आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:कुठवर ‘श्वास’ कोंडणार..?

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूला कारणीभूत असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी डेरेक चॉविन याला तेथील न्यायालयाने एकमताने दोषी ठरवले आहे. त्याला आता दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सिगारेटच्या पाकिटासाठी वीस डॉलरची बनावट नोट दिल्याच्या संशयावरून गेल्या वर्षी २५ मे रोजी फ्लॉइडला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या वेळी डेरेकने त्याला रस्त्यावर पाडून त्याच्या मानेवर गुडघा दाबून धरला. असहाय फ्लॉइडचा थोड्या वेळातच मृत्यू झाला. डेरेकची क्रूर मानसिकता त्यापूर्वीही समोर आली होती. पण, एकूणच अमेरिकी समाजात खोलवर रुजलेला वर्णद्वेष हे या घटनेमागचे खरे कारण होते.

एकीकडे, अमेरिकेच्या अध्यक्षपदावर बराक ओबामा यांच्यासारखा कृष्णवर्णीय नेता दोन वेळा सन्मानाने विराजमान होतो, तर दुसरीकडे त्याच देशात कृष्णवर्णीयांवर हल्ले होतात, खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याचे प्रकार सर्रास घडतात, हे जगासाठी धक्कादायक होते. स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या अमेरिकेसह एकूणच पाश्चात्त्य जगाच्या सामाजिक मानसिकतेत दडलेला वर्णद्वेष दाखवणाऱ्या अशा घटना वारंवार घडतात. त्यांच्याविरोधात काही वर्षांपूर्वी ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ ही चळवळ उभी राहिली. फ्लॉइडच्या प्रकरणातही या माध्यमातून अमेरिकेसह अनेक देशांत आंदोलने झाली. ट्रम्प यांच्या काळात कृष्णवर्णीयांवर अत्याचार करणाऱ्या श्वेतवर्णीयांना अप्रत्यक्षपणे संरक्षण मिळाले. त्यामुळे गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वर्णद्वेषाचा मुद्दा ऐरणीवर आला.

डेरेक दोषी ठरल्यानंतर अध्यक्ष जो बायडेन यांनी केलेले ट्विट लक्षणीय आहे. ते म्हणतात, “मला श्वास घेता येत नाही’, या फ्लॉइडच्या अखेरच्या शब्दांना त्याच्याप्रमाणे मरण येणार नाही. आम्हाला ते ऐकावे लागतील. त्यापासून आम्ही कधीही दूर जाणार नाही.” जुनी लोकशाही कूस बदलते आहे. तिथे समानतेचा, वर्णविहीनतेचा विचार दृढ होतो आहे. राजकीय लाभासाठी मानवतेचा ‘श्वास’ फार काळ कोंडता येत नाही, हे अमेरिकेला कळले. सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात जाती, वर्ण, वर्गव्यवस्थेने निर्माण केलेली विषमता मात्र आजही कायम आहे. मतपेढीच्या रूपाने ती बळकट होते आहे. त्यामुळे ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठी झगडणाऱ्या आपल्या देशातील बांधवांची घुसमट केव्हा संपणार, हा प्रश्न उभा राहतोच.

बातम्या आणखी आहेत...