आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:विखार, फूत्कार आणि चीत्कार..!

हेमंत देसाई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय बोलू नये हे ज्याला कळते तो सुज्ञ माणूस, असे म्हटले जाते. हल्ली मात्र सुज्ञांच्या या लक्षणाचे विस्मरण होत असून सोशल मीडिया आहे म्हणून प्रत्येक विषयावर मत व्यक्त केलेच पहिजे आणि तोंड आहे म्हणून बोललेच पाहिजे असे मानणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून सहा वर्षांसाठी दूर करण्यात आले, तर भाजपचे माध्यम प्रभारी नवीनकुमार जिंदल यांनी समाजमाध्यमातून धार्मिक भावना दुखावणारे मत व्यक्त केल्यामुळे त्यांचे प्राथमिक पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ‘आम्ही कोणत्याही विचारसरणीचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या भूमिकेच्या विरोधात आहोत. भाजप अशा लोकांना आणि त्यांच्या विचारांना प्रोत्साहन देत नाही. आम्ही प्रत्येक धर्माचा सन्मान करतो. कोणत्याही धर्मातील पूजनीय व्यक्तींचा अपमान आम्हाला मान्य नाही,’ असा खुलासा भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी केला. मात्र, भाजप प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवली हे वास्तव आहे. ज्या पद्धतीने भाजपचे काम सुरू आहे ते सरसंघचालक मोहन भागवत यांना अपेक्षित होते काय, असा रोकडा सवाल औरंगाबादेतील स्वाभिमान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. कतार, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इराण अशा अनेक देशांनी भारताच्या राजदूतांना अथवा उच्चायुक्तांना बोलावून शर्मा आणि जिंदल यांच्या वक्तव्यांबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर काही देशांत भारतीय मालावर बहिष्कार टाकण्याच्या घोषणा झाल्या. कचराकुंडीच्या बाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आल्याची भारतीयांना खाली मान घालावी लागणारी घटनाही घडली. २५ मे रोजी नूपुर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कानपूरमध्ये दंगल झाली तरीही काही दिवस केंद्राने कोणतीही कारवाई केली नाही. दुसरीकडे, जिंदल यांच्या टिप्पणीनंतरही त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संघ परिवारातील एका महत्त्वाच्या व्यक्तीने उपस्थिती लावली होती. आखाती देशांनी क्रोध व्यक्त केला तेव्हा कुठे त्याचे आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय परिणाम लक्षात घेऊन सरकारला कारवाई करावीशी वाटली. पक्षाच्या दोन साधारण प्रवक्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय जगतात माफी मागण्याचा प्रसंग येऊन भारतासारख्या महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशाची अब्रू गेली. एवढे रामायण होऊनही विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांनी नूपुर यांच्या भूमिकेचे समर्थनच केले...

