आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:जाणिवेचा ‘भावे’प्रयोग

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केवळ दिग्दर्शक म्हणून न वावरता एक परिपूर्ण चित्रकर्मी असे त्यांचे रूप यातूनच साकारले आणि प्रेक्षकांनाही समृद्ध करणारे ठरले.

चित्रपट या माध्यमाची ‘करमणूक - मनोरंजन’ ही बाजू लक्षात घेऊनही, विस्तृत जनमानसावर परिणाम करण्याच्या सामर्थ्याला केंद्र मानून आशयघन आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दर्जेदार चित्रकृती आपल्यासमोर आणणाऱ्या सुमित्रा भावे यांच्या निधनाने चित्रपटाला भक्कम वैचारिक आशय पुरवणारा झराच जणू लुप्त झाला आहे. सेवादलाचे संस्कार लाभलेल्या भावे यांनी ‘पाणी’, ‘बाई’ अशा लघुपटांचे संचित पाठीशी घेत १९९५ पासून ‘दोघी’ या चित्रपटाने रुपेरी प्रवास सुरू केला आणि पुढची सलग २५ वर्षे तो सुरूच राहिला. सुनील सुकथनकर यांच्या रूपाने समविचारी सहकारी त्यांना मिळाला आणि एकाहून एक सरस, आशयघन चित्रपट त्यांनी सादर केले. चित्रपट हे गांभीर्याने पाहण्याचे - हाताळण्याचे माध्यम आहे, त्याचा वापर ‘गल्लाभरू’ पद्धतीने न करता, जबाबदार आणि उत्तरदायित्वाच्या भावनेने केला पाहिजे, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन असे.

त्यांनी स्वतःच्या चित्रनिर्मितीत हे भान सदैव जपले. समाजजीवनाला ग्रासणारे मनोकायिक आजार त्यांनी आपल्या चित्रपटांचे मध्यवर्ती विषय केले आणि त्यातून प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेला, सहृदयतेला कृतिशील आवाहन केले. चित्रपटांच्या माध्यमातून एक सृजनशील अभिरुची घडवण्याचा प्रयत्न केला. मराठी चित्रपटाला एक वेगळी आणि अर्थपूर्ण वाट दिली. मनोकायिक आजारांविषयीचे समाजातील गैरसमज दूर करून मानवतावादी, प्रगतिशील अशा जीवनमूल्यांकडे लक्ष वेधले. ग्रामीण विकासाप्रमाणेच ग्रामीण जीवनातील समस्या, स्त्री चळवळी यावर आपल्या चित्रपटांतून सकारात्मक, प्रगल्भ भाष्य केले. चित्रपट निर्मितीसोबत चित्र, शिल्प, काव्य, नृत्य, गायन, वादन, रंगभूमी, अभिवाचन अशा सर्वच कलाक्षेत्रांत त्या समृद्ध जाणिवा घेऊन वावरल्या. सुमित्रा भावे यांचा एक विशेष असा की, प्रत्येक पिढीशी त्यांचा उत्तम ‘कनेक्ट’ होता.

त्यांच्यासोबत नेहमीच युवा पिढीतील नवोन्मेषी प्रतिभेचे तरुण प्रतिनिधी वावरत. युवा मनांशी त्यांचे असे जोडले जाणे अर्थपूर्ण तर होतेच, पण त्यातून त्यांच्या मांडणीला नेहमीच ताजे संदर्भ मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाने युवा दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलकांची नवी फळी घडली, हेही लक्षणीय. केवळ दिग्दर्शक म्हणून न वावरता एक परिपूर्ण चित्रकर्मी असे त्यांचे रूप यातूनच साकारले आणि प्रेक्षकांनाही समृद्ध करणारे ठरले.

बातम्या आणखी आहेत...