आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथार्थ:"पटेली’ : महानगरीय जीवन-जाणिवांचा सांस्कृतिक शोधपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अविनाश उषा वसंत यांची ‘पटेली’ ही पहिलीच कादंबरी सध्या साहित्यवतुर्ळात चांगलीच गाजतेय. महानगरीय जीवनजाणिवांचा शोधपट मांडणाऱ्या ‘पटेली’चे वेगळेपण असे की, एेंशीच्या दशकातील गिरीणीकामगार, चाळ ते आयटी पार्क पर्यंतचा प्रवास उलगडतो. औद्योगिक मुंबई ते फायनान्स आणि सेवा क्षेत्र ह्या प्रवासात झालेले बदल हे सर्व या वाटचालीत सामावले जाते.

अविनाश उषा वसंत यांची ‘पटेली’ ही पहिलीच कादंबरी आहे. ‘पटेली’मध्ये पहिलेपणाच्या काही खुणा दिसत असल्या तरी ज्या प्रगल्भतेने महानगरीय जीवनजाणिवांचा शोधपट मांडला, तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. रूढार्थाने पारंपरिक मराठी कादंबरीसारखीच ही कादंबरी तरूण नायकाच्या भावविश्वाचे दिग्दर्शन करते. वर्तमान महानगराशी आणि भूतकाळ गावखेड्याशी जोडलेल्या तरूणाचे अनुभवविश्व या कादंबरीत केंद्रस्थानी आहे. वाङ्मयीन जगाविषयी काहीएक समज असणारा समुद्र हा या कादंबरीचा नायक आहे. ऊर्जा, गझल आणि हेमा ही महत्त्वाची पात्र आहेत. यामध्ये तरुणांमधील प्रेमाचे तसेच आयटीचे व्यवहारी जग येते. तरुणांच्या बदललेल्या स्वप्नांना मर्यादित ठेवणाऱ्या महानगरीय चाळीचा शंभर फुटी अवकाशातील वास्तव येते. हे सर्व कादंबरीगत अवकाशात सामावत असताना ‘समुद्र’ या तरुणाची प्रौढ प्रगल्भ समज आणि त्याने दाखवलेले समाजवास्तवाचे चिंतन, भाष्य, साहित्यव्यवहारावरील प्रतिक्रिया यामुळे ही कादंबरी फक्त तरुणांच्या अनुभवापुरती मर्यादित राहत नाही. तर सर्व समकालीन समाज-संस्कृतिपटाशी जोडली जाते.
कादंबरीगत जीवनानुभवाचा भाग म्हणून मुंबईच्या अनेकमिती यामध्ये साकार होतात. याचे कारण दरचौरस फुटाला मुंबई वेगळी दिसते, याचे नेमके भान लेखकाला आहे. एकाचएक कोनातून मुंबई न पाहता तिचे अनेक आयाम कादंबरीगत जीवनाशयाचा भाग म्हणून येतात. मराठी साहित्यामध्ये अनेकांनी अनेकपद्धतीने मुंबईचे दर्शन घडवले आहे. त्यातही ‘पटेली’चे वेगळेपण असे की, एेंशीच्या दशकातील गिरीणीकामगार, चाळ ते आयटी पार्क पर्यंतचा प्रवास उलगडतो. औद्योगिक मुंबई ते फायनान्स आणि सेवा क्षेत्र ह्या प्रवासात झालेले बदल हे सर्व या वाटचालीत सामावले जाते. मुंबई महानगराचे अनेक कोनाडे त्यातील सार्वजनिक अवकाश आणि पुन्हा हा उच्चभू्रंच्या अवकाशाशी ताडून पाहणे, यामुळे दोन्ही गोष्टी परस्परविरोधाने अधिक ठळकपणे चित्रित केल्या आहेत. अगदी मुंबईशी निगडित असणारा प्रत्येक ठिकाणचा समुद्र देखील वेगळा आहे. याचे नेमके सूचन मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरच्या स्थलदर्शनातून होते.
