आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतवचने आणि वर्तमान:निस्सीम भक्ती प्रिय असे ईश्वराला...

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्रतवैकल्यातील सुलभीकरण हा आपला मुद्दा आहे. काही जण प्रसंगी कठोर वाटावेत असे व्रत करतात. या पार्श्वभूमीवर महात्मा बसवण्णा, सिद्धरामेश्वर, अक्कमहादेवी आणि मराठी संतांनी ईश्वरी उपासनेचा सांगितलेला मार्ग अधिक सोपा असल्याचे सहज लक्षात येईल.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सोहळा, पंढरीची वारी नुकतीच संपली. वारीचा उत्साह संपण्याआतच श्रावण सुरू होतो. मराठीच नव्हे भारतीय परंपरेत श्रावण महिना सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्यात केलेले विधी-पूजा अधिक लाभप्रद असल्याची धारणा आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या सण व उत्सवांची संख्याही मोठी आहे. उत्सवातील वैविध्यही उल्लेखनीय आहेत. म्हणूनच श्रावण महिन्याला व्रतांचा राजा म्हटलं जातं. नागपंचमी, मंगळागौर, कृष्ण जन्माष्टमी, नारळी पौर्णिमा-राखी पौर्णिमा हे महत्त्वाचे सण श्रावणात येतात. त्यामुळे साहजिकच उपासनेची, पूजेची जय्यत तयारी केली जाते. पूजेचे साहित्य, हार-फुलं बाजारातून आणली जातात. पूजा मनासारखी, षोडशोपचार होण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. अतिशय तन्मयतेने पूजा करणारी मंडळी मोठ्या संख्येत आहेत. देवीदेवतांच्या फुलं आणि फळांच्या आवडीनिवडीच्या धारणा समाजात घट्ट रुजल्या आहेत. गणेशाला जास्वंदाची फुलं सर्वात प्रिय आहेत. महादेवाला बेल सर्वात प्रिय तर महालक्ष्मीला कमळाची फुलं, विठ्ठलाला तुळस प्रिय आहे. पार्वतीला श्वेतवर्णीय (पांढरी) फुलं अधिक भावतात. शास्त्रामध्ये बेलपत्राचं खूप महत्त्व आहे. भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहेत. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र अर्पण केले जातात. एकदा बेलपत्र समर्पित केल्यानंतर ते पुन्हा धुऊन समर्पित केले जाऊ शकते. बेल शिळं होत नाही. तीच कथा कमळाची. कमळाच्या फुलांचे पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे. महालक्ष्मी, गौरी, भगवती मातेसह देवींना कमळ अत्यंत प्रिय मानले जाते. बेलाप्रमाणेच कमळाचे फूल कधीही शिळे मानले जात नाही. तुळशीची पाने, बेलपत्र आणि गंगाजल हे कधीच शिळे होत नाही. पूजेमध्ये आपण जुनी तुळशीची पानेही वापरू शकतो.

व्रतवैकल्यातील सुलभीकरण हा आपला मुद्दा आहे. काही जण प्रसंगी कठोर वाटावेत असे व्रत करतात. या पार्श्वभूमीवर महात्मा बसवण्णा, सिद्धरामेश्वर, अक्कमहादेवी आणि मराठी संतांनी ईश्वरी उपासनेचा सांगितलेला मार्ग अधिक सोपा असल्याचे सहज लक्षात येईल. कोणत्याही स्वरूपातील बाह्य अवडंबर न करता, कठोर व्रत न करता मनापासून भक्ती केल्यास ईश्वरी कृपा होत असल्याचे संतांनी म्हटले आहे. शिव नादप्रिय नाही, तो वेदप्रिय नाही, तो केवळ भक्तिप्रिय आहे. निस्सीम भक्ती केल्यास तो सहज प्रसन्न होतो, अशा शब्दांत बसवण्णांनी भक्तीची थोरवी गायली आहे. व्रतवैकल्यातील कडक नियमांचा समाचार घेत वैराग्यज्योती अक्कमहादेवी एका वचनात म्हणतात, ‘मनाचा निग्रह करून, शरीराला त्रास देऊन, इंद्रियांना वेठीस धरून, भावभावनांची कोंडी करून, अनामिक दडपण घेऊन आपली उपासना कशी होईल चन्न मल्लिकार्जुन राया?’अक्कमहादेवी यांच्या वचनातील हाच भाव सांगताना एकनाथ महाराज म्हणतात,देह सांडावा ना मांडावा । येणे परमार्थचि साधावा । जेणे देही वाढे भावो । देही दिसतसे देवो ।

परमेश्वर कृपेने मिळालेल्या देहास त्रास देऊ नये. त्याचा छळ करू नये. शिवाय त्याचा अहंकारही मानू नये. हा नरदेह परमार्थ साधण्याचे साधन आहे, असे समजून जीवन परमेश्वराच्या भक्तिभावात घालवावे. जसजसा भक्तिभाव वाढत जातो तसतसा देहात देव प्रकट होतो, अशी ग्वाहीच नाथबाबा देतात. त्याच वेळी भक्ती कशी करावी याबाबतही नाथबाबा मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, नित्य-नैमित्तिक कर्मे आचरावी । तिही ते पावावी चित्तशुद्धी । चित्त स्थिर व्हाया करी उपासना । भजे नारायणा एका भावे ।

नित्य, नैमित्तिक कर्मे सद्भावनेने आचरावी, कारण त्यामुळे चित्तशुद्धी होते. चित्त स्थिर होण्यासाठी नारायणाची अनन्यभावे उपासना केल्याने विवेक व वैराग्याची प्राप्ती होते, असा विश्वास एकनाथ महाराजांनी व्यक्त केला आहे. भक्तीचे जे महत्त्व आहे ते मुळात भजन-पूजनात नसून भक्ताच्या भावात आहे. ईश्वराची प्राप्ती व्हावी हेच उद्दिष्ट निष्काम भक्तीत असते. त्यामुळे त्याला त्याचे साध्य प्राप्त होते. यामुळेच विविध उपचारांहूनही भाव महत्त्वाचा. देव फक्त भावाचा भुकेला आहे, असे तुकोबा म्हणतात. कर्मकांडाच्या पलीकडे मनातील भाव म्हणजे निस्सीम भक्ती महत्त्वाची असल्याचे संतांनी म्हटले आहे.

चन्नवीर भद्रेश्वरमठ संपर्क : ९९२२२४११३१

बातम्या आणखी आहेत...