आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतवचने आणि वर्तमान:देहासी विटाळ म्हणती सकळ...

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच २८ मे रोजी आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा झाला. यानिमित्त हायस्कूलच्या मुलींसाठी चर्चासत्रं, शिबिरं घेतली गेली. पाळी अथवा ऋतुस्राव ही महिलांच्या आयुष्यातील १४ ते ४४ अशा सुमारे ३० वर्षे कमीअधिक प्रमाणात सोबत असलेली नैसर्गिक बाब आहे. परंतु त्याची सांगड देवाशी, धर्माशी आणि पावित्र्याशी-विटाळाशी घातल्याने सारा घोळ झाला. पाळी या विषयावर आता पूर्वीइतका टॅबू राहिलेला नाही. मॉलमधून पॅड घेताना जम्बो पॅक, सुपर सेव्हर असे पॅड्स खरेदी करताना पुरुषमंडळी दिसतात. ते वडील असतील, पती आणि प्रसंगी भाऊ असणंही आता रूटीन झालं आहे. मात्र अजूनही काही घरांमध्ये आम्ही पाळतो, हे अभिमानाने सांगितलं जातं. सारासार विवेक वापरला की कळतं मासिक पाळी या शरीराच्या नैसर्गिक क्रियेला आपण टॅबूच्या मखरात बसवलंय. बाई आहे, म्हणजे पाळी येणारच आणि योग्य वयात जाणारच, हे स्वाभाविक आहे. मासिक पाळीबाबत गॉसिप्स नको तर स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हेच सत्य आहे. आपण सर्वजण एका स्त्रीच्या उदरात जन्मलो आहोत, ज्या रक्ताने आपलं पोषण केलं ते रक्तच विटाळ ठरवायचं हा कोणता न्याय आहे? संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी. त्यांचे हे अभंग विटाळाचे अभंग म्हणूनच प्रसिद्ध आहेत.

देहासी विटाळ म्हणती सकळ। आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध॥ देहींचा विटाळ देहींच जन्मला। सोवळा तो झाला कवण धर्म॥ विटाळ वांचोनी उत्पत्तीचे स्थान। कोणा देह निर्माण नाही जगी॥ म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी। विटाळ देहांतरी वसतसे॥ देहाचा विटाळ देहीच निर्धारी। म्हणतसे महारी चोखियाची॥ सोयराबाई यांच्याप्रमाणे त्यांचे पती चोखामेळा यांचे अभंगही विटाळातील शिवाशिवीला चोख उत्तर देणारे आहेत. चोखोबा म्हणतात, विटाळाचे मूळ देहमूळ॥ चोखामेळा म्हणे मज वाटते नवल। विटाळापरते आहे कोण।

संत चोखामेळा सोवळे-ओवळेपणा या दोन्ही कल्पनांपेक्षा विठ्ठल वेगळा असल्याचे सांगतात. जन्म-मृत्यूशी जोडलेली सुतकाची म्हणजे विटाळाची, अशुद्धतेची संकल्पना सर्व मनुष्यमात्रांना एकच असताना कोण तो सोवळा, कोण तो ओवळा, हा प्रश्नच फिजूल, वायफळ आहे. सगळेच विटाळग्रस्त आहेत. चोखोबा आणि सोयराबाई यांच्यापेक्षा सुमारे शंभर वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वर आणि शरणांनी ग्रंथप्रामाण्यवाद, वेदांचे अवडंबर, पुराणांच्या भाकडकथा आणि विटाळास नाकारले आहे. समाजातील विषमतेचं उच्चाटन झालं पाहिजे, असं म्हणणारा खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार बसवण्णांनी व्यापक स्वरूपात मांडला. स्त्री ही अपवित्र आहे अशी बतावणी करणाऱ्या परंपरावादी, प्रतिगामी आणि पाखंडी धर्मांचा त्यांनी समाचार घेतला. जन्म, जाती, रजस्व, उच्छिष्ट (दुसऱ्यांचे उष्टे)आणि मृत्यू ही पंचसुतकं महात्मा बसवण्णा आणि शरणांनी निषिद्ध ठरवली. आई देव आहेच यात वाद असायचं कारण नाही़. पण स्त्री म्हणून बायको, बहीण, मुलगी, काकी, मामी यासह इतर सगळ्या नात्यांमधील स्त्रीसुद्धा देवच आहे.

एकट्या आईला देवत्व देताना इतर स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यावर महात्मा बसवण्णा यांनी कोरडे ओढलेत. स्त्री गौरव हा शरण संप्रदायाचा मानबिंदू आहे. त्यामुळे बाईला धर्माच्या नावाने जोखडात अडकवणाऱ्या मासिक पाळीच्या अ-पावित्र्याच्या कल्पनेला बसवण्णांनी तेव्हाच म्हणजे ९०० वर्षांपूर्वी सुरुंग लावला होता. मासिक पाळीचा विचार करताना बसवेश्वर काळाच्या किती पुढे होते याची जाणीव होते. बसवण्णांनी पंचसुतकं नाकारली. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या, शरणांच्या आणि अनुभव मंटपाच्या विचारांच्या विरोधात आहे. विटाळाबद्दल अक्कमहादेवी म्हणतात, स्त्री झाल्यास तिला पुरुषाचा विटाळ, पुरुष झाल्यास त्याला स्त्रीचा विटाळ मनातला विटाळ नष्ट झाल्यास शरीराच्या विटाळाला काही अर्थ आहे का? हे देवा, अस्तित्वातच नसलेल्या विटाळाला जग भुललंय पाहा मातंग धूळय्या शरण या विटाळाविषयी म्हणतात, मनाचं विटाळ आत्मप्रज्ञाने घालवावं शरीराचं विटाळ आत्मप्रज्ञाने घालवावं

षटस्थल ज्ञानी चन्नबसवण्णा म्हणतात, ज्या डोळ्यांनी ईश्वराला पाहतो, त्याच डोळ्यांनी परस्त्रीकडे पाहिल्यास ईश्वर कसा दिसेल? वासना आपल्या मनात आलीच तर तिथे देवत्वाचा ऱ्हास होतो. तर सोड्डळ चामरस हे शरण विचारतात, स्तनांचं अमृतपान करूनच मोठ्या झालेल्या मना, तेच पाहून कसा रे तडफडतोस?

योगियांचेेे अल्लमप्रभुदेव, अमुगीदेवय्या, शिवयोगी सिद्धरामेश्वर, अंबिगर चौडय्या, कक्कय्या यांच्यासह अनेक शरणांनी विटाळ मानणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. बसवण्णांसह शरणांनी बालविवाहाला विरोध केला. पुनर्विवाहाला संमती दिली होती. शिवाय लग्नाच्या निर्णयात पुरुषांइतकाच स्त्रियांनाही निर्णय घेण्याचा, पसंती-नापसंती दाखवण्याचा अधिकार दिला होता. जवळपास नऊशे वर्षांपूर्वी महात्मा बसवण्णा, त्यांच्या हजारो सहकाऱ्यांनी आणि लिंगायत धर्म मानणाऱ्या समाजाने उभी केलेली स्त्री-पुरुष समानता आजच्या आधुनिक युगातही मान्य होत नाही. साधा मासिक पाळीचा विटाळही आपण झुगारू शकत नाही. याबद्दलच्या जागृतीसाठी अांतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस पाळला जातो. या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वर किती दूरदृष्टीचे होते, किती आधुनिक विचारांचे होते याची जाणीव होते.

चन्नवीर भद्रेश्वरमठ - संपर्क : channavir@gmail.com

बातम्या आणखी आहेत...