अरब, मुस्लिमबहुल आणि पश्चिमी देशांतून यापूर्वीही गोरक्षा, लव्ह जिहाद, घरवापसी आदी मुद्द्यांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. चीनमध्ये विगुर मुस्लिमांचा छळ होताना आखाती राष्ट्रे गप्प का, असा सवाल केला जातो. परंतु, चीनची आर्थिक आणि लष्करी ताकद प्रचंड असून छळवणुकीबाबत आपण चीनशी स्पर्धा करण्याचे काही एक कारण नाही. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी कित्येकदा खोट्यानाट्या आणि जहरी गोष्टी समाजमाध्यमातून व्हायरल केल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. एवढेच नव्हे, तर बंगळुरूमधील दंगलीच्या संबंधातील एका टीव्ही चर्चेतील पात्रा यांच्या अतिरेकी टीकेनंतर काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. अलीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हात छाटण्याची भाषा करणाऱ्या डॉ. अनिल बोंडे यांना भाजपने राज्यसभेत पाठवले आहे, तर शिवसेना कार्यकर्त्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या घरात घुसून त्यांन बदडण्याची धमकी देणाऱ्या उमा खापरे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. पण दुसरीकडे मात्र सर्व धर्मांचा आदर केल्याचा देखावा केला जातो.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘सब का साथ, सब का विकास’ यावर आपण भर देणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेत पुढे त्यांनी ‘सब का विश्वास’ची भर टाकली. मुस्लिमांचा विश्वास संपादन करू, असे त्यांनी सूचित केले होते. हळूहळू सलमा किंवा सीता या दोघींनाही उज्ज्वला योजना असो वा अन्य कल्याणकारी योजना असोत, त्यांचा सारखाच फायदा मिळेल असे सांगितले जाऊ लागले. मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि मंत्र्यांनी ठिकठिकाणी फिरून आपण कोणती कामे केली हे लोकांपर्यंत जाऊन सांगितले. परंतु, पक्षाच्या वाचाळ नेत्यांमुळे, विशेषतः नूपुर शर्मा यांच्या गैरउद्गारांमुळे या सगळ्यावर बोळा फिरला. हे पक्षातील फ्रिंज एलिमेंट आहे, असा सरकार आणि पक्षातर्फे दावा करण्यात आला. मात्र, पक्षाची भूमिका मांडणाऱ्यांना ‘फ्रिंज एलिमेंट’ कसे म्हणणार? धर्मभावना दुखावल्याप्रकरणी फ्रान्समधील ‘चार्ली हेब्दो’ या मासिकाचा जगभरातून धिक्कार झाला होता. ‘द सॅटनिक व्हर्सेस’ ही कादंबरी लिहिणाऱ्या सलमान रश्दींविरुद्ध फतवा जाहीर करण्यात आला होता. परंतु, या दोन्ही उदाहरणांची तुलना नूपुर यांच्या वक्तव्याशी होऊ शकत नाही. याचे कारण त्या ना कुठल्या मासिकाच्या संपादक आहेत, ना कादंबरीकार. त्या भारतातील सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. भाजप सरकार अल्पसंख्याकांचे हक्क डावलत असल्याचा आरोप होत असतो. अशा वेळी त्यांच्याकडून या प्रकारच्या वर्तनाची बिलकूल अपेक्षा नव्हती. शिवाय, फ्रान्स सरकार अथवा रश्दींकडे ज्या दोन देशांचे (ब्रिटन आणि अमेरिका) नागरिकत्व आहे त्या दोन देशांविरुद्ध अल्पसंख्याकांवर अत्याचार केल्याचे आरोप झालेले नाहीत. नूपुर शर्मा आणि नवीन जिंदल यांना इतरांप्रमाणेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु, द्वेषपूर्ण वक्तव्य करणे अथवा धार्मिक भावना भडकावण्याचा त्यांना अधिकार नाही. तसे झाल्यास त्याची कायदेशीर वा सामाजिक प्रतिक्रिया उमटू शकते हे ध्यानात ठेवले पाहिजे. मात्र याचा अर्थ कोणी त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत असेल, तर ते अजिबात स्वीकारार्ह नाही.

वाजपेयी-अडवाणी काळातला भाजप आणि मोदी-शहा यांचा भाजप यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. वाजपेयी हे उत्तम कम्युनिकेटर होते आणि हिंदुत्ववादी असूनही त्यांच्या सहिष्णू आणि मानवतावादी दृष्टिकोनामुळे भाजपशी कोणताही संबंध नसलेल्या नेत्यांना व सर्वसामान्य जनतेला ते ‘आपले’ वाटत असत. बाबरी मशिदीच्या पतनानंतर आम्ही कसा पराक्रम केला हे सांगण्याऐवजी वाजपेयींनी या कृत्याबद्दल तत्काळ खेद प्रकट केला. तसेच गुजरात दंगलीनंतर मोदींनी राजधर्म पाळावा, असे जाहीर आवाहन त्यांनी केले होते. दुसरीकडे, अलीकडच्या भाजपने २०१९ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना तिकीट दिले. मोदी सरकार स्वच्छ भारत अभियानाच्या प्रचारात गांधीजींच्या चष्म्याच्या प्रतिमेचा वापर करत असताना साध्वी प्रज्ञा मात्र नथुराम गोडसेचा उदो उदो करत होत्या. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत अमित शहा गरजले, की भाजपचा विजय झाला नाही तर पाकिस्तानात फटाके फुटतील. २०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन करणाऱ्यांची ओळख त्यांच्या कपड्यांवरून पटू शकते, असे मत मोदी यांनी व्यक्त केले होते. पूजा पांडे या हिंदुत्ववादी स्त्रीने गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडण्याचा प्रयोग करून दाखवला, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी सवलतींचा फायदा ‘अब्बाजान’ म्हणणारेच उठवत असतात, अशी टिप्पणी केली होती. मुस्लिमांविरुद्ध वाटेल ती भाषा वापरणाऱ्या साक्षी महाराजांना भाजपने पुन्हा तिकीट दिले. हरिद्वारला झालेल्या धर्मसंसदेत मुस्लिम समुदायाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले तरीही पंतप्रधान वा गृहमंत्री त्याबद्दल एक शब्द बोलले नाहीत. एकूणातच वरिष्ठ नेत्यांप्रमाणे आवेश दाखवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते मात्र पातळी सोडत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. आताही नूपुर यांच्या निरर्गल वक्तव्यानंतर त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असा लगेच आग्रह धरण्यात आला नाही. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यातही दिरंगाई झाली.

