आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय राजकारणात अनेक दशके महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अजितसिंग यांचाही कोरोनाने गुरुवारी सकाळी बळी घेतला. देशातील उच्चशिक्षित, हायटेक आणि सभ्य राजकारण्यांच्या रांगेत अजितसिंग हे वरच्या स्थानी होते. आयआयटी खरगपूरसारख्या संस्थेतून पदवी घेऊन ते अमेरिकेत गेले होते. तिथे संगणक अभियंता म्हणून १५ वर्षे त्यांनी काम केले. आयबीएम कंपनीतील ते पहिले भारतीय ठरले होते; पण वडिलांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी परत भारतात आले आणि राज्यसभेचे खासदार बनले. तब्बल आठ वेळा त्यांना संसद सदस्य बनण्याचा मान मिळाला होता. अर्थात, तो त्यांच्या कर्तृत्वावर त्यांनी मिळवला होता.
वडिलांच्या म्हणजेच माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या निधनानंतर लोक दल हा पक्ष नेतृत्वाच्या चढाओढीत फुटला आणि अजितसिंग यांनी लोकदल (अ) स्थापन केला. नंतर जनता पक्ष, पुढे जनता दल आणि काही वर्षांनी ते काँग्रेसमध्ये गेले. त्याही पक्षातून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रीय लोक दल या पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचे ते शेवटपर्यंत अध्यक्ष होते. राजकीय पक्षांच्या आघाड्या बनवण्यात ते तरबेज होते. त्यामुळेच कदाचित राजकारणातील संधिसाधू म्हणूनही त्यांच्यावर टीका झाली; पण त्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही.
जनतेचे भले करता यावे यासाठी आपण हे करतो आहोत, असे ते म्हणायचे. त्यामुळेच व्ही. पी. सिंग, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग सरकारमध्येही ते मंत्री होते. अलीकडेच ते कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचेही नेतृत्व करत होते. कोरोना विषाणूने त्यांच्या आयुष्यभराचा हा राजकीय प्रवास १५ दिवसांत संपवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.