कादंबरीगत जीवनाशयाची गरज म्हणून मुंबईचे समग्रपण सामावण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. साधारणतः एेंशीच्या दशकानंतरचे मुंबईतील गिरणगावच्या पडझडीचा आणि रिडेव्हलपमेेंट पर्यंतचा संधीकाळ यामध्ये चर्चेतून, आठवणीतून, भाष्यातून, समाजमाध्यमावरील पोस्टमधून येतो. हा मुंबईचा समाजेतिहास गिरण्यांच्या कामगार संपातील बारकाव्यानिशी आला आहे. यामध्ये घाटी आणि कोकणी यातील युनियनच्या फरकापर्यंत आणि नंतरच्या तडजोडी, पडझडी ते रिडेव्हलपमेंटची गुंतागुंत असा पट येतो. इंडिया बुल्स कामगारांच्या स्वप्नांना मारून उभी आहे. यासारख्या विधानातून लेखकाचे या संबंध बदलांकडे पाहण्याचा दृष्टिकोण दिसतो. याच दृष्टिकोणातून मुंबईच्या बदलाला सामोरे जाणारे वेगवेगळ्या समाजघटकांचे आयाम या कादांबरीगत कथानकात सामावले जातात. ‘प. महाराष्ट्रातले गावाला गेले. जमीनी होत्या. कोकाणातले इथेच राहिले. त्यांना नव्हत्या जमीनी. त्यांनी वडापाव टाकले, पोरे भाईगीरी करत होते वा शंभूसेनेत दिवस काढत होते.’ (पृ. 28) हे सरसरकट विधान किंवा गिरणी कामगार महाराष्ट्रीय समाजाचे सामान्यीकरण एवढे सरळ रेषेत नसले तरी, हा बदललेल्या गिरणगावच्या पडझडीतील अवकाश ज्या राजकीय व्यवस्थेने व्यापला त्याचे तळपातळीवरील वास्तव येते.
मुंबई शहराच्या नजरेत गाव आणि गावाच्या नजरेने शहर हे विरोधाभासही दाखवून दिले आहेत. शहरातही अनेकविध प्रस्तर आहेत. त्यातील विरोधाभास ही नेमक्या वृत्तीप्रवृत्तीसह येतात. तसेच गावातील बदलाच्या टप्प्यातही जातीय समीकरणाचे बागायती सरंजामीचे मराठा, माळी, धनगर पीळ येतात. शहरांकडे पुरोगामी असणारे गावात जातीयवादी हे समकालीन महाराष्ट्राचे समाजवास्तवही येते. सुधारकी वृत्तीचे नेमके काय झाले, भोवतालच्या सामाजिक पर्यावरणाशी समायोजन साधत सुधारणावाद सांगणाèया वडिलांच्या सुधारकी वृत्तीविषयी समुद्र जी साशंकता दाखवून देतो त्यामधून आधीच्या सुधारकी पिढीचे वर्तमान अधोरेखित करतो. येथे गावखेड्यातील समाजजीवनात पाटीलकी विशेषतः तोंडपाटीलकी त्याच पार्श्वभूमीवरील मुंबईची पटेलीगिरी नेमकेपणाने पकडली आहे.
