आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’च्या गोष्टी:मॉलमधली आकांक्षा

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरं तर विकत काहीच घ्यायचं नव्हतं, पण एक काम जरा लवकरच संपलं होतं आणि दुसरी मीटिंग सुरू व्हायला आणखी तासाभराचा तरी अवधी होता. त्यामुळे मधला वेळ काढण्यासाठी एका मॉलमध्ये शिरलो. तसा खूप मोठा नव्हता मॉल, पण सुपरमार्केटपेक्षा मोठा होता. असंच इकडे तिकडे पाहत, हळूहळू चालत फिरू लागलो. खरं तर मला असा टाइमपास करायचा जाम वैताग येतो, पण त्या दिवशी काही पर्याय नव्हता. बाहेर ऊन मी म्हणत होतं. मॉलमधली गार हवा बरी वाटत होती. भांडी, बेडशीट्स, साबण, प्लास्टिकचे डबे-भांडी इत्यादी सेक्शन येत होते, जात होते. मी नुसताच त्यांच्याकडे निरीक्षकासारखा पाहत पुढे जात होतो. दुपारची वेळ, त्यात आठवड्यातला मधला वार असल्याने काहीच गर्दी नव्हती. मी आणि एक-दोन जण वगळता बाकी सगळे मॉलमध्ये काम करणारे युनिफॉर्म घातलेले कर्मचारी. तेवढ्यात माझ्या कानावर आवाज आला, ‘सर... प्लीज...सर... इकडे...’ आजूबाजूला पाहिलं. मला कळलं नाही, आपल्याला कुणी हाक मारतंय की दुसऱ्या कुणाला? पुन्हा तोच आवाज आला, ‘सर... इकडे उजव्या हाताला...’ मी पाहिलं - तर लिपस्टिक, कंगवे इत्यादी कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सच्या काउंटरपाशी एक मुलगी अवघडून उभी होती आणि दबक्या आवाजात हाक मारून मला बोलावत होती. मला काही कळेना. खरं तर मी तिचा टार्गेटेड ग्राहक नव्हतो, पण तरी कदाचित आई-बायको असं कुणासाठी काही तरी विकत घेईन या आशेने ती हाक मारत असावी असं वाटून तिच्याकडे गेलो. तिने काळ्या रंगाचा टी शर्ट आणि तशीच फॉर्मल पँट घातली होती. पायात उंच टाचांचे काळे बूट. आयशॅडो, किरमिजी रंगाची लिपस्टिक, फाउंडेशन – वगैरे मेकअप केला होता, ज्यामुळे तिचा काळसर चेहरा पांढुरका दिसत होता. बुटकीशी होती ती, पण ताठ उभी होती. केस काळ्या जाळीत घट्ट बांधले होते. चेहरा गोलसर होता. त्या काउंटरपाशी ती एकटीच होती. ती म्हणाली, ‘सर... प्लीज, हेल्प करता का मला?’ मी म्हणालो, ‘सॉरी. पण आमच्या घरी कुणी नाही वापरत फारसं हे सगळं.’ ती म्हणाली, ‘नाही सर, मला तशी काही हेल्प नकोय.’ ‘मग?’ मी विचारलं. तिने इकडेतिकडे पाहिलं आणि दबक्या आवाजात विचारलं, ‘सर, प्लीज तुम्ही दोन मिनिटं इथे थांबता का? मला ना टॉयलेटला जायचंय...’ मला काही कळेना? ही मुलगी मला का थांबायला सांगतेय?

मी विचारलं, ‘पण एवढ्या जणी इथे असताना...’ ‘सर, मॅनेजर बोंबलतो. आम्हाला टॉयलेटला जायला ठरलेल्या वेळेत परमिशन आहे. सगळ्या जणी चुगली लावायला तयार असतात. प्रमोशनसाठी. प्लीज, तुम्ही दोन मिनिटं थांबलात तर मी लगेच जाऊन येते. फक्त कोणी काही नेत नाहीय ना ते बघा, बाकी काही नको. एवढीच हेल्प करा सर.’ तिने काकुळतीला येऊन सांगितलं. मी म्हणालो, ‘पण हे अमानुष आहे. टॉयलेटला जाणं हा बेसिक हक्क आहे.’ ती म्हणाली, ‘हो सर... पण ऑप्शन सध्या तरी नाहीये माझ्याकडे. नोकरी हवीय मला. थांबताय ना तुम्ही सर...’ मी होकारार्थी मान डोलावताच ती हसली. काळ्या ढगांमधून सूर्यकिरणांची तिरीप येते तसं तिचं हास्य मेकअपच्या थरातून लखलखलं. ‘परफेक्ट दोन मिनिटांत येते सर. एक सेकंदही जास्त नाही लागणार, प्रॉमिस,’ असं म्हणून तिने काउंटरच्या इथे ठेवलेल्या सॅकमधून काहीतरी काढलं. खिशात ठेवलं आणि लगबगीने गेली. मला थोडी कल्पना आली. तिची बहुधा मासिक पाळी चालू असावी. किती साधी, नैसर्गिक आणि मूलभूत हक्काची गोष्ट आहे ही, तीही नाकारली जावी? काय बोलायचं आता? शोषण कुठे-किती ठिकाणी? माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. आता ती आली की तिला तक्रारच करायला सांगूया. त्या मॅनेजरची वाटच लावली पाहिजे वगैरे वगैरे... असे अनेक विचार डोक्यात येऊ लागले.

