आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:वंचित मातृत्व अन् नवतंत्रज्ञानाची साथ

डॉ. सुनीता तांदुळवाडकर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजही आपल्याकडे एखाद्या स्त्रीचं बाईपण हे ती ‘आई’ झाल्याशिवाय परिपूर्ण मानले जात नाही, हे कटू असले तरी वास्तव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या मागच्या कारणांकडे संवेदनशीलतेने पाहिले जात नव्हते आणि त्यावर गांभीर्याने उपायही शोधला जात नव्हता. आता विज्ञान - तंत्रज्ञानाने समाजमनातील अशा सगळ्याच धारणांची जळमटे झटकून टाकत, हातून निसटू पाहणारं मातृत्व हक्कानं मिळवून ते अभिमानानं मिरवण्याची संधी निर्माण केली आहे. ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञान हे त्यापैकीच एक. अशा आधुनिक उपायांमुळं आता आईच्या शारीरिक, मानसिक त्यागाच्या माहात्म्याबरोबरच तिच्या ‘आई’पणाच्या महतीची अधिक व्यावहारिक आणि वैज्ञानिक परिमाणं जगासमोर येत आहेत. आजच्या ‘मदर्स डे‘ अर्थात मातृदिनाच्या औचित्याने या वेग‌ळ्या विषयावर टाकलेला एक दृष्टिक्षेप...

नास्ति मातृसमा छाया | नास्ति मातृसमा गति: नास्ति मातृसमं त्राण | नास्ति मातृसमा प्रिया

अ शा शब्दांत महर्षी व्यासांनी मातृत्वाचे माहात्म्य सांगितले आहे. ‘मातृदेवो भव’ ही उपनिषदांतील उक्तीही आपल्या परिचयाची आहे. ‘आई बनणे’ हा कोणत्याही स्त्रीसाठी तिच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा अनुभव असतो. जेव्हा एखाद्या घरात बाळाचा जन्म होतो, तेव्हा केवळ आई-वडीलच नाही तर संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, सगळी मित्रमंडळीही या आनंदात सहभागी होतात. पण, प्रत्येक स्त्री इतकी भाग्यवान असेलच असे नाही. अनेक ज्ञात - अज्ञात कारणांमुळे, काही महिलांमध्ये गर्भवती होण्याची शक्यता कमी असते. अशा स्त्रीला समाजाकडून आणि अनेकदा तिच्या स्वतःच्या नातेवाइकांकडूनही चांगली वागणूक दिली जात नसल्याचे दृश्य आपल्या आजूबाजूला दिसते. या समस्येवर वैद्यकशास्त्रातील संशोधनातून ‘इन विट्रो फर्टिलायझेशन टेक्नॉलॉजी’ (आयव्हीएफ) म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी या तंत्राचा उपाय हाती आला आहे. हा विज्ञानातील एक चमत्कार मानला जातो आणि या माध्यमातून गेल्या काही दशकांमध्ये असंख्य अपत्यहीन महिलांना मातृत्वाची भेट मिळाली आहे. आधुनिक युगातील महिला ‘आयव्हीएफ’चे महत्त्व समजून घेत आहेत आणि विनासंकोच स्वीकारतही आहेत, हे आजच्या मातृदिनाच्या निमित्ताने आवर्जून नमूद करायला हवे.

अनेक महिलांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होत नाही. अशा परिस्थितीत ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्त्रीच्या शरीरातून स्त्रीबीज काढून ते पुरुषाच्या शुक्राणूमध्ये मिसळले जाते, ज्यामुळे गर्भाधारणेची प्रक्रिया पूर्ण होते आणि गर्भ तयार होतो. त्याचे नंतर स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. ही प्रक्रिया नैसर्गिक संकल्पनेपेक्षा वेगळी आहे. कारण यामध्ये भ्रूण निर्मितीचे काम शरीराबाहेर-प्रयोगशाळेत होते. परंतु, त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया नैसर्गिक गर्भधारणेसारखीच असते हे समजून घेतले पाहिजे. विज्ञान - तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने कित्येक अपत्यहीन स्त्रियांचे मातृत्वाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम या तंत्रामुळे शक्य झाले आहे. गरजू जोडप्यांचे मातृत्व-पितृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञ कार्यरत आहेत. या तंत्रज्ञानाविषयीच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे, जोडप्यांच्या वैयक्तिक गरजेप्रमाणे प्रजनन उपचारांची रचना केली जाते.

