आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रिय मित्र-मैत्रिणींनो, फेसबुकवर नेहमी वेगवेगळे विषय चर्चिले जातात. वेगवेगळ्या काळात वेगवेगळे हॅशटॅग व्हायरल होत असतात. पण गेली कित्येक वर्षे कोणताही हॅशटॅग न वापरता फेबुवर सर्वाधिक चर्चिला गेलेला प्रश्न ‘जे—1 झाले का?’ हा असेल, ह्यात तिळमात्र शंका नाही. काही दिवसांनी अशी काही बातमी आपल्या वाचनात येऊ शकेल -
‘अमेरिकेतील XXX विद्यापीठाच्या सामाजिक अध्ययन विभागाने केलेल्या एका अध्ययनात असे आढळून आले आहे की भारतीय पुरुषांच्या मते स्त्रियांचे भोजन ही जगातील सर्वाधिक महत्त्वाची समस्या आहे. रात्री झोपण्यापूर्वी फेसबुकवरील प्रत्येक परिचित स्त्रीला ‘जेवलीस का?’ असे मायेने विचारले नाही, तर इंडियन पिनल कोडच्या एखाद्या कलमाखाली आपल्याला शिक्षा होऊ शकेल, किंवा मृत्यूनंतर स्त्रिया नसणाऱ्या एखाद्या नरकात त्यांची पाठवणी करण्यात येईल, अशी भीती भारतीय पुरुषांना वाटत असावी. एखाद्या स्त्रीशी फेसबुकवरून मैत्री झाल्यावर ५० सेकंद ते ५ मिनिटे कालावधीच्या आत ९५% भारतीय पुरुषांनी स्त्रियांना हाच प्रश्न विचारल्याचे, तसेच प्रश्न विचारण्याची वेळ व भारतातील जेवणाची वेळ यांचा परस्परसंबंध नसल्याचेही अभ्यासकांना आढळले. आपल्या फेसबुक मैत्रिणींना हा प्रश्न विचारणाऱ्यांपैकी ९७.६५% पुरुषांनी “हा प्रश्न तुम्ही आपल्या घरातील स्त्रियांना विचारता का?” ह्या प्रश्नावर आश्चर्य व्यक्त केले. वय वर्षे १४ ते ७५ ह्या गटातील ८७% हून अधिक स्त्रियांनी ‘हा प्रश्न समोरून आला नाही, तर आम्हाला चुकचुकल्यासारखे वाटते’ असेही सांगितले. मात्र २३.४५% स्त्रियांनी असे तोंडदेखले विचारण्याऐवजी ह्या पुरुषांनी आम्हाला प्रत्यक्ष खाऊ घातले (स्वतः स्वैपाक केल्यास अधिक उत्तम) तर आम्हाला कैक पटीने बरे वाटेल, असे मत व्यक्त केले.
पुरुषपणाच्या कोंडीविषयी चालणारी चर्चा ह्या ‘जे-1’वर कशी काय आली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण सामाजिक माध्यमातून बोकाळलेली ही समस्या (किंवा वैद्यकीय परिभाषेत सिंड्रोम – लक्षणसमूह) हे एका सामजिक व्याधीचे बाह्य दृश्यरूप आहे, तिचे नाव - पुरुषपणाची कोंडी. स्त्री-पुरुष आकर्षण ही नैसर्गिक बाब आहे. परस्परांशी संवाद साधावासा वाटणे, भिन्नलिंगी व्यक्तीच्या दृष्टीने आपण महत्त्वाचे असणे ह्या बाबी कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांना हव्या-हव्याशा वाटतात. समाज जेवढा उन्नत, त्यातील व्यक्ती जितक्या निकोप विचाराच्या व संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या, तितके त्यांच्या नात्यातील, मैत्रीतील रंग अधिक गहिरे. त्यामुळे बहुसंख्य संपन्न-सुसंस्कृत समाजात स्त्री-पुरुष मैत्री आवड-निवड, छंद, अभ्यास, विचार-कला-संस्कृती ह्यांच्या देवाणघेवाणीतून सहज फुलत जाते, तिच्यात कुणालाही वावगे वाटत नाही. पण आपला समाज पडला दांभिक. येथे स्त्री-पुरुष नात्यावर बंधने-निषेध-नकार ह्यांचे खडे पहारे आहेत. मात्र जागतिकीकरणानंतर एकीकडे नैतिक बंधने सैलावली, तर दुसरीकडे तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे मोबाइल नावाचा मुक्तिदाता प्रत्येकाच्या मुठीत अलगद येऊन विसावला. (मात्र दांभिकपणा संपला नाही.) आता कुणाच्याही नजरेत