आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबरभान:निरागसतेचा नाश

रवी आमलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सन १९८८ च्या नोव्हेंबरचा प्रारंभ. भारतात बोफोर्सचा गदारोळ सुरू होता. अनिल कपूर, माधुरी दीक्षित यांच्या ‘तेजाब’च्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. आणखी सात-आठ दिवसांनी तो चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता. तिकडं अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचं मतदान अवघ्या पाच दिवसांवर आलं होतं. थोरले जॉर्ज बुश डेमोक्रॅटिक पक्षाच्या मायकल ड्युकासिस यांना धूळ चारणार हे एव्हाना स्पष्ट झालं होतं. एकंदर सर्वत्र मोठी खळबळ सुरू होती. अशा त्या वातावरणात सायबर विश्वामध्ये एक वेगळंच वादळ येऊ घातलं होतं. असं वादळ, की ज्याने माहितीचं - तेव्हा इवलंसं असलेलं - महाजाल उलटंपालटं होणार होतं...

गुरुवारचा दिवस होता तो. तारीख ३ नोव्हेंबर. त्या दिवशी सकाळी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील संगणकशास्त्राचे सहायक प्राध्यापक युजीन स्पॅफोर्ड नेहमीप्रमाणं कॉफीचा मग घेऊन संगणकासमोर बसले. उठल्याबरोबर आलेले ई-मेल पाहण्याची त्यांची सवय. देशभरातील संशोधन संस्थांतून, मित्रमंडळींकडून रोज खंडीभर ई-मेल येत असत. आज मात्र एकही नवा मेल आला नव्हता. त्यांनी पुन्हा एकदा मेल सर्व्हरमध्ये लॉग-इन केले. पण, सर्व्हर थंडगार पडला होता. काहीच प्रतिसाद देत नव्हता. काहीतरी बिघडलंय, हे त्यांच्या लक्षात आलं. घाईनं आवरून ते विद्यापीठात गेले. पाहिलं, तर मेल सर्व्हरवर बॅकग्राउंडला भलते भलते प्रोग्राम सुरू. तसं होण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यांनी चौकशी केली आणि लक्षात आलं, की केवळ त्या विद्यापीठातीलच नव्हे, तर देशभरातील सगळ्याच संगणकांवर तो विचित्र प्रकार सुरू होता. इंटरनेटला जोडलेल्या सगळ्या संगणकांच्या सिस्टिम ओव्हरलोड झाल्या होत्या. हे नेमकं कशामुळं झालं होतं? तो होता इंटरनेटमध्ये शिरलेल्या पहिल्यावहिल्या कृमीचा, वर्मचा प्रताप...

संगणकाची तोंडओळख असणाऱ्यांनाही आता वर्म, व्हायरस (विषाणू) हे शब्द माहीत असतात. संगणकाच्या अन्य प्रोग्रामप्रमाणंच हेही प्रोग्रामच. कोणीतरी संगणकीय भाषेत लिहिलेले. फक्त त्यांचे स्वरूप वेगळे असते आणि हेतू वाईट. हे वर्म, व्हायरस या सगळ्यांची जातकुळी एकच. तिला म्हणतात ‘मालवेअर’. वर्म आणि व्हायरसमध्ये फरक इतकाच, की संगणकात व्हायरस पसरवण्यासाठी कोणीतरी बाहेरून कृती करावी लागते. म्हणजे विषाणूची बाधा असलेली एखादी फाइल, एखादी इमेज आपल्याकडे आली, तरी तिचा काही त्रास नाही. मात्र, ती आपण उघडली की झालं.. विषाणू आपल्या संगणकात शिरलाच! इंटरनेटवरून, व्हॉट्सॲप वा फेसबुकवरून आलेली प्रत्येक लिंक वा इमेज उघडून पाहणे हे आपले दैवदत्त कर्तव्यच असल्यासारखे वागू नये, हे जाणकार सांगतात ते त्यामुळंच. वर्म स्वत:च स्वत:च्या प्रति काढून आपला प्रसार करीत असतात. संगणक त्या नेटवर्कमध्ये असला म्हणजे त्यांचं काम भागतं. तर हा असाच वर्म अमेरिकेतील नेटवर्कमध्ये धुमाकूळ घालत होता...

ती बातमी लपून राहणार नव्हती. दुसऱ्या दिवशी माध्यमांकडून विद्यापीठांत विचारणा होऊ लागली. प्रा. युजीन स्पॅफोर्ड यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला त्याचा एक किस्सा सांगितला होता. त्यांना एका वार्ताहराचा फोन आला. तो विचारत होता, की यात आमच्या वाचकांनी काळजी करावी, असे काही नाही ना? म्हणजे लोकांमध्ये तर हा व्हायरस नाही ना पसरणार? ही तेव्हाची अमेरिकेतील संगणक साक्षरतेची गत! आपल्याकडं आजही याहून फारशी वेगळी अवस्था नाही. अमेरिकेत इंटरनेटमध्ये घुसलेल्या त्या वर्मचा निर्माता होता रॉबर्ट टी मॉरिस हा विद्यार्थी. कॉर्नेल विद्यापीठात संगणकशास्त्र शिकत होता तो. अत्यंत हुशार. बौद्धिक कुतूहल म्हणून त्याने हा वर्म ‘लिहिला’ होता. आता तो त्याच्याच नावाने, ‘आरटीएम’ वा ‘मॉरिस वर्म’ म्हणून ओळखला जातो. सुमारे १५ दिवस तो त्यावर काम करीत होता.