महानगरीय वर्तमानाचे दिग्दर्शन करत असतानाच या सबंध बदलत्या काळाची भविष्यदर्शी वाटचाल मांडली आहे. या वाटचालीचा वेग पकडता ठेवण्याचा प्रयत्न कथनातील समाजमाध्यमी तंत्राच्या उपयोजनातून साधला आहे. चाळीतल्या भाषा योजनेतून समकाळातील मूल्यात्मक बदलाचे वास्तवही दाखवून दिले आहे. ‘‘आजकालच्या स्वप्नांना रेफरन्स लागतो. धर्माचा जातीचा मग पैशाचा. चाळीत अनेक सलमान सचिन गल्लीतच संपतात. त्यांच्या स्वप्नांचा म्हशीचा फोदा होतो. टॅलेंट नाही तर बाजारात एक्सपोझर लागतो. बहूराष्ट्रीय कंपन्या स्वप्नच विकतात.... अध्यात्म स्वप्नांवरच उभे राहत असेल वा मोडत असेल. पण ते स्वतःचेच उत्खनन. धर्म स्वप्न विकायचा आदीम कार्यक्रम.... स्वप्नांना विसरणे वा उजागर करणे बस्स.’’ (पृ. 148) या वर्तमानाचे समाजभान समुद्रला योग्य वयात कळाल्यामुळे तो या चाळीच्या फेèयातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो. इंजिनिअर होऊन आय.टी.पार्क मध्ये नोकरी पकडतो. उच्च वर्णीय श्रीमंत ऊर्जा या मुलीसोबत लग्न करतो. आय.टी. पार्कमधील उत्तरभारीतीय-दाक्षिणात्य लॉबींग या चक्रात आणि समुद्र हे आपल्या प्रगतीला असणारे कुंपण वाटून समुद्रपासून ऊर्जा दुरावते. समुद्रच्या दृष्टीने भूतकाळ आणि त्याचा वर्तमान चाळीतला आहे. ऊर्जेच्या सहवासात त्याला हा वर्तमान बदलून चाळीतून बाहेर पडायचे आहे परंतु ऊर्जा सोडून जाते आणि चाळ हेच त्याचे भागध्येय कायम राहते.
खंडित अनुभवविश्वाला साकारण्यासाठी आणि महानगरीय काळाची गती पकडण्यासाठी समाजमाध्यमी कथनतंत्राचा सर्जक वापर आणि त्याला साजेलशा भाषायोजनेचे वेगळेपण हे या कादंबरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या कथन तुकड्यांनी ही खंडित जगण्याची परिमाणे जशी जोडली जातात तसेच त्यातील गती पकडण्याचाही प्रयत्न होतो. दृश्यात्मकतेबरोबरच प्रसंगचित्रणात शब्दयोजनेतील वैशिष्ट्यपूर्ण वापरातून घटनेतील गतीमान शक्यता उजागर होतात.
‘पटेली’ कादंबरीतील आाशयाचा एक मुख्य भाग हा सांस्कृतिक चिंतनाने व्यापला आहे. समुद्र आणि ऊर्जा, गझल आणि हेमा यांच्या चर्चेतून तर कधी समुद्रच्या स्वकथनातून, भाष्यातून वाङ्मयीन, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवरील चिंतन येते. या सर्व संस्कृतिचिंतनात लेखकाची मते पात्रांकडून व्यक्त होताना दिसतात. शिवाय लेखकीय वैयक्तिक आवडीनिवडीचा आग्रह या मतांमध्ये दिसतो. वैयक्तिक वाङ्मयीन अनुभवाचे हे सामान्यीकरण कादंबरीला सांस्कृतिक जगाच्या उथळ शेरेबाजी पलीकडे काही देत नाही. एकतर हे जगण्यातून आकारणारे सांस्कृतिक संचित म्हणून न येता, ते फक्त प्रतिक्रियावादी ठरते ही मोठीच उणीव या कादंबरीची आहे. शिवाय वाङ्मयीन व्यवहाराकडून काहीएक अपेक्षा ठेवणारा नायक चित्रित करणाऱ्या या कादंबरीत लेखनामध्ये लेखनविषयक नियम पाहायला हवे होते. पानोपानी लेखनविषयक चुका आढळतात यातून वाचनीयता खंडीत होते. ह्या चुका काही बोली रूपांच्या नाहीत, त्या सहज टाळता येण्यासारख्या होत्या. असे असले तरी महानगरीय तरुणांच्या भावविश्वाचे निर्मम दर्शन करण्यात या कादंबरीला यश आले आहे. लेखकाचा कादंबरीलेखनाचा हा पहिलाच प्रयत्न त्याच्याकडून अपेक्षा वाढवणारा आहे.

पटेली (कादंबरी)
लेखक-अविनाश उषा वसंत
प्रकाशक- ललित पब्लिकेशन, (9869377806)
एकूण पृष्ठ- 196
किंमत-250

dpgholap@gmail.com

बातम्या आणखी आहेत...