न येता जगाच्या पाठीवरील कोणत्याही स्त्री-पुरुषाशी संवाद करणे सर्वांना शक्य झाले. पुरुषपणाच्या कोंडीत अडकलेल्या पुरुषाच्या दोन गोच्या असतात – पुरुषीपणाच्या साच्यात अडकल्यामुळे त्याच्यात संवाद कौशल्ये, भावना व्यक्त करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे ही सॉफ्ट स्किल्स मुळातच कमी असतात. त्यामुळे कितीही आव आणला तरी स्त्रियांशी बोलताना त्याची तंतरते. दुसरीकडे पुरुषी श्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून बाहेर न पडल्यामुळे त्याला स्त्रियांवर हक्क गाजवणे, त्यांना गृहीत धरणे ह्या गोष्टी स्वाभाविक वाटत असतात. शिवाय आपली मर्दानगी क्षणोक्षणी सिद्ध करणेही त्याला आवश्यक वाटते. समोरील स्त्रीची आवड, इच्छा, मन:स्थिती ह्या कशाचाच विचार करणे त्यांना आवश्यक वाटत नाही किंवा जमत नाही. अशा वेळी आइस ब्रेकिंग करण्यासाठी, बोलणे सुरू करण्यासाठी त्याला जेवणासारख्या अगदी प्राथमिक बाबीचा आधार घ्यावा लागतो.
खूपदा अशा संभाषणातून सुरू झालेला संवाद फारसा पुढे सरकत नाही. मैत्रिणीच्या रूपाची तारीफ करून तो वळणा-आडवळणाने किंवा थेटपणे शारीर आकर्षणाच्या कक्षेत जातो, स्थिरावतो किंवा तुटतो. प्रश्न त्या दोन व्यक्तींनी काय करावे हा नाही, तर स्त्री-पुरुष नात्यातील असंख्य रंगछटा ओळखता न येणे, त्याला एकाच साच्यात बसवणे ही सारी पुरुषपणाच्या कोंडीची रूपे आहेत, हे मला सांगायचे आहे. तुम्हाला आठवते, मागच्या पत्रात मी विचारले होते की पुरुषांनी गृहविज्ञानाचे धडे घेणे, स्वैपाक किंवा बालसंगोपन एन्जॉय करायला शिकणे हा पुरुषपणाची कोंडी फोडण्याचा मार्ग असू शकेल का? उत्तरादाखल फोन करणाऱ्या एका गृहस्थांनी कबूल केले की त्यांना घरकामात मदत करायला आवडते, स्वैपाकही करता येतो. पण लोक काय म्हणतील ह्या भीतीतून त्यांना अजून बाहेर पडता येत नाही. घराच्या लोकांनी टीका केली तरी त्याकडे दुर्लक्ष करून मजेत आपले काम करत राहणे त्यांना जमत नाही. त्यामुळे कामाचा आनंद घेणे त्यांना अजून जमत नाही. त्यांना ह्या मर्यादेची जाणीव आहे, ह्यातच सारे काही आले. त्यांनी थोडा नेटाने प्रयत्न केला, घराच्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर ते नक्की कोंडीतून बाहेर पडतील. आपल्या कामातून स्वतः आनंद घेऊन इतरांनाही आनंदित करतील.
एखादा पुरुष, ज्याला पुरुष असण्याबद्दल गर्व नाही व न्यूनगंडही नाही, तो सहजतेने पुरुषांप्रमाणे स्त्रियांशीही मैत्री करू शकेल. तो स्त्रीला माणूस मानेल. तो तिच्या मानसिकतेचा विचार करेल. तिने मैत्री केली तरी तिला जबाबदारीच्या, वेळेच्या मर्यादा आहेत, आपल्या मेसेजला उत्तर देण्याव्यतिरिक्त तिला असंख्य इतर कामे आहेत ह्याचे भान त्याला असेल. असा पुरुष त्याच्या मैत्रिणीशी तिचे छंद, घर किंवा कार्यालयातील जबाबदाऱ्या, नव्या रेसिपी, मुलांचा अभ्यास अशा कोणत्याही गोष्टीवर बोलू शकेल. तिच्या जेवणावर नजर ठेवण्याची गरज त्याला भासणार नाही. हे जोवर मोठ्या प्रमाणावर घडत नाही, तोवर ‘जे-1 झाले का?’ ह्या प्रश्नाचे फेसबुकवरील अव्वल स्थान कायम राहील.
तुम्हा सर्वांचा मित्र रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ संपर्क : ९८३३३४६५३४
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.