आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उलटा चष्मा:शेतकरी आत्महत्यांची "ती' कारणे...

दीपक पटवेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अनेकानेक कारणे आपण ऐकलेली असतात. आपल्या आजुबाजूलाच ते घडत असल्याने आपल्याला ती माहितीही असतात. पण शेतीला रात्रीच्या वेळी होणारा वीजपुरवठा हे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे कारण असू शकते, यावर चटकन विश्वास बसतो का?

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अनेकानेक कारणे आपण ऐकलेली असतात. आपल्या आजुबाजूलाच ते घडत असल्याने आपल्याला ती माहितीही असतात. पण शेतीला रात्रीच्या वेळी होणारा वीजपुरवठा हे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे कारण असू शकते, यावर चटकन विश्वास बसतो का? मला एका अनुभवी शेतकऱ्यानेच हे सांगितले तेव्हा माझाही विश्वास बसला नव्हता. मी म्हणालो, अहो, शेतकऱ्यांच्या मृत्यूचे कारण आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? पत्रकारीतेत असल्याने त्या बातम्या वर्षानुवर्षे करत आणि वाचत आलोय. रात्री शेतात वीज पंप सुरू करायला गेलेल्या किती शेतकऱ्यांचा साप चावल्याने मृत्यू होतो, ही तर अनेक पत्रकारांची वर्ष, सहामहिन्यातून एकदा नियमितपणे द्यायची बातमी बनली आहे. अलिकडेच ‘दिव्य मराठी’तील अनेक सहकार्यांनी रात्री शेतकऱ्यांबरोबर शेतात जाऊन ग्राऊंड रिपोर्टही केले. रात्री शेतातील विद्युत पंप सुरू करायला गेलेल्या तीन भावांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची बातमीही अलिकडचीच आहे. त्यामुळे रात्रीच्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना नाहक प्राण गमवावे लागतात, असेच त्या शेतकऱ्याला म्हणायचे असेल, असा माझा अंदाज होता. पण नाही. शेतकरी आपल्या दाव्यावर ठाम. शेवटी शेतकरी तुम्ही आहात की मी? मग शेतकऱ्यांविषयी तुम्हाला जास्त माहिती की मला? अशा मुद्यावर गाडी आली. मी अर्थातच माघार घेतली. ‘कसे ते विचाराना’ तो शेतकरी म्हणाला. ‘कसे काय?’ मी गाडीला धक्का दिला. त्यानंतर त्या शेतकऱ्याने जे काही सांगितले ते नक्कीच विचार करायला लावणारे होते.

अलिकडे तरी रात्री साडेदहा वाजेनंतर ग्रामीण भागात वीजपुरवठा केला जातो. पूर्वी तर मध्यरात्री केव्हा तरी शेतात वीज यायची आणि पहाटे बंदही व्हायची. तेव्हा मुळात विजेचे उत्पादनच कमी असायचे. जे व्हायचे ते कारखान्यांनाच कमी पडायचे. त्यामुळे शहरांमध्येही लोडशेडींग नावाचा राक्षस राहायचा. उन्हाळ्यात तर तो अक्षरश: खायला उठायचा. (विदर्भ आणि खान्देशातील वाचकांना त्या आठवणीही नकाे असतात.) अशा परिस्थितीत ग्रामीण भागाचा विचार कोण करतोय? मग उपकार म्हणून मध्यरात्री सारा देश झोपी गेल्यावर शेतातले दिवे लागायचे. हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडलेली, रस्त्यांवर काँग्रेस गवत आणि इतर वनस्पतींची दाटी झालेली. त्यातून मार्ग काढताना कोणाला साप दंश करायचा तर कोणाला विंचवाचा डंख बसायचा. अनेक भागात तर जंगली श्वापदंही दडून बसलेली असायची. त्यांच्यापासून वाचलेले शेतकरी मग शेतात विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून जीव गमवायचे.

