आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं पालकत्व:टेक्नोसॅव्ही मुलांचे हतबल पालक

संध्या सोंडे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आमचा मोहित टॅब, लॅपटॉप, मोबाइल इतका सहज हाताळतो की, मला पण त्याच्याकडून काही गोष्टी शिकाव्या लागतात.’ असं कौतुक करणारी मोहितची आई आज मात्र अगदी हतबल झाली होती. त्याला कारणही तसेच. अभ्यासासाठी घेतलेल्या टॅबवर अभ्यास सोडून व्हॉट्स अॅप, इन्स्टा आणि तासन‌् तास चालणारे गेम्स खेळणारा मोहित. बरं, टॅब हातातून काढून घ्यावा तर मोहित हातात जे येईल ते आदळआपट करून तोडून टाकी. त्याचे ऑनलाइन राहण्याचे वेड आता वाढत चाललेले होते. मोहितचं झाकोळून जाणारं वर्तमान आणि भविष्य आईला अस्वस्थ करत होतं. करावं तर काय करावं?

पालक सभेत ‘आपली मुले कशी आहेत?’ असं विचारल्यावर तर पालकांनीच; ‘स्मार्ट, टेक्नोसॅव्ही, बेशिस्त, अजिबात न ऐकणारी, आक्रमक, डिमांडिंग, शॉर्टमध्येे लिहिणारी, मोठ्यांना मान न देणारी’ अशी जंत्रीच मांडली. मग महत्त्वाचा, चिरंतन प्रश्न म्हणजे, ही नवीन पिढी अशी का वागते आहे? माझ्या मुलात ही वैशिष्ट्ये का निर्माण झाली? याचे त्यांच्या जीवनावर काय परिणाम होऊ घातलेत? त्याहीपेक्षा महत्त्वाचे या आपल्या मुलांना या दुष्टचक्रातून कसे बाहेर काढावे? असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. या समस्या काही अचानक आलेल्या नाहीत, तर ही एक प्रक्रिया आहे. समस्या निर्मिती, त्यामागील कारणे आणि त्यावरचे संभाव्य उपाय शोधण्याचा प्रयत्न आपण या सदरातून करणार आहोत. मार्च २०१९ मध्ये कोविडचं अभूतपूर्व संकट जगावर कोसळलं. कधी नव्हे ते लॉकडाऊन लागले. सारे जग ठप्प झाले. लॉकडाऊन, क्वारंटाइन, रेमडेसिविर, अँटीजन टेस्ट, पीपीई किट या शब्दांनी आपला भवताल व्यापला. शाळा बंद झाल्या. शाळेत, मैदानात बागडणारी मुले घराच्या चार भिंतीच्या आत बंद झाली. माणसाने माणसापासून लपून बसण्याचा हा काळ. त्यातूनच निर्माण झालेली असुरक्षितता. या कोविड काळात मुलांचे जग फारच बदलले. मैदानावर मित्रांमध्ये खेळणाऱ्या मुलांना हे सारं सहन करण्यापलीकडचे होते. दोन वर्षे शाळा बंद होत्या आणि सुरू होते ऑनलाइन शिक्षण. जेव्हा जगणे हाच संघर्ष होता, अगदी त्या परिस्थितीतही मुलांनी कसेही करून शिकावे, असा अट्टाहास करणारे आपणच. मोबाइल, टॅब हे आपणच तर दिले मुलांच्या हातात. कितीतरी मुलांनी, मोबाइल नसल्याामुळे ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही, या नैराश्यातून आत्महत्यासुद्धा केल्या. आता आपली मुले या गॅझेटमधून बाहेर यायला तयार नाहीत. हे सारेच हतबल करणारे अन् पालकत्वाचे आव्हान अधिक गडद करणारे आहे.

गुगल मीट, झूम, व्हॉट्स अॅपवर भरणारे वर्ग आता प्रत्यक्षात भरत आहेत, पण या बंदिस्त दोन वर्षांनी मुलांच्या भावनिक, मानसिक, शारीरिक आणि एकंदरीतच संपूर्ण विकास प्रक्रियेवर दूरगामी परिणाम केल्याचे आपल्याला दिसतेे. मुलांच्या वर्तन समस्या जशा निर्माण झाल्या आहेत, तसे त्यांचे भावनिक आरोग्यसुद्धा गर्तेत सापडले आहे. कोविडनंतरच्या काळात आता शाळा नियमित सुरू होऊन आठ महिने उलटून गेलेत, तरीही शिक्षण क्षेत्रातील आव्हाने- अडचणी दूर होण्याचे नाव घेत नाहीत. इयत्ता पहिलीतील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेता घेता थेट तिसरीत आले आहेत. माध्यमिक, उच्च शिक्षण क्षेत्रातही हीच परिस्थिती आहे. शिक्षणाच्या, अभ्यासातील क्षमतांमध्ये काही मुले एक ते दोन इयत्ता मागे असल्याचे दिसून येते. यातूनच दहावीला ऑफलाइन परीक्षा नको, असे म्हणत रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी आपण पाहिले, तर परीक्षा हॉलमध्ये पेपर कठीण आहे, म्हणून ढसाढसा रडणारी आपलीच मुले. परीक्षेतील मार्क्स म्हणजे यशस्वी जीवन का? केवळ डॉक्टर, इंजिनिअर म्हणजेच करिअर का?

आज असे कितीतरी गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे मुलांची अभ्यासातील हानी भरून काढण्यासाठी धडपडणारे शिक्षक, तर दुसरीकडे मुलांचा अध्ययन स्तर निश्चित करणारी सर्वेक्षणे. यातून निर्माण होणारा गोंधळ, ताणतणाव. त्यात भरडले जाणारे बालक, पालक आणि शिक्षक... या ताणतणावाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण या सदरातून करणार आहोत. विसाव्या शतकातील पालकांना एकविसाव्या शतकातील आपल्या स्मार्ट मुलांशी जुळवून घेताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे, तर इलेक्ट्रॉनिक गॅझेटशी सहज जुळवून घेणारी ही पिढी समाजाशी, कुटुंबात जुळवून घेताना काहीशी भांबावलेली, गोंधळलेली दिसत आहे. ही कोंडी फोडायचा प्रयत्न आपण करणार आहोत. एकुलती एक मुले असण्याच्या आजच्या वर्तमानात ‘माझे मूल सर्वगुणसंपन्न असावे’, असा अट्टाहास जवळपास सर्वच पालकांचा आहे. त्यामुळेच येणाऱ्या विविध अडचणी आपल्यासमोर आ वासून उभ्या आहेत. त्यावर मार्ग शोधतानाच, पालक-बालक-शिक्षक यांच्यातील दरी संवादाने, सकारात्मकतेने साधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

संपर्क : ९६७३७३४५३१

बातम्या आणखी आहेत...