आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:विनाशकारकता ते विश्वासार्हता

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नूतन अध्यक्ष जो बायडेन यांचे शपथविधी सोहळ्यातील भाषण व तातडीने घेतलेल्या ७ निर्णयांतून अमेरिकेला पुढच्या चार वर्षांत कोणत्या दिशेने न्यायचे आहे, याचे स्पष्ट संकेत मिळतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेताना ‘अमेरिका फर्स्ट’ असा उल्लेख केला होता. त्या आधारे केलेल्या चार वर्षांच्या कारभारात अमेरिकेमध्ये वांशिक विद्वेष जोराने उफाळून आला. त्यामुळे अमेरिकेतील नागरी जीवन कमालीचे परस्परांमधील संशयाचे बनले. तो संशय दूर व्हावा या उद्देशाने बायडेन यांनी ‘अमेरिका टुगेदर’ असा उल्लेख केला. त्यांच्या भाषणातील एक वाक्य सरकारच्या धोरणाची दिशा स्पष्ट करणारे आहे. ‘‘राजकारण करताना वाटेत येणाऱ्या विरोधातील प्रत्येक गोष्टीला आग लावत विनाशच घडवला पाहिजे, असे नाही. मतभेदाचा प्रत्येक मुद्दा हा युद्धाचे कारण बनू नये.’’ हे म्हणताना बायडेन यांनी ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. समारोपाच्या भाषणात ट्रम्प यांनी बायडेन यांचे नाव घेतले नव्हते, पण बायडेन यांनी टाळलेल्या नामोल्लेखाचे कोणाला विशेष वाटणार नाही. असहमती असलेल्या बायडेनसहित स्वकीयांनाही ट्रम्प यांनी झोडपले होते. “अमेरिकेमध्ये सध्या एवढे अविश्वासाचे वातावरण पसरले आहे की एकता, समतेसंदर्भात बोलणे मूर्खपणाचे वाटेल’, असे नव्या अध्यक्षांना म्हणावे लागले. दहशतीच्या, भीतीच्या वातावरणातील शपधविधी हा अमेरिकेसाठी एेतिहासिक व आव्हानांचा सोहळा होता. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली आणीबाणीसारखी स्थिती, ढासळती आर्थिक व्यवस्था, बेरोजगारी ही आव्हाने नव्या सरकारसमोर आहेतच, पण त्याशिवाय देशात वाढत असलेला वंशवाद, जागतिक राजकीय घडामोडींत अमेरिकेची भूमिका याबाबतही बायडेन यांना निर्णय घ्यावे लागतील. शपधविधीनंतर लगेचच सात महत्त्वाच्या आदेशांवर सही करत त्यांनी त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली. महामारी, हवामान बदलाचा पॅरिस करार, १३ मुस्लिम देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी उठवणे, मेक्सिकोच्या सीमेवरील भिंतीचे बांधकाम थांबवणे असे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. देशांतर्गत स्थिती व ट्रम्प यांच्यामुळे जागतिक स्तरावर अमेरिकेबद्दल निर्माण झालेले अविश्वासार्हतेचे वातावरण या पार्श्वभूमीवर त्यांची वाटचाल सोपी नक्कीच नाही. भारतासाठी बायडेन व उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा कारभार कसा असेल, हे स्पष्ट होण्यासाठी “थांबा आणि पाहा’ अशी स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...