आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्‌दा:इंटरनेटवर ध्रुवीकरणाचा धोकादायक खेळ

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया हा या शतकातील सर्वात रोमांचक शोध आहे. यापूर्वी ज्याचे अस्तित्व नव्हते अशा वर्गाला त्याने समोर आणले आहे. तो म्हणजे इन्फ्लुएन्सर. तथापि, प्रचंड फॉलोअर्स असलेला यूट्यूबर किंवा इन्स्टाग्रामर बनणे सोपे नाही. कोणतेही क्षेत्र असो – फॅशन, मेकअप, प्रवास किंवा तंत्रज्ञान – उत्कृष्ट कंटेंट तयार करण्यासाठी अनेक वर्षांची कठोर मेहनत असते. परंतु, रिच, फाॅलोअर्स व एंगेजमेंट असे इन्फ्लुएन्सरचे यश मोजणारे घटक वाढवण्याचे काही शॉर्टकटही आहेत. व्हर्च्यु सिग्नलिंग ही अशीच एक गोष्ट आहे. जगात कुठे काय वाईट घडले ते शोधून नंतर त्याबद्दल पोस्ट करा, भले त्याच्याशी आपला काही संबंध नसेल. रशियाने युक्रेनवर हल्ला केला? युक्रेनचा ध्वज लावा. एकता, शांतता आणि प्रेम यावर काही ओळी लिहा. ब्लॅक लाइव्ह मॅटर्स ट्रेंडिंगमध्ये आहे? त्यावर पोस्ट टाका. खरे तर अशा प्रकारच्या व्हर्च्यु सिग्नलिंगमुळे कोणाचेही नुकसान होत नाही, ते बनावट असते आणि त्याची आपल्याला चिडच असते.

परंतु, सोशल मीडिया एंगेजमेंट वाढवण्यासाठी आणखी काही प्रभावी शॉर्टकट साधने आहेत. उदा. पोलरायझर होणे! हे कोणताही संवेदनशील मुद्दा उचलून त्यावर ध्रुवीकरण करणाऱ्या गोष्टी पोस्ट करणारे लोक आहेत. काही दुखावले जातील आणि काहींना बरे वाटेल हे त्यांना चांगलेच माहीत असते. म्हणजेच या पोस्टचे भावनिक आवाहन व्यापक असेल आणि यामुळे तुमची व्यग्रता वाढेल. समाजासाठी अशा गोष्टी चांगल्या असोत की वाईट असो, सोशल मीडिया कंपन्यांना हेच हवे असते. ध्रुवीकरण अनेक स्तरांवर होते. एकीकडे क्यूट बेबी प्रकारचे विषय असतात. उदा. क्रिप्टो चांगले की वाईट? अँड्राॅइड की आयओएस? दशेरी की हापूस? हे बेबी पोलरायझर्स मजेदार असतात, पण काही बिग गोरिला प्रकारचे विषयदेखील असतात, उदा. धर्म आणि राजकारण. या दोन विषयांचे पोलरायझर होणे हा दुबळ्या मनाच्या लोकांचा खेळ नाही. यामध्ये नैतिकतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात. राग, द्वेष, अपमानाच्या भावना उफाळून येतात. शक्तिशाली पोलरायझर धर्म आणि राजकारण यांचे मिश्रण करतात. एखादे प्रक्षोभक विधान करायचे आणि आपला सोशल मीडिया हाॅट करायचा. एंगेजमेंटचे आकडे गगनाला भिडतील आणि आपण इंटरनेटचे राजा असल्याचे आपल्याला वाटेल. अशा ध्रुवीकरणातून तुम्हाला सोशल मीडियावर मिळणारे स्टारडम खूप इंटेन्स असू शकते. काही ठळक विधाने तुमचा ट्रेंड बनवू शकतात. याची तुलना टेक इक्विपमेंटमधून अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवणे, मेकअप ट्युटोरियल चालवणे किंवा यूट्यूबवर स्वयंपाकाच्या पाककृती शिकवण्याशी करा, त्यात मेहनतही आहे आणि वेळही लागतो. कंटाळवाणे आहे ना?

फरक एवढाच आहे की, पोलरायझर लोक आगीशी खेळतात. आपण सीमा केव्हा ओलांडली हे त्यांना कळतही नाही. भाजपच्या माजी प्रवक्त्याच्या बाबतीत असेच घडले, त्यांनी फक्त एका टीव्ही चर्चेत भाग घेतला होता आणि आपल्या एका विधानाने जग हादरून जाईल याची त्यांना जाणीवही नव्हती. पण त्या एकट्या नाहीत, ट्विटर अशा गोष्टींनी भरलेले आहे. त्यांच्यापैकी अनेकांकडे ब्लूटिक्स आणि चांगल्या शैक्षणिक पदव्याही आहेत. ते हुशार आहेत. त्यांना जगातील घडामोडींची जाणीव असते आणि ते स्वतःला दाखवतात तितके भावुक नसतात. दिवसभर राइज करायचे असेल तर ते ‘पोलराइज करा’ हा खेळ खेळत राहतात. या खेळातून ते हिंदू-मुस्लिम समस्येवर बोलतात आणि समाजाचे वातावरण व देशाची प्रतिमा खराब करतात. ते त्यांच्या कथनाला साजेशा बातम्या शोधतात. मग ते त्यात आणखी मीठ-मसाला घालून पोस्ट करतात. १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात दर आठवड्याला कुठे ना कुठे कुठली ना कुठली घटना घडणार हे निश्चित. पोलरायझर्स त्यांच्या शोधातच असतात. टीव्ही चॅनेल्सही या खेळात सहभागी होतात. त्यांचाही उद्देश तोच असतो - पोहोच वाढवणे. हेच आजचे जग आहे. यामध्ये पोलरायझर्सचा बोलबाला आहे आणि शहाण्यांकडे दुर्लक्ष केले जाते.

परंतु, पोलरायझर्स कधी कधी खूप पुढे जातात, हे अलीकडील घटना दर्शवतात. नूपुर शर्मा केवळ सोशल मीडिया स्टार नव्हत्या, तर त्या टीव्ही पॅनेलच्या सदस्य आणि सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याही होत्या. सोशल मीडियावर ध्रुवीकरण चालून जाते, कारण तिथे तुमची जबाबदारी कमी असते, पण सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही मर्यादा ओलांडता तेव्हा मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांच्या वक्तव्यानंतर इस्लामिक देशांनी ज्या पद्धतीने भारताचा निषेध केला, ते लज्जास्पद होते. यातील अनेक आमचे मित्र आहेत आणि त्यांनी लाखो भारतीयांना रोजगार दिला आहे. आपण इतर देशांना दुखवू शकत नाही. आपल्याला त्यांचे सहकार्य आणि गुंतवणूक हवी आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी तातडीने कारवाई करत प्रवक्त्याला निलंबित केले. दुखावलेल्या देशांनीही या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण, दुसऱ्या बाजूचे अनेक एक्स्ट्रीम पोलरायझर्स हे प्रकरण जिवंत ठेवत आहेत. हिंसक धमक्या दिल्या जात आहेत, निदर्शने केली जात आहेत आणि देशाची शांतता भंग केली जात आहे. अशा परिस्थितीत कायद्याचे राज्य असलेला स्वतंत्र देश म्हणून भारताने प्रवक्त्यांच्या रक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. यातून आपण सर्वांनीही बोध घेतला पाहिजे. कारण इन्फ्लुएन्सर असणे आणि समाजावर गुड इन्फ्लुएन्स असणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...