विजेचा धक्का बसण्याचे प्रकार का व्हायचे किंवा अजूनही होतात या संदर्भात एका अहवालातून समोर आलेली आकडेवारीही विचार करण्यासारखी आहे. ग्रामीण भागातील एक लाख ३९ हजार कृषि वीज जाेडण्याधारक शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर तयार झालेला हा अहवाल आहे. त्याचे निष्कर्ष सांगतात की, ज्यांच्याशी संपर्क झाला त्या शेतकऱ्यांपैकी ६५ टक्के शेतकऱ्यांना विद्युत मीटर लावण्यात आल्याची नोंद महावितरण कंपनीकडे होती. म्हणजे ३५ टक्के शेतकऱ्यांकडे मीटरशिवाय वीजपुरवठा करण्यात येत असल्याचे कंपनीला माहिती होते. प्रत्यक्षात मीटर देण्यात आल्याचे ३९ टक्केच शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र १७ टक्के शेतांमध्येच प्रत्यक्ष मीटर लावण्यात आल्याचे आढळून आले. आता ज्या १७ टक्के शेतांमध्ये मीटर आढळून आले त्यांची संख्या होती २३,४००. पण त्यापैकी केवळ १९४७ मीटरचेच रिडींग सर्वेक्षण करणाऱ्यांना घेता आले. कारण उर्वरित मीटर एकतर कुलूपबंद खोलीत होते किंवा बंद पडलेले होते. ज्या १९४७ मीटरवरचे रिडींग घेता येत होते त्यापैकी केवळ ८६१ मीटरचेच रिडींग विद्युत पंप सुरू केल्यावर पुढे जात होते. उर्वरित मीटरवरील आकड्यांत काहीच फरक पडत नव्हता, असेही आढळून आले. अर्थात, आजचा विषय तो नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करा. प्रश्न आहे शेतकऱ्यांना विजेचा धक्का का बसतो हा. तर जे शेतकरी विद्युत पंप वापरत होते त्यांच्यापैकी साधारण ९.५ टक्के शेतात पंप सुरू करण्यासाठी लागणारा कंट्रोल बोर्डच नव्हता. म्हणजे धोक्याची पातळी अती उच्च. थोडीही चूक कशी माफ होणार? हे सगळं वाचलेलं असल्यामुळे याचा आत्महत्यांशी काय संबंध, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच नाही का? पण त्या शेतकऱ्याने जे सांगितले ते कधी कल्पनाही केली नव्हती असे होते.

ज्यांच्याकडे पूर्वीपासून शेती आहे किंवा ज्यांनी ग्रामीण भागातले जीवन अनुभवले, पाहिले आहे त्यांना ‘सालदार’ म्हणजे काय, हे माहिती असणार. शेतीच्या कामांसाठी वार्षिक मेहनताना ठरवून काम करणारी व्यक्ती म्हणजे सालदार. अलिकडे सालदार मिळणे तसेही कठीणच झाले आहे. पण १५ वर्षांपूर्वी साधारण प्रत्येक शेतकऱ्याकडे सालदार असायचे. हे सालदार म्हणजे शेतात मेहनत करणारे गडी. दिवसभर शेतात काम करायचे आणि मध्यरात्री शेतीला पाणी देण्यासाठी पुन्हा शेतात जायचे म्हणजे सालदाराच्या जीवावरच येणार ना. पण त्याच्याशिवाय भागणार कसे? कारण नुसता पंप सुरू करून चालत नाही. शेतात पाणी फिरवावे लागते. ते सर्व कोपऱ्यांपर्यंत पोहचवावे लागते. शेतकऱ्याला त्याची सवय राहिलेली नव्हती. मग सालदाराच्या अटी समोर येऊ लागल्या. रात्रीची वेळ. अंधारातून जायचे. त्यात साप, विंचवाची भीती. शिवाय थंडी अंग गोठवणारी. झोप लागून गेली तर गेला दिवस वाया. हे व्हायचे नसेल तर सालदाराला जागे राहावे लागणार. शिवाय भीतीवर मात करायची. दिवसभर काम केल्यामुळे दुखणारे अंग बधीर करायचे. यावर एकच उपाय होता तो म्हणजे दारू. दारुची बाटली दिली तर सालदार रात्री शेतात काम करायला तयार होत असे. बरं एवढं सगळं करूनही ‘झोप लागून गेली’ असेच उत्तर त्याने दुसऱ्या दिवशी दिले तर काय करणार? मग शेतकरी त्याच्यावर लक्ष ठेवायला जायला लागला. त्यालाही थंडी वाजायची. साप, विंचवाची भीती वाटायची. मग तोही सालदाराबरोबर घोट घोट घ्यायला लागला आणि पाहाता पाहाता दारूच्या आहारी जायला लागला. कधी दारूच्या बाटलीला हात न लावणारा शेतकरी दारुच्या व्यसनात बुडाला तो असा. ही दारू शेतकऱ्याला आत्महत्येच्या विचारापर्यंत न्यायला लागली आणि अशा प्रकारे रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या- इति तो शेतकरी.