संगणकावर या वर्मद्वारे त्याने विविध प्रकारचे हल्ले योजिले होते. तेव्हाचे बहुतेक संगणक युनिक्स संचालित असत. त्यातील फिंगर नामक इंटरनेट सेवेवर तो हल्ला करीत असे. तेव्हाचे अनेक संगणक वापरकर्ते अगदी सोपा, कोणीही ओळखू शकेल असा पासवर्ड ठेवत असत. मॉरिस वर्म त्या संगणकातील वापरकर्त्याचा पासवर्ड शोधून काढत असे आणि मग त्या वापरकर्त्याचे खाते ज्या सर्व्हरवर असेल, त्या सर्व्हरमध्ये घुसत असे. हे सारे अत्यंत गुपचूप, कोणाच्याही नकळत करण्याची त्याची योजना होती. यातून संगणकाचा वेग कमी व्हावा, हे तर त्याच्या मनातही नव्हते. पण ते झाले. खरे तर कुठलीही हानी करावी हा त्याचा हेतू नव्हता. पण, हेतू शुद्ध असला म्हणून वाईट कृती काही चांगली ठरत नसते. या मॉरिस वर्ममुळे संगणकांचे तसे दृश्य नुकसान काहीच झाले नाही. कारण हा वर्म सिस्टिमवरील कामाचा बोजा वाढवून ती ठप्प करण्याशिवाय अन्य काही करीत नव्हता. तरीही ते संगणक सुरू करण्यासाठी, त्या वर्मवर तोडगा काढण्यासाठी अनेक तज्ज्ञांचे कितीतरी तास वाया गेलेच. परिणामी आर्थिक नुकसानही झाले. पण - ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या शब्दांत सांगायचे तर - त्याहीपेक्षा अधिक हानी झाली, ती इंटरनेटच्या निरागसतेची...

इंटरनेट नुकतेच रांगू लागले होते तेव्हाचा तो काळ. एक लाख संगणकही तेव्हा त्या महाजालास जोडलेले नव्हते. तो छोटासा गटच होता नेटधारकांचा. ते सगळेच काही अगदी बंधुभावाने, एकमेकांवरील विश्वासाने त्या सायबर-समाजात नांदत होते असे नव्हे. पण, प्रा. स्पॅफोर्ड सांगतात त्याप्रमाणे, संगणक व्यवस्थेचा योग्य वापर करावा, त्या व्यवस्थेस स्थैर्य असावे, अशी एक भावना त्यांच्यात होती. व्हायरस हल्ले रोखण्यासाठीचा ‘फायरवॉल’ नामक प्रकारच नव्हता तेव्हा. कोणी संगणकांत घुसून काही गुन्हे करील, असं कोणालाही वाटत नव्हतं.

त्यामुळं सुरक्षेला अग्रक्रमच नव्हता. मॉरिस वर्मच्या हल्ल्याने ते सारे बदलले. यापूर्वी असे वर्म वा व्हायरस जन्माला आले नव्हते असे नव्हे. १९७१ मध्ये रेथिऑन बीबीएन या कंपनीतील बॉब थॉमस या संगणकतज्ज्ञाने तयार केलेला ‘क्रीपर प्रोग्राम’ हा पहिला व्हायरस मानला जातो. इंटरनेटचा पूर्वावतार असलेल्या ‘अर्पानेट’मध्ये तो सोडण्यात आला होता. मात्र, तो हानिकारक नव्हता. यानंतर १९७४ मध्ये आलेला रॅबिट व्हायरस हा मात्र संगणक ‘क्रॅश’ करीत असे. १९८६ मध्ये असाच एक व्हायरस आला होता. ‘ब्रायन’ हे त्याचं नाव. तो एमएस-डॉसमध्ये धुमाकूळ घालायचा. फ्लॉपी डिस्कच्या बूट सेक्टरमध्ये घुसून संगणक सुरूच होऊ द्यायचा नाही. पाकिस्तानातल्या दोघा भावंडांनी तो बनवला होता. पण, त्यांची व्याप्ती कमी होती. मॉरिस वर्मने तेव्हाच्या इंटरनेटमध्ये जो गोंधळ घातला, तो अभूतपूर्व होता. आज तोच इंटरनेटमधील पहिला व्हायरस किंवा वर्म मानला जातो. काही दिवसांतच त्यावर तोडगा काढण्यात आला. त्याचा निर्माता अमेरिकेने १९८६ मध्ये केलेल्या ‘कॉम्प्युटर फ्रॉड अँड ॲब्यूज’ कायद्यान्वये शिक्षा होणारा पहिला हॅकर ठरला. पण, त्याने सायबर विश्वातील निरासगतेला नख लावले ते लावलेच...

बातम्या आणखी आहेत...