आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Death Of A Doctor And Question Marks In Front Of The Society|Article By Dr. Chandrakant Laharia

दृष्टिकोन:एका डॉक्टरचा मृत्यू आणि समाजासमोर प्रश्नचिन्ह

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची बातमी सर्वांनाच धक्का देणारी आहे. या अकाली मृत्यूमागे कथित राजकीय दबाव, धमक्या, खंडणी व मानसिक हिंसाचार यांचा समावेश आहे. त्याचबरोबर तो आरोग्य यंत्रणा व लोक यांच्यातील तुटत असलेला विश्वासही अधोरेखित करतो. गेल्या दोन दशकांत भारतात आरोग्यसेवा कर्मचारी व डॉक्टरांविरुद्ध हिंसाचार नियमितपणे वाढला आहे आणि डॉक्टरांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त होत आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. या समस्येच्या मुळाशी जायला हवे.

देशातील आरोग्यसेवेवरील अविश्वास आणि हिंसाचाराला काही प्रमाणात उदयोन्मुख भांडवलशाही मानसिकता जबाबदार आहे. कमकुवत सरकारी सेवांमुळे एखादा रुग्ण उपचारासाठी खासगी क्षेत्रात जातो तेव्हा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नातेसंबंध खरेदीदार आणि विक्रेता असे बनतात. सर्वोत्तम उपचारदेखील काही परिस्थितींत काम करत नाहीत, हे वास्तव आहे. पण, बाजारवादी विचारसरणीने चकचकीत आणि महागड्या रुग्णालयांना चांगल्या उपचारांचा पर्याय बनवायला सुरुवात केली आहे. कितीही पैसा खर्च केला तरी रुग्ण जगला पाहिजे, असे कुटुंबीय सांगतात तेव्हा कुठे तरी भांडवलशाहीवादी परिणाम दिसून येतो, त्यात लोकांना वाटते की पैशाने जीवन-मरणही विकत घेता येते.

चित्रपट हा काही प्रमाणात समाजाचा आरसा असतो, पण गेल्या दशकात डॉक्टर व परिचारिका बहुतेक हिंदी चित्रपटांत ‘देव’ किंवा ‘राक्षस’ किंवा ‘लोभी व्यक्ती’च्या बायनरीमध्ये अगदी वरवर दाखवल्या गेल्या आहेत. उपचार हा रुग्णाच्या बरे होण्याच्या प्रक्रियेचा केवळ एक भाग आहे, हे विसरले जाते. खरे तर रुग्ण बरा होणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदा. आजार कोणत्या टप्प्यात आहे, तो किती गंभीर आहे व रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती किती मजबूत आहे इ. उपचारात जितकी भूमिका डॉक्टरांची असते तितकीच रुग्णाची किंवा त्याच्या कुटुंबाची व रुग्णालयांमध्ये उपलब्ध सुविधांचीही असते.

राजकारणी अनेकदा डॉक्टर आणि खासगी रुग्णालयांकडे बोट दाखवतात, पण मोठा प्रश्न असा आहे की, एखाद्या गरीब गर्भवती महिलेने प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयाची निवड केली तर तो कमकुवत सरकारी आरोग्य सेवेचा पुरावा नाही का? भारतात गेल्या सात दशकांत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात बरीच प्रगती झाली आहे, परंतु सरकारी आरोग्य सेवा अजूनही अपुऱ्या आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे पूर्णपणे सुविधायुक्त नाहीत. गरज भासते तेव्हा लोकांना खासगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि छोट्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जावे लागते. खासगी रुग्णालये आणि खासगी प्रॅक्टिसमधील डॉक्टर सुमारे दोनतृतीयांश आरोग्य सुविधा देतात. खासगी क्षेत्रात आरोग्य सुविधा नसतील तर आज देशात आरोग्यसेवेची उपलब्धता बिकट होईल. प्रत्येक राज्य सरकारने आरोग्य सेवेमध्ये अधिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे, हेदेखील यावरून लक्षात येते.

मग आपण हे समजून घेतले पाहिजे की, कधी कधी सर्वोत्तम आरोग्य सेवा असूनही परिणाम अपेक्षेप्रमाणे मिळत नाहीत. स्मिता पाटील ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. वयाच्या ३१ व्या वर्षी २८ नोव्हेंबर १९८६ रोजी तिने एका मुलाला जन्म दिला (आजचा अभिनेता प्रतीक बब्बर), परंतु एक उत्कृष्ट हॉस्पिटल असूनही प्रसूती संसर्गामुळे १३ डिसेंबरला तिचा मृत्यू झाला. रुग्णालय लहान असो की मोठे, गुंतागुंत होऊ शकते.

डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्र पूर्णपणे धुतल्या तांदळासारखे नाही, हेही खरे आहे. कोविडच्या काळात अनेक रुग्णालयांनी केलेले महागडे उपचार आणि रुग्णवाहिका मालकांकडून जास्त दर वसूल करणे यात सुधारणेची गरज अधोरेखित करतात. वैद्यकीय नियामक परिषद डॉक्टरांवर देखरेख ठेवते, ती मजबूत आणि निःपक्ष असणे आवश्यक आहे. आरोग्य सेवांवरील लोकांचा विश्वास टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक अकाली मृत्यू दु:खद असतो, पण ज्या परिस्थितीने डॉ. अर्चना शर्मा यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले ते संपूर्ण समाजाचे अपयश आहे. डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना मारहाण आणि छळ सुरू राहिल्यास खासगी डॉक्टर गंभीर आजार असलेल्या रुग्णांना नकार देऊ लागतील. छोटे दवाखाने बंद पडण्याच्या मार्गावर येतील, फक्त मोठी आणि महागडी रुग्णालये उरतील आणि त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

डॉ. चंद्रकांत लहारिया प्रख्यात डाॅक्टर c.lahariya@gmail.com

बातम्या आणखी आहेत...