आयव्हीएफ लॅबमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे साध्य होते. सर्वोत्तम भ्रूण निवडीसाठी आता ‘टाइम लॅप्स इमेजिंग’चा वापर होतो आहे. रुग्णांना सर्वसमावेशक, परवडणारी आणि उच्च दर्जाची प्रजनन सेवा देण्याबरोबरच वंध्यत्वाची विविध लक्षणे असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचारही अलीकडे होत आहेत. ‘आयव्हीएफ’ प्रक्रिया नेमकी कुणासाठी गरजेची ठरते, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे, तर महिलांच्या बाबतीत अनियमित पाळी, स्त्रीबीज कमी असणे अथवा सक्षम नसणे, अधिक वय, गर्भनलिका बंद असणे, गर्भाशयामध्ये अथवा बीजांडामध्ये गाठी असणे आणि पुरुषांच्या बाबतीत शुक्राणू नसणे, शुक्राणू कमी अथवा खराब गुणवत्तेचे असणे, कमी हालचालींचे शुक्राणू अशी कारणे सांगता येतात.

आधुनिक विज्ञानाने वैद्यकशास्त्राला दिलेले हे तंत्रज्ञान केवळ मातृत्वाच्या सुखाला पारख्या झालेल्या महिलांसाठीच नव्हे, तर पितृत्वाच्या आनंदापासून दुरावलेल्या पुरुषांसाठीही वरदान ठरले नसते तरच नवल! मग हे ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय आणि ते कसे काम करते, असे प्रश्न स्वाभाविकपणे पडू शकतात. काही वेळा त्याविषयी सामान्यांच्या मनामध्ये गैरसमजही असल्याचे दिसते. त्यासाठी ही प्रक्रिया मुळापासून समजून घ्यायला हवी. या प्रक्रियेमध्ये स्त्रीला १०-१२ दिवस हार्मोनाल इंजेक्शन्स देऊन तिचे बीज वाढवले जातात आणि ते परिपक्व झाल्यानंतर योग्य तेवढी भूल देऊन सोनोग्राफीद्वारे बाहेर काढली जातात. त्यानंतर त्यामध्ये शुक्राणू मिसळून लॅबमध्ये कल्चर केले जातात. हे गर्भ ३ ते ५ दिवस वाढवून उणे १९६ अंश तापमानात गोठवले जातात. त्यानंतर योग्य त्या वेळी ते गर्भाशयात रोपीत केले जातात आणि १५ ते १७ दिवसांनी प्रेगनन्सी टेस्ट केली जाते. या तंत्राद्वारे यशस्वी गर्भधारणा होण्याचे जगभरातील प्रमाण ३५ ते ४० टक्के आहे. काही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे प्रमाण वाढवता येऊ शकते. ही सर्व प्रक्रिया तांत्रिक परिभाषेतील असली तरी ती समजून घेणे अगत्याचे ठरते. कारण या संपूर्ण प्रक्रियेत गरजू दांपत्याला प्रत्येक टप्प्यावर सहकार्य मिळणे आवश्यक असते. ‘क्लोज्ड चेंबर इक्सी’ या प्रक्रियेत इंट्रासायटोप्लास्मिक इंजेक्शन तंत्राद्वारे एका स्त्रीबीजामध्ये एक शुक्राणू इंजेक्ट केला जातो. याचा फायदा कमी शुक्राणू अथवा खराब शुक्राणू असणाऱ्या तसेच यापूर्वी “आयव्हीएफ’ अयशस्वी झालेल्या दांपत्याना होतो. क्लोज्ड चेंबरमुळे वातावरण दूषित होण्यापासून रोखण्यास मदत होते.

इम्सी अर्थात इंट्रासायटोप्लास्मिक मोर्फोलॉजिकली सेलेक्टेड स्पर्म इंजेक्शनमध्ये शुक्राणू एका स्पेशल मायक्रोस्कोपमध्ये ७००० वेळा मॅग्निफाय करून, त्यातून सर्वोत्कृष्ट शुक्राणू निवडून स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट केला जातो. स्पिंडल इमेजिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून मायक्रोस्कोपच्या साहाय्याने स्त्रीबीजामधील स्पिंडल पाहून शुक्राणू इंजेक्ट केला जातो. त्यामुळे स्पिंडलला इजा होण्याचे प्रमाण कमी होऊन अधिक गुणवत्तेचे भ्रूण बनण्यास मदत होते. एम्ब्रियोस्कोप हा एक नवीन प्रकारचा इनक्युबेटर आहे, जो भ्रूणशास्त्रज्ञांना भ्रूणपेशींच्या विभाजनांचे निरीक्षण करण्यास मदत करतो. इनक्युबेटरमध्ये अंगभूत कॅमेरा असतो, जो ठरावीक अंतराने भ्रूणांची छायाचित्रे घेऊ शकतो. ही छायाचित्रे नंतर प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर भ्रूणाचा विकास दर्शवणारा टाइम-लॅप्स व्हिडिओ तयार करण्यासाठी एकत्रित केली जातात. भ्रूण कधी आणि कसे विभाजित करतात हे पाहून हा विकास सामान्यपणे होतो आहे की नाही, याचे मूल्यांकन भ्रूणशास्त्रज्ञ करू शकतात. ‘आय‌व्हीएफ’ प्रयोगशाळेत भ्रूण असताना त्यांना अनुकूल वातावरण प्रदान करण्यासाठी इनक्युबेटर स्त्रीच्या शरीरातील स्थितीची शक्य तितक्या जवळून नक्कल करते.