‘थँक्यू व्हेरी मच सर,’ असं म्हणून ती काउंटरपाशी गेली आणि मग ‘सॉरी, माझ्याकडे जे काउंटर आहे त्यात तुमच्या युजचं काहीच नाहीये. नाहीतर मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायला आवडलं असतं.’ पुन्हा छान हसली ती. मी म्हणालो, ‘पण तुम्ही कम्प्लेंट करायला पाहिजे. तुमचा बेसिक हक्क आहे हा.’ ती म्हणाली, ‘सर, आयडियली तुमचं बरोबर आहे, पण मॅनेजरच्या डोक्यावर आणखी एक कोणीतरी असतो. तो मॅनेजरला आमच्यासारखी वागणूक देतो. त्या माणसाला त्याचा वरचा कोणीतरी... आणि... ही चेन अशीच...’ मी विचारलं, ‘म्हणजे हे असंच चालू देणार तुम्ही? आज तुम्ही बोललात तर इतर जणींना...’ ती म्हणाली, ‘बरोबर आहे सर तुमचं. पण मला परवडणारं नाहीये. मी इथून जवळच असलेल्या वस्तीत राहते. माझं ग्रॅज्युएशन झालंय. पुढे शिकायचंय. पैसे साठवतेय त्यासाठी. ही नोकरी गेली तर...’ असं म्हणून ती थांबली. म्हणाली, ‘सॉरी, मला माहितेय बोललं पाहिजे पण...’ माझ्या आलं लक्षात तिचं म्हणणं. मी जरा शांत झालो. मी म्हणालो, ‘मी बोलू शकतो पण. मी ई-मेल करतो तुमच्या या मॉल चालवणाऱ्यांना. तुमचं नाव?’ तिने माझ्याकडे काही क्षण पाहिलं. तिचे डोळे डुचमळले. विचारांचे ढग आले आणि गेले. मग म्हणाली, ‘आकांक्षा… आकांक्षा चोपे.’ मी म्हणालो, ‘डोंट वरी, मी तुमचं नाव वगैरे नाही लिहिणार.’ ‘थँक्यू सर, कसंय ना सर या दिवसांत कधी कधी मला जास्त त्रास होतो. मघाशी तर पाठ-कंबर एवढी भरून आली होती ना की, न राहवून तुम्हाला हाक मारली. पुन्हा एकदा थँक्यू आणि सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला.’ मी म्हणालो, ‘अहो, यात काय त्रास? बेसिक माणुसकी झाली ही. बरं झालं तुम्ही हाक मारलीत ते. सहन किती करणार ना कुणी शेवटी!’ तिने सांगितलं, ‘खरं सांगू सर, जी दोन मिनिटं मिळाली ती मला दोन तासांसारखी वाटली. फ्रेश वाटलं. ठीकय सर, आता तुम्ही जा इथून. इतर जणी जाम लक्ष ठेवून असतात.’

मी जाता जाता मागे वळून म्हणालो, ‘आकांक्षा... ऑल द बेस्ट फॉर युअर फ्यूचर.’ ‘सर, मला इथे राहायचं नाहीये. मोठं काहीतरी करायचंय. आणि जर माझी स्वप्न पूर्ण झाली तर आज मला जो त्रास झालाय तो दुसऱ्यांना होणार नाही, याची काळजी घेईन. नक्की घेईन.’ मी म्हणालो, ‘गुड. व्हेरी गुड. अगेन ऑल द बेस्ट!’

प्रणव सखदेव संपर्क : ७६२०८८१४६३

बातम्या आणखी आहेत...