हिंदुत्वाच्या नावाखाली सहिष्णुततेचा नव्हे, तर हिंसकतेचा वा आक्रमकतेचा पुरस्कार केला जाऊ लागल्यामुळे विदेशात त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्याच. त्यामुळे सदैव बेतालपणे बोलणाऱ्या भाजप खासदार तेजस्वी सूर्य यांचे ऑस्ट्रेलियात आयोजित केलेले व्याख्यान ऐनवेळी रद्द करण्यात आले. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना व्यासपीठ देण्यास ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाने नकार दिला. परिवारातील अनेक संघटना धर्माच्या नावाखाली धिंगाणा घालत असतील आणि सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असेल तर भारत विश्वगुरू कसा होणार? युरोपातील काही अति उजव्या पक्षांनी मर्यादा ओलांडली तेव्हा जनतेने त्यांना नाकारले. जगभर मौलवी आणि कट्टरपंथी मुस्लिम संघटना या एकतर बाजूला पडल्या आहेत वा जगात त्यांच्याकडे अनादराने पाहिले जाते. मग आपल्यालाही तशा मार्गावर जायचे आहे काय?

महाराष्ट्रातही भाजपचे काही नेते आणि प्रवक्ते बेफामपणे बोलत असतात. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माफिया सरकार’ असा रोजच उल्लेख करणारे किरीट सोमय्या असोत किंवा आदित्य ठाकरे यांची व्यक्तिगत निंदानालस्ती करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे अथवा त्यांची दोन मुले किंवा शरद पवार यांच्यावर पातळी सोडून बोलणारे गोपीचंद पडळकर असोत.. त्यांना कानपिचक्या दिल्या गेल्या नाहीत. ‘खासदार सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा’ असे म्हणणारे किंवा ‘मसणात जा’ असे उद्गार काढणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना माफी मागावी लागली. परंतु माफी मागतानाही, आपण ग्रामीण शैलीत बोललो, असे न पटणारे समर्थन त्यांनी केले. केवळ भाजपच नव्हे, तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ताळतंत्र सोडून बोलण्याची वहिवाटच निर्माण केली आहे. मुळात राजकीय पक्ष प्रवक्ते नेमताना पुरेसा विचारच होत नाही. ज्याला देण्यासाठी कुठलेही पद उरलेले नाही, त्याला प्रवक्ता म्हणून नेमायचे, असेही घडते. काही जण चापलुसी करून प्रवक्तेपद मिळवतात. परंतु, त्यांना देशाचा वा पक्षांचा राजकीय-सामाजिक इतिहास माहीत नसतो वा कोणत्याही विषयांचे ज्ञान नसते. सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांना तर तत्काळ मुजोरी येते. टीव्हीवरच्या चर्चेत बेलगामपणे बोलताना दुसऱ्याला बोलूही न देणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्या संजू वर्मा या त्याचे एक उदाहरण. भाजपचे दुसरे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी तर टीव्ही चर्चेत प्रत्यक्ष हाणामारीच केली होती. चर्चेत भाग घेण्यापूर्वी काही तयारी करावी, असे कोणालाही वाटत नाही. आपण नळावर भांडण्यासाठी आलो आहोत, असा कही जणांचा समज असतो. भाजपचे काही प्रवक्ते सर्वज्ञ असल्याच्या आविर्भावात इतरांबद्दल तुच्छतेचा दृष्टिकोन बाळगताना दिसतात. मी स्वतः अनेक वर्षे राजकीय विश्लेषक म्हणून चर्चेत जातो तेव्हा अनेकदा मला बोलू दिले जात नाही. कारण मी त्यांना अडचणीत आणतो. कधी कधी मलाच प्रवक्ते, ‘या विषयावर आमच्या पक्षाची काय भूमिका आहे?’ असेही विचारतात... असो.

आपल्या राजकीय व्यवस्थेत मूल्ये, व्यवहार, वर्तणूक या सगळ्याच बाबतीत वेगाने अधःपतन होत आहे. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ याचा तर जवळपास सर्वांनाच विसर पडत चालला आहे. वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चा आणि समाजमाध्यमांवरील राजकीय वटवटगिरी, तिथले विद्वेषी, विखारी फूत्कार यांमुळे चिथवण्या-चीत्कारांचा कोलाहल माजला आहे. त्यातून समाजाचे भले होणे दूरच, उलट हानीच होते आहे.

बातम्या आणखी आहेत...