टाइम लॅप्स टेक्नॉलॉजी मूल्यांकनादरम्यान भ्रूणांच्या निरीक्षणावेळचे बंधन आणि ताण कमी करते. व्हिडिओच्या अधिक वस्तुनिष्ठ विश्लेषणाद्वारे भ्रूण निवड प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. लेझर असिस्टेड हॅचिंगमुळे वारंवार इम्प्लांटेशन अयशस्वी होणे, गर्भधारणा कमी होणे, भ्रूणाभोवतीचे आवरण जाड असणे या कारणांसाठी लेझरच्या मदतीने आवरण पातळ करून भ्रूणाला गर्भाशयामध्ये प्रत्यारोपित होण्यास मदत करते. तसेच भ्रूणाची बायोस्पी करून अानुवंशिक आजारांची तपासणी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. क्रायोप्रिझर्वेशन तंत्रामध्ये उणे १९६ अंश सेल्सियस तापमानाला भ्रूण, शुक्राणू तसेच स्त्रीबीज हे १०-१५ वर्षांसाठी गोठवून ठेवले जातात आणि योग्य वेळी वापरले जातात. याचा फायदा कर्करोगाने ग्रस्त रुग्ण, उशिरा लग्न करणारी जोडपी, करिअरला प्राधान्य देणाऱ्या महिला यांना होऊ शकतो. थ्रीडी एंडोस्कोपी या तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भाशयातील गाठी, गर्भनलिकेतील अडथळा, गर्भाशयाचे पडदे, स्त्रीकोषातील गाठी अतिशय सुरक्षित पद्धतीने काढता येतात.

थ्रीडी - फोरडी सोनोग्राफीद्वारे गर्भाशय तसेच स्त्रीकोष, गर्भनलिका याचा सखोल अभ्यास करुन दांपत्यासाठी योग्य ती प्रजनन प्रक्रिया ठरवली जाते. त्याचप्रमाणे कम्प्युटराइज्ड सिमेन तपासणी तंत्रज्ञानाचा वापर करून काही सेकंदांमध्ये शुक्राणूंची तपासणी करण्यात येते आणि शुक्राणूंची संख्या, हालचाल व स्वरूप यांचा अभ्यास करता येतो. थोडक्यात, वैद्यकशास्त्रातील प्रगत संशोधनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत असंख्य अपत्यहीन जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्यात हे तंत्रज्ञान परिणामकारक ठरले आहे.

मातृदिनी आईच्या मोठेपणाचे गोडवे गायले जातात. मात्र, खरं ‘आई’पण हे शारीरिक वेदनांइतकंच मानसिक, भावनिक त्यागातून, समर्पणातून साकारतं. एरवी त्यासाठी सिद्ध असलेल्या एखाद्या स्त्रीवर नैसर्गिक मर्यादा आल्या म्हणून तिच्यातील मातृत्वाची असोशी जराही कमी होत नाही. पण, आजही एखाद्या स्त्रीचं बाईपण हे ती ‘आई’ झाल्याशिवाय परिपूर्ण मानले जात नाही, हे कटू असले तरी वास्तव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यामागच्या कारणांकडे संवेदनशीलतेने पाहिले जात नव्हते आणि त्यावर गांभीर्याने उपायही शोधला जात नव्हता. आता विज्ञान - तंत्रज्ञानाने समाजमनातील अशा सगळ्याच धारणांची जळमटे झटकून टाकत हातून निसटू पाहणारं मातृत्व हक्कानं मिळवून ते अभिमानानं मिरवण्याची संधी निर्माण केली आहे. त्यामुळं आईच्या शारीरिक, मानसिक त्यागाच्या माहात्म्याबरोबरच तिच्या आईपणाच्या महतीची अधिक व्यावहारिक आणि वैज्ञानिक परिमाणंही जगासमोर येत आहेत. नैसर्गिक मातृत्व प्राप्त झालेल्या आणि ते लाभले नाही म्हणून हतबल न होता आपल्या ‘स्त्रीत्वा’ची कहाणी, नवतंत्रज्ञानाच्या साथीनं मिळणाऱ्या मातृत्वासह ‘सुफळ’ संपूर्ण करणाऱ्या साऱ्या भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा!

बातम्या आणखी आहेत...