आता शेतकरी हा एकतर संवेदनशील विषय. त्यातही शेतकरी आत्महत्या या त्याच्या व्यसनामुळेच होतात असे म्हणणे म्हणजे अतीच झाले. त्यामुळे कोणी हे सत्य बोलत नाही आणि स्वीकारतही नाही, अशी पुस्तीही त्या शेतकऱ्याने जोडली. आपण स्वत: शेतकरी असूनही हे बोलतो आहोत, याचे त्याला भलते कौतुक. तेही त्याने आमच्याकडून करून घेतले. असो. त्याचे म्हणणे पटो अथवा न पटो, पण त्याच्या या गप्पांमधला कार्यकारणभाव मात्र जुळत होता. तो अमान्य कसा करणार? त्या अनुशंगाने बरेच संशोधन करण्याचा प्रयत्न मधल्या काळात केला. शेतकरी आत्महत्यांबाबत सर्वेक्षण करणाऱ्या अनेकांनी आत्महत्यांच्या अनेक कारणांमध्ये ‘दारुचे व्यसन’ हेही एक कारण नोंदवलेले आढळले. पण अगदी ओझरते. या आत्महत्यांना इतर कारणेच अधिक जबाबदार आहेत हे खरेच आहे. पण या शेतकऱ्याने मांडलेल्या या मुद्याच्या अनुषंगानेही कोणी संशोधन करायला काय हरकत आहे ? कोणी याला शेतमजुराला बदनाम करण्याचा उद्योग म्हणण्याची शक्यता आहे. तो शेतकरी म्हणाला त्या प्रमाणे कोणी ही शेतकऱ्यांचीच बदनामी म्हणूनही भुई बडवेल. अर्थात, असा विरोध आणि टीका गृहित धरूनच चिकित्सा करायला हवी. कारण चिकित्सा हा आपल्याकडचा अत्यंत नावडता विषय आहे. आपल्याला कशाचीच चिकित्सा करायला नको असते. मग तो कोणताही धर्म असो की धारणा, आपल्या भावना लगेच दुखावतात. एक मात्र खरे की, दृष्टीचा कोन बदलला की समोरचे चित्र बदलते. इंग्रजी आकड्याच्या एका बाजूला बसले की तो ‘सहा’ दिसतो आणि दुसऱ्या बाजूने पाहिले तर नऊ. दोन्ही बाजूने जे दिसते ते वेगवेगळे असले तरी खरे असते. तिथे जाऊन पाहायची आणि ते स्वीकारायची तयारी मात्र ठेवायला हवी. नाही तर अकारण मनस्ताप होतो. या शेतकऱ्याने सांगितलेल्या या मुद्यानेही तो होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.

(लेखक "दिव्य मराठी' जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक आहेत)

deepak.patwe@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...