाजाला गरज आहे. ही कथा आवर्जून वाचावी ती यासाठीच! ज्येष्ठ लेखिका ललिता गादगे यांनी प्रस्तावनेतून प्रस्तुत कथांचे मार्मिक विवेचन केले असून त्यांच्या मते, ‘दमकोंडी सहन करत जीवनाच्या अवकाशातील काळेकुट्ट ढग बाजूला सारून क्षितिजावर चंद्रकोरीचा प्रकाश कोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांच्या या कथा म्हणूनच वेगळ्या ठरतात आणि वाचकालाही एकाच वेळी अस्वस्थ व विचारप्रवण करतात....! या ओळीतून या कथांचे वेगळेपण दृष्टीत पडल्याशिवाय राहत नाही.
{ पुस्तकाचे नाव - दमकोंडी { लेखक - ज्योती सोनवणे { प्रकाशन - तेजश्री प्रकाशन { पृष्ठसंख्या -143 { मूल्य - 250 रुपये
रागिणी जगदाळे संपर्क : 9405263739
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.